भारतीय फुटबॉल (Indian National Football Team) टीम अजून फिफा वर्ल्ड (Fifa World Cup) कपपर्यंत पोहोचलेली नाही. आणि फिफाच्या (FIFA) फुटबॉल क्रमवारीत भारताचा सध्याचा क्रमांक आहे 106वा. पण, भारतीय फुटबॉल रसिकांचं खेळावरचं प्रेम कमी झालेलं नाही. भारतातून वर्ल्ड कपच्या मॅच बघण्यासाठी कतारला (Qatar) जाणाऱ्यांचं प्रमाण सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) खालोखाल दुसऱ्या नंबरवर आहे.
आणि आता फायनलसाठी एकट्या कोलकाता शहरातून 9,000 लोक कतारला गेले आहेत. फिफा संघटनेकडून हा अधिकृत आकडा प्रसिद्ध झाला आहे. पूर्व भारतातून आणखी किमान 1,500 लोकांनी कतार साठीच्या हय्या कार्ड (Hayya Card) आणि तिथे राहण्या-जेवणाच्या सोयीविषयी चौकशी केली असल्याचं ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
हय्या कार्ड हे असं कार्ड आहे ज्यामुळे तुम्हाला कतारला जाऊन फुटबॉल मॅच बघता येते . हा कतारचा अधिकृत व्हिसा नव्हे.
कोलकाता आणि पूर्व भारतातलं फुटबॉल प्रेम सगळ्यांनाच ठाऊक आहे. लीग मॅचच्या दरम्यानही इथून 10,000 ते 12,000 लोक कतारला गेले होते. संपूर्ण भारतातही फुटबॉलविषयी चांगली उत्सुकता पाहायला मिळतेय.
फिफा संघटनेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कतारमध्ये फुटबॉल मॅच पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये सौदी अरेबियानंतर भारताचाच क्रमांक लागतो. सौदी अरेबिया हा कतारचा शेजारी देश आहे.
तिथून फुटबॉल मॅचसाठी लागणाऱ्या हय्या कार्डसाठी 77,106 अर्ज आले. आणि त्यांना कार्ड मिळालीही. तर त्या खालोखाल भारतीयांचा नंबर लागतो. भारतातून लीग मॅच दरम्यान तब्बल 56,893 जणांनी अर्ज केले. लीग स्टेजपर्यंत परदेशी 20 लाख परदेशी पर्यटकांनी कतारमध्ये फुटबॉल मॅचचा आनंद लुटला आहे.
कतारचे मुख्य पर्यटन अधिकारी बर्टहोल्ड ट्रेंकर यांनी फिफाच्या वेबसाईटवर आकडेवारी देताना म्हटलंय की, ‘भारतीय टीम वर्ल्ड कपमध्ये खेळत नसतानाही तिथून तिकिटांसाठी मिळालेला प्रतिसाद स्वागतार्ह आहे. इतर फुटबॉल वर्ल्ड कप हे बाहेरच्या खंडात झाले होते. तिथे प्रवास करण्यापेक्षा कतारमध्ये प्रवास करणं भारतीयांसाठी सोपं आहे. त्यामुळे भारतीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असावा.’
वर्ल्ड कपच्या मॅच पाहण्यासाठी अमेरिका, मेक्सिको, इंग्लंड, फ्रान्स आणि अर्जेंटिनाहूनही पर्यटक कतारमध्ये येत आहेत.