Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filing: पहिल्यांदाच ITR भरताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायला हव्याच

ITR Filing

Image Source : https://www.freepik.com/

31 जुलै ही आयटीआर भरण्याची अंतिम तारीख आहे. ऑनलाइन माध्यमातून घरबसल्या देखील ही प्रक्रिया सहज पूर्ण करता येते.

जुलै महिना आला की अनेकांची आयटीआर (Income Tax Returns) भरण्याची गडबड सुरू होते. 31 जुलै ही आयटीआर भरण्याची अंतिम तारीख आहे. गेल्याकाही वर्षात आयटीआर भरण्याची प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे. ऑनलाइन माध्यमातून घरबसल्या देखील ही प्रक्रिया सहज पूर्ण करता येते. मात्र, पहिल्यांदाच इनकम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांना ही प्रक्रिया किचकट वाटू शकते. 

आयटीआर खरचं भरायला हवा का? उत्पन्नावर किती कर भरावा लागतो? आयटीआर भरताना नक्की कोणत्या फॉर्मची निवड करावी? ई-फायलिंगची प्रोसेस काय असते? याचे नक्की फायदे काय आहेत? असे अनेक प्रश्न पडतात.  तुम्ही देखील पहिल्यांदाच आयटीआर भरत असाल तर या लेखातून याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायला हवी.

आयटीआर कोण भरू शकते?

नोकरी करत असाल अथवा स्वतःचा व्यवसाय असेल, प्रत्येकाने आयटीआर भरायला हवा.  तुमचे उत्पन्न करपात्र नसले तरीही आयटीआर भरल्यास त्याचे अनेक फायदे मिळतील. तुमचे उत्पन्न शून्य रुपये असले तरीही NIL Return भरू शकता.

आयटीआर भरणे म्हणजे कर भरणे नाही. आयटीआरच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक वर्षात कमवलेल्या उत्पन्नाची आयकर विभागाला माहिती देता. तुमचे वार्षिक उत्पन्न करप्रणालीमध्ये येत असल्यास आयटीआर भरणे अनिवार्य आहे. अन्यथा आयकर विभागाकडून नोटीस बजावली जाऊ शकते. याशिवाय, दंडही आकारला जाऊ शकतो.

हे देखील वाचा - शेतकऱ्यांना रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे का?   

कोणत्या कर प्रणालीची निवड करावी?

पहिल्यांदाच आयटीआर भरत असल्यास नवीन करप्रणाली निवडावी की जुनी करप्रणाली निवडावी, याबाबत गोंधळ उडू शकता. तुम्ही याबाबत तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. याशिवाय, ऑनलाइन अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्यावर उत्पन्नाबाबत माहिती देऊन करबचतीबाबत माहिती मिळते. नवीन कर प्रणालीमध्ये कमी कर दर आहेत, तर जुन्या करप्रणालीमध्ये अनेक सवलती मिळतात, ज्याद्वारे कर वाचवू शकता.
तुम्ही जर कोणतीही गुंतवणूक केलेली नसल्यास नवीन करप्रणालीची निवड करू शकता. तर जास्त बचत, गुंतवणूक असल्यास जुन्या करप्रणालीची निवड करावी. ईपीएफ, पीपीएफ, विमा यासह अनेक पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्यास करबचतीचा लाभ मिळू शकतो.

कोणत्या फॉर्मची निवड करावी?

इनकम टॅक्स रिटर्न हे तुम्ही आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाविषयी दिलेली माहिती असते. यामध्ये तुमचे उत्पन्न हे करपात्र आहे की नाही, याबाबत माहिती दिली जाते. त्यामुळे उत्पन्नानुसार आयटीआर फॉर्मचे वेगवेगळे प्रकार पडतात. आयकर विभागाच्या वेबसाइटवर 7 फॉर्म उपलब्ध आहे. यापैकी तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार एका फॉर्मची निवड करू शकता.

