इन्कम टॅक्स विभागाने करदात्यांना त्यांचा टॅक्स भरताना सहजता यावी. तसेच त्यात काही अडथळे येऊ नयेत यासाठी करदात्यांचे (Tax Payer) उत्पन्न आणि त्याचे स्त्रोत यावर आधारित विविध भाग पाडले आहेत. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला सहज आयटीआर रिटर्न (ITR Return) भरता येऊ शकते, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयटीआर रिटर्न भरणे आवश्यक आहे. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे.
इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर आयटीआर भरताना करदात्याला नेमका कोणता फॉर्म भरायचा आहे; याची माहिती असणे गरजेचे आहे. रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध आहेत. त्यातील तुमच्यासाठी कोणता फॉर्म योग्य आहे. तो जाणून घेऊन त्यानुसार आयटीआर रिटर्न भरणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण आयटीआर रिटर्न म्हणजे काय? (What is ITR Return?) त्याचे नियम आणि प्रकार समजून घेतले होते. आता आपण ITR मधील ITR-2 या फॉर्मबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
ITR -2 फॉर्म कोणाला लागू होतो?
ITR -2 फॉर्म हा उद्योग किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांच्यासाठी आहे. तसेच साधारणत: विविध उत्पन्नाच्या स्त्रोतामधून एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा अधिक असलेल्यांसाठी ITR-2 फॉर्म लागू होतो.
2022-23 साठी ITR-2 रिटर्न फाईल करण्यास कोण पात्र आहे?
ITR-2 हा फॉर्म नियमित उत्पन्नाबरोबर उद्योग आणि व्यवसायातून नफा मिळवणाऱ्यांसाठी आहे. तसेच ज्या व्यक्तीला खाली नमूद केलेल्या स्त्रोतांमधून 50 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. त्याला ITR-2 हा फॉर्म लागू होतो.
• पगार/पेन्शनद्वारे मिळणारे उत्पन्न
• घराच्या मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न (एकापेक्षा जास्ता घरांच्या मालमत्तेतून मिळणारे)
• भांडवली नफा/गुंतवणूक/मालमत्तेच्या विक्रीतून होणारा तोटा (अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही)
• इतर स्त्रोतांद्वारे मिळणारे उत्पन्न (लॉटरी आणि घोड्यांच्या शर्यतीमधून मिळणारे उत्पन्न)
• परकीय उत्पन्न
• शेतीमधून 5 हजार रूपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत असल्यास
वर नमूद केलेल्या स्त्रोतांधून एकूण 50 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते. तसेच तुम्ही जर कोणत्याही कंपनीचे संचालक असाल आणि एखाद्या कंपनीच्या असूचीबद्ध इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली असल्यास ITR रिटर्न भरताना ITR-2 हा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
2022-23 या वर्षासाठी ITR-2 कोण दाखल करू शकत नाही?
• उद्योग किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळत असलेली कोणतीही वैयक्तिक व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (HUF).
• जे ITR-1 फॉर्म भरण्यास पात्र आहेत.
2022-23 साठी ITR-2 फॉर्ममध्ये IT विभागाने केलेले महत्त्वपूर्ण बदल
• करदात्याने 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 या कालावधीत ठेवलेल्या सर्व परदेशी मालमत्तेचे तपशील सादर करणे अपेक्षित आहे.
• भांडवली नफ्याच्या वेळापत्रकात (Capital Gains Schedule-Schedule CG) भांडवली मालमत्तेचे बाजार मूल्यानुसार खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची माहिती दिली पाहिजे.
• जमीन/इमारतींच्या सुधारित किमतींची माहिती
• संपादनाचा खर्च आणि संपादनाची इंडेक्स कॉस्ट याची स्वतंत्र माहिती देणं अपेक्षित आहे.
• इतर स्त्रोतांच्या वेळापत्रकात (Other sources schedule - Schedule OS) भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा झालेल्या करपात्र व्याजाची माहिती देणं गरजेचं आहे. तसेच कलम 2(22)(e)) मध्ये नमूद केल्याप्रमाणे लाभांश म्हणून मिळालेल्या उत्पन्नाचे तपशील.
• संबंधित व्यक्तीचे निवासस्थान निश्चित करण्यासाठी करदात्याला आयकर कायद्याच्या विविध कलमांशी संबंधित योग्य पर्यायाची निवड करावी लागेल.
ITR-2 ची रचना काय आहे?
