भारताने युनायटेड किंगडमच्या (UK) नागरिकांसाठी ई-व्हिसा (E-Visa) सुविधा पुन्हा एकदा सुरू केली आहे. कोव्हिडच्या उद्रेकानंतर मार्च 2020 पासून इतर व्हिसांबरोबरच ई-व्हिसाही बंद झाला होता. त्यानंतर हळू हळू इतर व्हिसा सुरू झाले. आणि आता शेवटच्या टप्प्यात ई-व्हिसा सुविधाही सुरू करण्याची घोषणा भारताचे युकेमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी व्हीडिओ संदेशाद्वारे केली आहे. नेमकी ही सेवा कधी पूर्ववत होणार या तारखा काही दिवसांत जाहीर करण्यात येतील. युकेच्या नागरिकांना भारतात येणं त्यामुळे सोपं होणार आहे.
‘भारतात युके नागरिकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लवकर ही सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. याशिवाय तुमच्या घरापर्यंत व्हिसा पोहोचवण्याची सुविधा यापूर्वीही तुमच्यासाठी उपलब्ध होती. भारतात सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. आणि भारतीय हिवाळाही सुरू होत आहे. अशावेळी तुम्हीही भारतीयांबरोबर इथला माहौल साजरा करण्यासाठी या,’ असं दोराईस्वामी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
त्यानंतर भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका ट्विटमध्ये हा निर्णय पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
ई-व्हिसा म्हणजे अर्थातच इलेक्ट्रॉनिक व्हिसा. पण, इथं व्हिसा पासपोर्टवर स्टँप होऊनच येतो. पण, त्यासाठीची प्रक्रिया प्रत्यक्ष इमिग्रेशन कार्यालयात न जाता ऑनलाईन पूर्ण करता येते. नागरिकांना कुठल्या प्रकारचे व्हिसा ई-व्हिसाच्या स्वरुपात उपलब्ध करून द्यायचे हे प्रत्येक देश ठरवतो.
दुसरीकडे, युकेमध्ये जाणाऱ्या भारतीयांना व्हिसा देण्याचं प्रमाणही वाढत आहे. आणि 2022मध्ये युकेकडून परदेशी नागरिकांना दिल्या गेलेल्या वर्क व्हिसामध्ये (Work Visa) 39% प्रमाण भारतीयांचं होतं. तर सप्टेंबर 2022 पर्यंतच्या शैक्षणिक वर्षांत 1,27,731 भारतीय विद्यार्थ्यांना युकेतील विद्यापीठातून शिष्यवृत्ती मिळाल्या.
वर्क आणि व्हिजिट व्हिसाच्या निकषांवर युके व्हिसाच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकलं आहे. भारत आणि युके दरम्यान सध्या द्विपक्षीय व्यापार करारावर (FTA) बोलणी सुरू आहेत. आणि युकेचे पंतप्रधान रिषी सुनक यांनीही उभय देशांमध्ये मुक्त व्यापार असावा यादृष्टीने अनुकूलता दाखवली आहे. अशावेळी नियमित आदान प्रदानासाठी व्हिसा प्रक्रिया सुलक्ष असणं महत्त्वाचं ठरतं.