केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात भांडवली नफा कर आणि एसटीटी (Securities Transaction Tax) दरात मोठे बदल करत असल्याची घोषणा केली होती. भारतात मागील काही वर्षात शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे एसटीटीच्या दरात करण्यात आलेली वाढ अशा गुंतवणूकदारांसाठी मोठा आर्थिक फटका समजला जात आहे.
या लेखातून भांडवली नफा कर आणि एसटीटी नक्की काय आहे? या करांच्या दरात वाढ का करण्यात आले आहे? याविषयी जाणून घेऊया.
भांडवली नफा कर आणि एसटीटी दरात बदल?
सिक्यूरिटीज ट्रांजॅक्शन टॅक्स (एसटीटी) हा शेअर बाजारातील व्यवहार मुल्यावर आकारला जातो. बाजारातील स्टॉक्स, फ्यूचर्स अँड ऑप्शन्स, ईटीएफ, म्युच्युअल फंड्सच्या व्यवहारांवर आकारला जाणारा हा प्रत्यक्ष कर आहे. या कराची सर्वात प्रथम घोषणा 2004 च्या बजेटमध्ये करण्यात आली होती. मात्र, शेअर बाजारातून होणाऱ्या नफ्यावर भांडवली कर आकारला जात असताना एसटीटीची गरज काय ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
2024 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेला बदल हा प्रामुख्याने फ्युचर अँड ऑप्शन्सवरील व्यवहारांवर आहे. फ्युचर्सच्या व्यवहारावरील एसटीटी 0.0125% वरून 0.02% करण्यात आला आहे. तर ऑप्शन्सवरील व्यवहारांवरील एसटीटी 0.0625% वरून 0.1% करण्यात आला आहे. म्हणजेच, आता गुंतवणूकदारांना व्यवहारांवर दुप्पट कर द्यावा लागेल.
याशिवाय, शेअर बाजारातून होणाऱ्या नफ्यावरील सूट मर्यादाही वाढवण्यात आली आहे. याआधी 1 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेवर सूट होती. मात्र, आता ही रक्कम 1.25 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच शेअर्स अथवा म्युच्युअल फंडमधून येणारा नफा 1.25 लाख रुपयांच्या पुढे गेल्यास त्यावर 12.5 टक्के दराने भांडवली नफा कर द्यावा लागेल.
एसटीटीमध्ये वाढ करण्याचे कारण काय?
एसटीटीमध्ये वाढ करण्यामागचे कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. ‘या करामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्यांचा मागोवा घेण्यास वकर बेसचा विस्तार करण्यास मदत होते’, असे त्या म्हणाल्या.
अनेकदा पाहायला मिळते की गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात लाखो रुपये लावले जातात. मात्र, कर भरला जात नाही. त्यामुळे एसटीटीच्या माध्यमातून अशा गुंतवणूकदारांना कराच्या कक्षेत आणणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
एसटीटीच्या माध्यमातून सरकारला 1 एप्रिल ते 11 जुलै 2023 या कालावधीत 7,285 कोटी रुपये महसूल प्राप्ती झाली होती. तर 1 एप्रिल ते 11 जुलै 2024 दरम्यान 16,634 कोटी रुपये महसूल प्राप्ती झाली. याचाच अर्थ एसटीटीच्या माध्यमातून होणाऱ्या महसूल प्राप्तीत तब्बल 128 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांवर होणार परिणाम
एसटीटीमध्ये झालेल्या वाढीचा किरकोळ गुंतवणूकदारांवर थेट परिणाम पाहायला मिळेल. फ्यूचर अँड ऑप्शन्समध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना होणारे प्रचंड नुकसान चिंतेचा विषय ठरला आहे. सेबीकडून देखील यावर वेळोवेळी पावले उचलली जात आहेत. 10 पैकी 9 गुंतवणूकदारांचे यात नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एसटीटी वाढीचा गुंतवणूकदारांवरही परिणाम होईल.