ITR – 1हा फॉर्म ‘सहज’ म्हणून देखील ओळखला जातो. ज्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे, अशांसाठी हा फॉर्म योग्य आहे. नोकरदार/पेन्शनधारक व्यक्ती, एक घर आणि इतर मार्गांनी उत्पन्न मिळवणारी व्यक्ती या फॉर्मची निवड करू शकते.
ITR – 250 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न, मालमत्ता, क्रिप्टोकरन्सी व परदेशातून मिळणारे उत्पन्न, , इक्विटी शेअरमध्ये गुंतवणूक असलेली, एखाद्या कंपनीमध्ये डायरेक्टर पदावर असलेली व्यक्ती या फॉर्मची निवड करू शकते.
ITR – 3स्वतःचा व्यवसाय असेल अथवा एखाद्या कंपनीत भागीदार असलेली, तसेच आयटीआर 2 मधील स्त्रोतातून येणारे उत्पन्न ज्या व्यक्तींचे असेल, ते या फॉर्मची निवड करू शकतात.
ITR – 4नोकरदार व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब ज्यांचे उत्पन्न 50 लाखांपेक्षा कमी आहे, ते या फॉर्मची निवड करू शकतात.
ITR – 5कंपनी – LLPs, AOPs, AJP आणि बिझनेस ट्रस्टसाठी हा फॉर्म आहे.
ITR – 6कलम 11 अंतर्गत (धर्मादाय किंवा धार्मिक हेतूंसाठी वापरत असलेल्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न) सूट मिळण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांसाठी हा फॉर्म आहे.
ITR – 7अशी व्यक्ती किंवा कंपनी जे कलम 139(4A)/कलम 139(4B)/कलम 139(4C)/कलम 139(4D)/कलम 139(4E)/कलम 139(4F) अंतर्गत रिटर्न भरतात.

हे देखील वाचा - ITR-5 फॉर्म काय आहे आणि तो कसा फाईल करावा?  

आयटीआर भरण्यासाठी कोणती कागदपत्रे हवी?

आयटीआर भरताना तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे आयटीआर भरताना आयकर विभागाच्या वेबसाइटवर अपलोड करावी लागत नाहीत. परंतु, उत्पन्नाची माहिती देताना या कागदपत्रांची गरज पडते. आयटीआर भरताना तुमच्याकडे खाली दिलेली कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • फॉर्म 16 (नोकरदार वर्गासाठी)
  • बँक स्टेटमेंट
  • सॅलरी स्लिप
  • टीडीएस सर्टिफिकेट
  • फॉर्म 26एएस
  • फॉर्म 16A/16B/16C
  • करबचत गुंतवणूक प्रमाणपत्र
  • गृहकर्ज असल्यास त्यावरील व्याज प्रमाणपत्र
  • विमा प्रीमियम भरल्याची पावती

तुम्ही आयटीआर ऑनलाइन भरत असाल अथवा ऑफलाइन, दोन्ही स्थितीमध्ये ही कागदपत्रे त्वरित सादर करण्याची गरज नसते. मात्र, भविष्यात उत्पन्नाच्या पडताळणीसाठी आयकर विभागाकडून मागणी केल्यास ही कागदपत्रे सादर करावी लागू शकतात.

कर बचतीसाठी करा गुंतवणूक

करबचतीसाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची गरज आहे. यासाठी योग्य अर्थतज्ञांची मदत घेणे कधीही चांगले. तुम्ही कलम 80D, 80C, 24(b), 80E, 80G अंतर्गत गुंतवणूक करून कर वाचवू शकता. तुम्ही पीपीएफ, ईपीएफ, करबचत मुदत ठेवी, सुकन्या समृद्धी योजना, विम्यात गुंतवणूक केली असल्यास जास्त कर भरावा लागणार नाही. एचआरए, एलटीए, वैद्यकीय खर्चाच्या माध्यमातून कर वाचवता येईल.

हे देखील वाचा - ITR रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै; जाणून घ्या ऑनलाईन रिटर्न भरण्याची प्रक्रिया  

उशीरा आयटीआर फाईल केल्यास भरावा लागेल दंड 

आयकर विभागाकडून आयटीआर भरण्यासाठी ठराविक कालावधी दिला जातो. त्या कालावधीमध्ये आयटीआर भरणे गरजेचे असून, अन्यथा दंड आकारला जातो. विभागाकडून 31 जुलैच्या आत आयटीआर भरण्यास सांगितले जाते. तुम्ही 31 जुलैनंतरही आयटीआर भरू शकता. परंतु, यावर दंड आकारला जाईल. आयकर भरण्यास विलंब झाल्यास 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय, अतिरिक्त कर भरायचा असल्यास त्यावरही व्याज आकारले जाते. 

