युकेच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे रिषी सुनक विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या मंत्रिमंडळातील एखादा महत्त्वाचा मंत्री भारतात आला आहे. उद्योगमंत्री किमी बेडनॉक 12 डिसेंबरला व्यापार धोरणाविषयक चर्चेसाठी नवी दिल्लीला पोहोचल्या. दोन देश एकमेकांशी मुक्त व्यापार करार करण्यासाठी उत्सुक आहेत . त्यादृष्टीने त्या भारतीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत.
हा पूर्ण आठवडा बेडनॉक भारतात असतील. आणि ही दोन्ही देशांदरम्यान चर्चेची सहावी फेरी आहे. यामध्ये ग्रेट ब्रिटनचं उद्दिष्टं त्यांच्या बँकिंग व वित्त क्षेत्रातील कंपन्यांना भारतीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी करांमध्ये सवलत मागणं हा आहे. याशिवाय कॉर्पोरेट कायद्यांच्या क्षेत्रातही युकेला भारतात शिरकाव करायचा आहे.
याबरोबरच युकेमधील कंपन्या भारतात जवळ जवळ 10 अब्ज पाऊंड्सची गुंतवणूक करणार आहेत. अशा उद्योजकांची भारतीय खरेदीदार उद्योजकांशी ओळख करून देणे आणि भारतीय गरजा समजून घेणं हा ही त्यांच्या भेटीचा उद्देश आहे. प्रेट ही युकेमधील कॉफी आऊटलेट, रिव्होल्यूट हे बँकिंग सेवा अॅप अशा कंपन्यांनाही भारतात यायचं आहे. प्रेट कंपनीने तर रिलायन्सबरोबर करारही केला आहे. आणि त्यांचं पहिलं आऊटलेट 2023च्या सुरुवातीला मुंबईत सुरू होणार आहे. या मार्गाने भारतात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे भारतही या कराराकडे सकारात्मक दृष्टीने बघत आहे.
भारत आणि युके आकारमानाने सध्या जगातील पाचव्या आणि सहाव्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. तर जागतिक अंदाजानुसार, 2050 पर्यंत भारत देशात तरुणांची संख्या वाढून देश तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. अशावेळी भारत हा जगासाठी आतापेक्षाही मोठी बाजारपेठ असेल. आणि त्यादृष्टीने युकेला भारताबरोबरचे संबंध आणखी चांगले करायचे आहेत.
दोन देशांमध्ये सध्या होत असलेला व्यापार 29 अब्ज पाऊंडांच्या घरात आहे. भारताला करत असलेली निर्यात 9 अब्ज पाऊंड्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्टं युकेनं ठेवलं आहे. दोन देशांमध्ये फ्री ट्रेड अॅगरीमेंट अर्थात, मुक्त व्यापार कराराची घोषणा यावर्षीच्या सुरुवातीला झाली होती. तेव्हाचे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिवाळीपर्यंत वाटाघाटी पूर्ण करण्याचंही जाहीर केलं होतं. पण, दरम्यानच्या काळात युकेमध्ये दोनदा सत्तांतर झालं. आणि बोलणी पुढे ढकलावी लागली. आता सध्याचे पंतप्रदान रिषी सुनक यांनी व्यापारविषयक बोलणी फास्टट्रॅक करण्याची घोषणा केली आहे.