ITR-2 फॉर्म हा दोन भागांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या भागात सर्वसाधारण माहिती आहे; तर दुसऱ्या भागात उत्पन्नाची माहिती आहे.
भाग 1 सर्वसाधारण माहिती
1. शेड्युल S : पगारातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील
2. शेड्युल HP : घराच्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील
3. शेड्युल CG : भांडवली नफ्याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती
शेड्युल 112 A : कंपनीच्या इक्विटी शेअरच्या विक्रीतून किंवा इक्विटी ओरिएंटेड फंड/बिझनेस ट्रस्टच्या युनीटवर आकारल्या जाणाऱ्या सिक्युरिटी ट्रान्सॅक्शन टॅक्सची (STT) माहिती.
अनुसूची 115AD (I)b(b) (iii) मधील तरतुदीनुसार अनिवासी भारतीयांसाठी कंपनीच्या इक्विटी शेअरच्या विक्रीतून किंवा इक्विटी ओरिएंटेड फंड/बिझनेस ट्रस्टच्या युनीटवर आकारल्या जाणाऱ्या सिक्युरिटी ट्रान्सॅक्शन टॅक्सची (STT) माहिती.
4. शेड्युल OS : इतर स्त्रोतांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचे तपशील.
5. शेड्युल CYLA : चालू वर्षाच्या तोट्यानंतर सेट ऑफ केलेल्या उत्पन्नाचे तपशील
6. शेड्युल BFLA : मागील वर्षापासून सुरू राहिलेल्या तोट्यानंतर सेट ऑफ केलेल्या उत्पन्नाचे तपशील.
7. शेड्युल CFL : नुकसान झालेल्याचे तपशील
8. शेड्युल VIA : एकूण उत्पन्नातून कपात केलेल्या रकमेचे तपशील.
9. शेड्युल 80 G : कलम 80G अंतर्गत वजावटीसाठी पात्र असलेल्या रकमेचे तपशील.
10. शेड्युल 80GGA : वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासासाठी देण्यात आलेल्या रकमेचे तपशील.
11. शेड्युल AMT : कलम 115JC अंतर्गत लागू होणाऱ्या किमान टॅक्सचे तपशील.
12. शेड्युल AMTC : कलम 115JD अंतर्गत टॅक्स क्रेडिटचे तपशील.
13. शेड्युल SPI : पती/पत्नी/अल्पवयीन अपत्य/मुलाची पत्नी किंवा इतर कोणतीही व्यक्ती किंवा संघटनेच्या व्यक्तीचे शेड्युल-HP, CG आणि OS सह उत्पन्नाचे तपशील.
14. शेड्युल SI : उत्पन्नाचे तपशील जे विशेष दरांवर टॅक्स आकारण्यास योग्य आहे.
15. शेड्युल EI : सवलत मिळालेल्य उत्पन्नाचे तपशील
16. शेड्युल PTI : कलम 115UA, 115UB नुसार बिझनेस ट्रस्ट किंवा गुंतवणूक फंडातून मिळालेल्या उत्पन्नाचे तपशील.
17. शेड्युल FSI : भारताबाहेर इतर देशांमध्ये जमा झालेल्या उत्पन्नाचे तपशील.
18. शेड्युल TR : भारताबाहेर परदेशात भरलेल्या टॅक्सचे तपशील.
19. शेड्युल FA : परदेशातील मालमत्तेचा तपशील आणि भारताबाहेरील म्हणजेच परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या स्त्रोतांची माहिती.
20. शेड्युल 5A : पोर्तुगीज सिव्हिल कोडनुसार पती-पत्नी यांच्या उत्पन्नाच्या वाटपाचे तपशील.
21. शेड्युल AL : वर्षाच्या शेवटी राहणारं दायित्व आणि मालमत्तेचे (एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा अधिक असल्यास) तपशील.
22. शेड्युल ESOP : कलम 80-IAC अंतर्गत पात्र स्टार्टअप्सला ESOPS टॅक्सची सूट देण्यात आलेली माहिती.
भाग 2 एकूण उत्पन्नाचे तपशील
B-TTI : एकूण उत्पन्नावरील टॅक्स लायब्लिटीचे तपशील.
टॅक्स पेमेंट्स : अडव्हॉन्स टॅक्स आणि सेल्फ असेसमेंट टॅक्सच्या पेमेंटचे तपशील.
करदात्याकडून घोषणापत्र
Tax Return भरणाऱ्याचे तपशील.