वंदे भारत (Vande Bharat Express) ही रेल्वे सेवा भारतीय रेल्वेनं (Indian Railways) देऊ केलेली महत्त्वाकांक्षी आणि जलदगती श्रेणीतली सेवा आहे. वंदे भारत मालिकेतल्या ट्रेन भारतात तयार झाल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा वेग जलदगती असल्यामुळे लोकांच्याही त्या सोयीच्या आहेत. आता वंदे भारत रेल्वे मार्गांचा विस्तार करण्याची केंद्रसरकार आणि भारतीय रेल्वेची योजना आहे.
सध्या वंदे भारत रेल्वे एकूण आठ मार्गांवर धावते. आता दक्षिण भारतासाठी नवीन फेऱ्या सुरू होणार आहेत. शिवाय एक रेल्वे महाराष्ट्रातूनही जाणार आहे. याविषयीची बातमी PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंद भारतच्या सिकंदराबाद ते विशाखापट्टणम या सेवेचा शुभारंभ केला होता. ही या श्रेणीतली आठवी रेल्वे होती. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या दोन तेलगू राज्यांमधून ही रेल्वे धावते. आणि दक्षिण भारतात जाणारी ही दुसरी वंदे भारत सेवा होती.
वंदे भारत एक्स्प्रेसचे नवे मार्ग
आता नवीन वंदे भारत एक्सप्रेसचे मार्ग हे कर्नाटक, तेलंगाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार आहेत. तर दक्षिण भारतातल्या दोन मार्गांवरून ही रेल्वे यावेळी जाणार आहे. हे दोन नवीन मार्ग असे आहेत,
- काचेगुडा (आंध्रप्रदेश) ते बंगळुरू (कर्नाटक)
- सिकंदराबाद (तेलंगाणा) ते तिरुपती (आंध्रप्रदेश) आणि पुणे (महाराष्ट्र)
केंद्रसरकारने आधीच्या अर्थसंकल्पातही 2023 पर्यंत देशात 75 वंदे भारत रेल्वे सेवा राबवण्याचं उद्दिष्टं ठेवलं होतं. त्या योजनेचा भाग म्हणूनच या नवीन गाड्या सुरू होणार आहेत. इतकंच नाही तर येणाऱ्या आणखी तीन वर्षांत देशात वंदे भारत रेल्वे मार्गांची संख्या 400 वर न्यायची आहे.
त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद असेल असाही अंदाज आहे.
सध्याचे वंदे भारत मार्ग
वर लिहिल्या प्रमाणे सध्या एकूण आठ मार्गांवर वंदे भारत सेवा सुरू आहे. आणि यातले बहुतेक मार्ग हे पर्यटन स्थळ किंवा देवस्थानाला जोडणारे आहेत. या सेवांची माहिती घेऊया…
मार्ग 1 - नवी दिल्ली ते वाराणसी (उत्तरप्रदेश)
मार्ग 2 - माता वैष्णोदेवी (कटरा - काश्मीर) ते नवी दिल्ली
मार्ग 3 - गांधीनगर (गुजरात) ते मुंबई (महाराष्ट्र)
मार्ग 4 - नवी दिल्ली ते अंदौरा (हिमाचल प्रदेश)
मार्ग 5 - चेन्नई (तामिळनाडू) ते म्हैसुरू (आंध्रप्रदेश)
मार्ग 6 - नागपूर (महाराष्ट्र) ते बिलासपूर (मध्यप्रदेश)
मार्ग 7 - हावरा ते न्यूजलपायगुरी
मार्ग 8 - सिकंदराबाद (तेलंगाणा) ते विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश)
वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये
वंदे भारत ही देशी बनावटीच्या जलदगती रेल्वे गाड्यांची सेवा आहे. संपूर्ण विद्युतीकरण झालेल्या मार्गांवर या रेल्वे चालतात. आणि या गाड्यांचा वेग जास्तीत जास्त 220 किलोमीटर इतका आहे. फक्त 52 सेकंदांत ही रेल्वे 100 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते. वंदे भारतच्या नवीन रेल्वे गाड्यांची तपासणीही सुरू झाली आहे.
नवीन गाड्यांमध्ये दोन गाड्यांची टक्कर रोखणारी यंत्रणाही बसवण्यात आली आहे. या गाडीतले सर्व डबे वातानुकुलित असून स्लीपर कोच आरामदायी आहेत.