• 04 Oct, 2022 15:39

Income Tax Return : ITR-1 फॉर्म न भरण्याची 10 कारणे!

Income Tax Return : ITR-1 फॉर्म न भरण्याची 10 कारणे!

Income Tax Return : एखाद्या पगारदार व्यक्तीकडे अनलिस्टेड कंपनीचे इक्विटी शेअर्स असतील, तर त्या व्यक्तीला ITR-1 फॉर्मचा वापर करून आयटीआर रिटर्न भरण्याची परवानगी नाही.

आयटीआर-1 हा एक साधा कर परताव्याचा (Tax Return) फॉर्म आहे. ज्या व्यक्तीचे वार्षिक एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त नाही आणि त्याचे उत्पन्न, पगार, इतर स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न, तसेच एका घराच्या भाड्यातून मिळणारे उत्पन्न असेल, त्याला ITR-1 फॉर्म लागू होतो.

इन्कम टॅक्स रिटर्न : आर्थिक 2022 आणि असेसमेंट वर्ष 2023 साठी इन्कम टॅक्स (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै, 2022 आहे. म्हणूनच, नोकरदार व्यक्तींनी 2022 या आर्थिक वर्षासाठी आणि 2023 या असेसमेंट वर्षासाठीचे उत्पन्न आणि खर्च यांच्या नोंदी जमा करून ठेवणं गरजेचं आहे. दरम्यान, कर प्राप्त व्यक्तीला हे माहित असणे आवश्यक आहे की, विविध प्रकारच्या माध्यमातून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींसाठी विविध प्रकारचे आयटीआर फॉर्म (ITR Form) असतात. इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) जारी केलेल्या विविध आयटीआरपैकी आयटीआर-1 (ITR-1) हा सर्वात सोपा फॉर्म मानला जातो. याला सहज (Sahaj) असेही म्हटले जाते. बऱ्याच वेळा करदात्यांना नेमका कोणता आयटीआर भरायचा याची माहिती नसल्याने त्यांच्याकडून स्टँडर्ड आयटीआर फॉर्म म्हणून आयटीआर-1 हा फॉर्म दाखल केला जातो. त्यामुळे करदात्याला आयटीआर-1 फॉर्म केव्हा भरता येत नाही, याची माहिती असणं गरजेचं आहे.

आयटीआर-1 फॉर्म कोण भरू शकत नाही, याची 10 कारणे 

50 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न

ज्या व्यक्तीचे पगारातून मिळणारे वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याच्यासाठी आयटीआर-2 हा फॉर्म योग्य असेल.

एकापेक्षा अधिक घरांच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न

जर एखाद्याकडे एकच घर आहे तर त्याच्यासाठी आयटीआर-1 हा योग्य फॉर्म आहे. पण जर एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून उत्पन्न येत असेल तर त्या व्यक्तीला आयटीआर-2 दाखल करता येणार नाही.

शेतीतून मिळणारे उत्पन्न

शेतीतून मिळणारे उत्पन्न हे करपात्र नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी शेतीतून मिळणारे उत्पन्न 5 हजारांपेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. शेतीचे उत्पन्न करपात्र नसले, तरी ते कर आकारण्याचा स्लॅबचा ठरविण्यासाठी ते आवश्यक असते. अशा प्रकरणांत आयटीआर-1 दाखल करता येत नाही.

अनलिस्टेड कंपनीमध्ये इक्विटी गुंतवणूक

जर एखाद्या पगारदार आणि करपात्र व्यक्तीकडे अनलिस्टेड कंपनीचे इक्विटी शेअर्स असतील तर त्या व्यक्तीला आयटीआर-1 फॉर्मचा वापर करून आयटीआर भरता येत नाही.

कंपनीचे संचालक

करदाता व्यक्ती एखाद्या कंपनीत संचालक असेल तर त्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आयटीआर-1 फॉर्मचा वापर करता येत नाही.

टीडीएस पेमेंट 

कलम 194N अंतर्गत 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम कोणत्याही बँक/पोस्ट ऑफिसच्या खात्यातून काढल्यावर, त्यावर टीडीएस कापला गेला असेल तर संबंधित व्यक्ती आयटीआर-1 फॉर्म वापरू शकत नाही.

शेअर्स, म्युच्युअल फंड गुंतवणूकदार 

एखादी करपात्र आणि पगारदार व्यक्ती शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असेल तर, ती व्यक्ती आयटीआर-1 भरू शकते. पण एकदा जर त्याने शेअर्स विकले किंवा म्युच्युअल फंडाची परतफेड केली की, त्याला आयटीआर-1 भरता येत नाही. अशा उत्पन्नासाठी आयटीआर-2 किंवा आयटीआर-3 वापरला जातो.

एचयूएफ कुटुंबातील सदस्य 

एखादा करदाता हिंदू अविभक्त कुटुंबाशी (एचयूएफ) संबंधित असेल तर तो आयटीआर फायलिंगसाठी आयटीआर-1 फॉर्म वापरू शकत नाही.

भारताबाहेर मालमत्ता 

जर एखादी व्यक्ती आयटीआर-1 चे सर्व निकष पूर्ण करत असेल. पण त्याच्याकडे भारताबाहेर मालमत्ता असेल तर तो आयटीआर-1 फॉर्म भरू शकत नाही.

फ्रीलान्सिंगपासून मिळणारे उत्पन्न

अनेकजण वीकेंडला किंवा मोकळ्या वेळेत फ्रीलान्सर म्हणून काम करतात. फ्रीलान्सिंगमधून मिळणारे उत्पन्न हे व्यवसाय किंवा उद्योगातून मिळणारे उत्पन्न मानले जाते. अशा परिस्थितीत फ्रीलान्सर आयटीआर-1 दाखल करू शकत नाही. या व्यक्तीने आयटीआर-4 किंवा आयटीआर-3 भरणे योग्य ठरू शकते.