FIFA World Cup 2022 : कतारमध्ये होत असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमुळे सध्या कतार तरुण आणि अबालवृद्धांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले आहे. रविवारपासून (दि. 20 नोव्हेंबर) सुरू झालेल्या वर्ल्ड कपसाठी 1.2 दशलक्षाहून अधिक फुटबॉल चाहते कतारमध्ये येण्याची अपेक्षा आहे. कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप पाहण्याबरोबरच दोहा, कतारमधील काही ठिकाणेही तितकीच प्रसिद्ध आहेत. या ठिकाणांना आवर्जुन भेट देता येऊ शकेल. कतार हा आकाराने तसा लहान देश आहे. त्यामुळे इथे फेरफटका मारणे सोयीचे आणि कमी त्रासाचे ठरू शकते. तर आम्ही तुम्हाला कतार फुटबॉल वर्ल्ड कप 2022 च्या (Qatar Football World Cup 2022) निमित्ताने कतारमधील प्रसिद्ध अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत.
Table of contents [Show]
- इनलॅण्ड समुद्र (The Inland Sea)
- दोहा फिल्म सिटी (Doha Film City)
- कटारा सांस्कृतिक गाव (Katara Cultural Village)
- कतार नॅशनल लायब्ररी (Qatar National Library)
- लुसेल आयकॉन स्टेडियम (Lucelle Icon Stadium)
- दोहा कॉर्निश (The Doha Corniche)
- भव्य मशीद (The State Grand Mosque)
- कतारचे राष्ट्रीय संग्रहालय (The National Museum of Qatar)
- सौक वकीफ (Souq Waqif)
इनलॅण्ड समुद्र (The Inland Sea)
स्थानिक भाषेत याला खोर अल-अदाद किंवा आंतर्देशीय समुद्र म्हणून ओळखले जाते. याला 15 किलोमीटर लांबीची भरती-ओहोटीची खाडी असून ती कतारच्या वाळवंटात लपलेली आहे, असे म्हटले जाते. ही खाडी सौदी अरेबियाच्या सीमेजवळ, आग्नेयकडील दोहा शहरापासून एक तासाच्या अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला गाडी भाड्याने घेऊनच जावे लागेल.
दोहा फिल्म सिटी (Doha Film City)
कतारमधील भेट देण्यासारखे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे दोहा फिल्म सिटी. अशाप्रकारची फिल्म सिटी यापूर्वी तुम्ही कधीही पाहिली नसेल. दोहाच्या फिल्मसिटीमध्ये एक विलक्षण आणि वेधक वातावरण असल्याचे सांगितले जाते.
कटारा सांस्कृतिक गाव (Katara Cultural Village)
कटारा सांस्कृतिक गाव हे खरे तर गावच नाही. हे दोहाच्या गजबजलेल्या आर्थिक जिल्हा आणि पर्ल निवासी शेजारच्या अर्ध-चंद्र टॉवर्समध्ये वसलेले टुमदार असं ठिकाण आहे. हे एक असे कंपाऊंड आहे; जिथे देशातील अनेक ऐतिहासिक आणि आधुनिक गोष्टी पाहता येऊ शकतात. इथे एक गोल्डन मस्जिद, अॅम्फीथिएटर, अल थुराया तारांगण आणि इतरही बरीच आकर्षणे आहेत.
कतार नॅशनल लायब्ररी (Qatar National Library)
तुम्हाला आश्चर्य वाटेल की फिरण्याच्या यादीमध्ये कतार नॅशनल लायब्ररीचे नाव का घेतले आहे. याचे कारण म्हणजे इथल्या लायब्ररीत दुर्मिळ हस्तलिखिते आणि दस्तऐवजांचा संग्रह आहे. ज्यात तुम्ही पुस्तक प्रेमी असाल तर त्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता. तसेच लायब्ररीची इमारत हा आर्किटेक्चरचा अप्रतिम नमुना मानला जातो.
लुसेल आयकॉन स्टेडियमवर फुटबॉलच्या प्रत्यक्ष मॅचेस होणार आहेत. पण फुटबॉलच्या मॅच सुरू असताना गर्दीमध्ये या स्टेडियमची रचना तुमच्या लक्षात येणार नाही. मॅच सुरू असताना फक्त मॅचचा आनंद घ्या. त्यानंतर मात्र या स्टेडिअमला निवांत भेट द्या. त्याचे डिझाईन, डेकोरेटीव्ह रचना, अफाट अशी 80,000 प्रेक्षकांची आसनक्षमता अशी बरीच वैशिष्ट्ये इथे पाहायला मिळतील.
दोहा कॉर्निश (The Doha Corniche)
कतारमध्ये भेट देण्यासाठी आणखी एक उत्तम ठिकाण म्हणजे दोहा कॉर्निश. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी, कॉर्निश म्हणजे खडकाच्या किंवा किनाऱ्याजवळून जाणाऱ्या डोंगरामधून काढलेला रस्ता आहे. मुंबईत जसा मरीन लाईन्सला क्वीन ऑफ नेकलेस म्हटले जाते. तसेच कॉर्निश हा परिसर मरीन लाईन्ससारखा उजळून निघणारा प्रदेश आहे. कॉर्निशमध्ये खूपसारे जॉगर्स, रेस्टॉरंट्स, क्लब आणि एक अफलातून असे लहानसे गार्डनसुद्धा आहे. तुम्हाला बोटिंगची आवड असेल तर तुम्ही इथे बोट भाड्याने घेऊन बोटिंगसुद्धा करू शकता.
भव्य मशीद (The State Grand Mosque)
कतारमध्ये भेट देण्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या बरीच ठिकाणे आहेत; त्यात स्टेट ग्रॅण्ड मस्जिदचा आवर्जून उल्लेख केला जातो. याच्या निर्मितीत पारंपरिक आणि आधुनिक वास्तुकलेचे मिश्रण आहे. कतारमध्ये सर्व मशिदींमध्ये विनामूल्य प्रवेश दिला जातो. पण धार्मिक स्थळांना भेट देताना तिथल्या प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, पुरुष आणि महिलांना स्वतंत्रपणे प्रवेश करावा लागतो.
कतारचे राष्ट्रीय संग्रहालय (The National Museum of Qatar)
कतारचे नॅशनल म्युझियम हे कतारमध्ये भेट देण्याच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असल्याने, त्यात विनामूल्य प्रवेश मिळत नाही. यासाठी तिकिट आकारले जाते. तुम्ही ऑनलाईन पास काढू शकता. कतारचे नॅशनल म्युझियम हे कतारमध्ये भेट देण्याचे एक आकर्षक केंद्र आहे. तुम्हाला इतिहासात इंटरेस्ट नसला तरी याची रचना आणि शैली अद्वितीय आहे. प्रसिद्ध फ्रेंच वास्तुविशारद जीन नोवेल यांनी या इमारतीचे डिझाईन केले आहे.
सौक वकीफ (Souq Waqif)
सौक म्हणजे अरबी भाषेत बाजार. सौक वकीफ हे कतारमधील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक आहे. तुम्हाला शहराच्या जुन्या काळातील वास्तुकला याठिकाणी पाहता येतील. सौक वकीफ येथे तुम्हाला कतारमधील अस्सल पद्धतीचे जेवण मिळू शकते. तसेच कबाब, अक्रोड, डाळिंबाचे स्ट्यू आणि येमेनी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.