भारतात 2022 मध्ये 38 लाख गाड्यांची विक्री (Car Sale) होईल असा अंदाज ऑटो तज्ज्ञांनी (Auto Experts) व्यक्त केला आहे. डिसेंबरच्या (December Car Sales) पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत 33 लाख गाड्या विकल्या गेल्या आहेत. आणि बुकिंग, चौकशी यांचा आढावा घेतला तर जुना रेकॉर्ड मोडीत निघण्याची चिन्हं आहेत. आणि विशेष म्हणजे भारतीयांचा कल SUV खरेदी करण्याकडेही आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत देशात कार विक्रीचा विकास (Sales Growth) दर 25% इतका आहे. गाड्यांचे सुटे भाग (Car Spare Parts) कार कंपन्यांना सुलभतेनं उपलब्ध झाल्यामुळे कार कंपन्यांचं उत्पादन (Car Manufacturing) वाढलं. तसंच कार दुरुस्ती आणि देखभालीची (Repair & Maintainence) सेवाही चांगली झाल्यामुळे कार खरेदीचं प्रमाण वाढलं असल्याचं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात.
आणखी एक कारण म्हणजे कोव्हिडच्या (Covid 19) काळात ज्यांनी खरेदी पुढे ढकलली होती, त्यांनीही आता हळू हळू खरेदीचा निर्णय प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे.
अगदी नोव्हेंबर महिन्याचा आढावा घेतला तरी 3,22,000 पेक्षा जास्त कारची विक्री या महिन्यात झाली. आणि विक्रीत पहिला क्रमांक पटकावलाय तो मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीने. त्याखालोखाल हुंदेई (Hyundai) कंपनीच्या कारची विक्री झालीय. आणि तिसरा क्रमांक टाटा मोटर्सचा (Tata Motors) लागलाय.
मारुकी सुझुकीच्या बालेनो कारला सर्वाधिक मागणी होती. आणि या गाडीची विक्री 15,000च्या आसपास होती. त्यानंतर आल्टो आणि स्विफ्ट या गाड्यांची विक्री झाली. हुंदेई कंपनीच्या क्रेटा या मॉडेलला सर्वाधिक पसंती होती. त्यानंतर व्हेन्यू आणि शेवटी निऑन गाडीची विक्री झाली. तर टाटाच्या निक्सॉन, पंच आणि टियागो या गाडींची विक्री जास्त होती.
स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (SUV) प्रकारच्या गाड्यांची मागणी देशात वाढत आहे. खासकरून दिवाळीनंतर सणांचा हंगाम सुरू झाल्यावर देशात कारची विक्री वाढत जाते. आणि नोव्हेंबर महिनाही त्याला अपवाद नव्हता. ऑक्टोबरमध्ये 3,50,000 गाड्यांची विक्री झाल्यानंतर नोव्हेंबरमध्येही लोकांनी तोच ट्रेंड सुरू ठेवलेला दिसतोय. आणि म्हणूनच तज्त्रांचा अंदाज आहे की, यावर्षी 38 लाख गाड्यांची विक्री होऊ शकेल.