Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Return: आयटी रिटर्न म्हणजे काय? जाणून घ्या नियम आणि प्रकार!

Income Tax Return: आयटी रिटर्न म्हणजे काय? जाणून घ्या नियम आणि प्रकार!

दरवर्षी आपल्याला आपल्या अधिकच्या उत्पन्नावरील एक भाग कर रूपात सरकारला द्यावा लागतो, त्याला आयकर भरणे असे म्हणतात. इन्कम टॅक्स (IT) किंवा आयटीआर (ITR) म्हणजेच आपल्या उत्पन्नावरील कर आहे. (Updated on 19 July 2023)

इन्कम टॅक्स कायद्यानुसार भारतातील कोणतीही व्यक्ती जी मर्यादित उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न मिळवत असेल तर त्याला टॅक्स भरावा लागतो. मग ती व्यक्ती भारतीय रहिवासी असो किंवा नसो त्याला इथल्या कायद्यानुसार, भारतात मिळणाऱ्या उत्पन्नावर आणि परदेशात मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो.

आयटी रिटर्न्स म्हणजे, विविध स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील एकूण करपात्र उत्पन्न किती? टॅक्स वाचवण्यासाठी केलेली गुंतवणूक आणि त्यावरील टॅक्स विभागाला द्यावे लागणारे स्वयंघोषित स्पष्टीकरण, याला आयटी रिटर्न म्हणतात. आयटीआर हा पगारदार किंवा स्वयंरोजगार (स्वतःचा व्यवसाय) व्यक्ती, HUF (हिंदू अविभाजित कुटुंब), कंपन्या किंवा कंपन्यांद्वारे इन्कम टॅक्स विभागाकडे सादर केला जातो. आयटीआर सबमिट करणे म्हणजेच आयकर भरणे असे म्हणतात. इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन आयटीआर भरता येते. आयटीआर ऑनलाइन भरण्याच्या प्रक्रियेला ई-फाईलिंग म्हणतात.

अशा उत्पन्नावर टॅक्स लागू होतो

  • आपली मालमत्ता भाड्याने देऊन त्यापासून उत्पन्न मिळत असल्यास ते करपात्र आहे.
  • रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड आणि मार्केटमधील गुंतवणूकीतून मिळणारा परतावा हा देखील करपात्र असतो.
  • मुदत ठेवी (Fixed Deposit) आणि आवर्ती ठेवी (Recurring Deposit) वर मिळणारे व्याज देखील करपात्र आहे.
  • टॅक्स कपातीसाठी पात्र असलेल्या नोकऱ्या, जसे की, व्यवसाय मालक, कर्मचारी किंवा फ्रीलांसर म्हणून काम करणाऱ्यांचे उत्पन्न.

आयटीआर फॉर्मचे प्रकार

इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर आयटीआर भरताना तुम्हाला नेमका कोणता फॉर्म भरायचा आहे. याची माहिती असणे गरजेचे आहे. रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे फॉर्म उपलब्ध आहेत. त्यातील तुमच्यासाठी कोणता फॉर्म योग्य असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ITR-1: या फॉर्मला ‘सहज’ फॉर्म असेही म्हणतात. हा फॉर्म ज्याचे इन्कम पगार, पेन्शन, घरगुती मालमत्ता, व्याज यातून येते किंवा ज्यांचे एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत (लॉटरी आणि घोड्यांची शर्यतीमधून मिळालेला पैसा वगळता) आहे. त्यांनी हा फॉर्म भरणे अपेक्षित आहे. 

ITR-2: वैयक्तिक व्यक्ती किंवा HUF (हिंदू अविभाजित कुटुंबे) ज्याचे उत्पन्न कोणत्याही व्यवसायाच्या नफ्यातून होत नाही. तसेच ज्यांना ITR-1 लागू होत नाही आणि ज्यांना म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमधून Capital Gain होते. ते ITR-2 फॉर्म भरू शकतात.

ITR-3: वैयक्तिक व्यक्ती किंवा HUF (हिंदू अविभाजित कुटुंब) ज्याचे उत्पन्नाचे स्त्रोत कोणताही व्यवसाय किंवा व्यवसायाच्या नफ्यातून होत आहे.

ITR-4: हा फॉर्म त्यांच्यासाठी आहे ज्यांना व्यवसाय किंवा व्यवसायातून निश्चित उत्पन्न नाही.

ITR-5: हा फॉर्म फर्म्स, मर्यादित भागीदारी, संघटना, संस्था, मृत व्यक्तीची संपत्ती, दिवाळखोरांची संपत्ती, बिझनेस ट्रस्ट आणि गुंतवणूक निधीसाठी आहे.

ITR-6: हा फॉर्म त्या सर्व कंपन्यांसाठी आहे जे आयकर कायद्याच्या कलम 11 अंतर्गत सूटचा दावा करत नाहीत.

ITR-7: हा फॉर्म व्यवसायातील सर्व व्यक्तींसाठी आहे, ज्यांना कलम 139 (4 ए), कलम 139 (4 बी), कलम 139 (4 सी), कलम 139 (4 डी), कलम 139 (4 ई) चे पालन करणे आवश्यक आहे.) किंवा 139 (4F) अंतर्गत कर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.