आयटीआर भरण्याची प्रक्रिया काय?

तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून आयटीआर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता. ऑफलाइनच्या तुलनेत ऑनलाइन आयटीआर भरणे खूपच सोपे आहे. आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

  1. तुम्ही जर पहिल्यांदाच आयटीआर भरत असल्यास इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.
  2. तुम्ही नाव, मोबाइल नंबर, पॅन कार्ड इत्यादी माहिती देऊन नोंदणी पूर्ण करू शकता.
  3. त्यानंतर लॉग इन करून इन्कम टॅक्स रिटर्न हा पर्याय निवडा.
  4. आता फाइल इन्कम टॅक्स रिटर्न पर्याय निवडून, ज्या आर्थिक वर्षासाठी आयटीआर भरायचा आहे, त्याची निवड करा.
  5. त्यानंतर खालील आयटीआर भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन असे पर्याय दिसतील, त्यातील ऑनलाइन पर्यायाची निवड करा.
  6. पुढे individual आणि ITR-1 पर्यायाची निवड करा.
  7. तुम्ही आयटीआर कोणत्या कारणासाठी भरत आहात, त्याची माहिती द्यावी लागेल. 
  8. त्यानंतर तुम्हाला Personal Information, Gross Total Income, Total Deductions, Tax Paid आणि Total Tax Liability या प्रत्येक सेक्शनमधील माहिती व्यवस्थित भरून पडताळणी करावी लागेल.
  9. प्रत्येक सेक्शनची पडताळणी केल्यानंतर Proceed पर्यायावर क्लिक करा.
  10. कर भरायचा बाकी असल्यास त्याचे पेमेंट देखील तुम्ही त्वरित करू शकता. फॉर्ममध्ये काही चूका झाल्या असल्यास त्या देखील दुरुस्त करता येतील.
  11. संपूर्ण माहिती तपासल्यानंतर आयटीआर व्हॅलिडेट करावे लागेल. त्यानंतर ई-व्हेरिफायची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

हे देखील वाचा - आयटीआर ऑफलाईन कसे फाईल करायचे?  

ई-व्हेरिफाय प्रक्रिया कशी पूर्ण करू शकता?

आयटीआर भरल्यानंतर तुम्ही ई-व्हेरिफायची प्रक्रिया देखील त्वरित पूर्ण करू शकता. 120 दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करता येते. ई-व्हेरिफायची प्रक्रिया Electronic Verification Code (EVC) अथवा ओटीपीच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. ऑफलाइन व्हेरिफाय करण्यासाठी आयकर विभागाच्या बंगळुरू ऑफिसला आयटीआर फॉर्म पोस्टाने पाठवावा लागेल. व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे याबाबतची माहिती मिळेल.

आयटीआर रिफंड स्टेट्स कसे तपासू शकता?

आयटीआर भरल्यानंतर पुढील 45 दिवसांमध्ये बँक खात्यात रिफंड जमा होतो. तुम्ही जर अतिरिक्त कर भरला असल्यास रिफंड मिळतो. अनेकदा रिफंड येण्यास विलंब होतो. अशावेळी, आयकर विभागाच्या वेबसाइटवरून रिफंड स्टेट्स तपासू शकता.

  1. यासाठी तुम्हाला www.incometax.gov.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  2. वेबसाइटवर गेल्यानंतर पॅन/आधार नंबरचा वापर करून लॉग इन करा.
  3. त्यानंतर ई-फाइल पर्यायावर क्लिक करा. आता इन्कम टॅक्स रिटर्न पर्यायावर जाऊन 'View Filed returns' वर क्लिक करा.
  4. त्यानंतर आर्थिक वर्षाची निवड करा. आता 'View Details' पर्यायावर क्लिक करून रिफंड स्टेट्सबाबत जाणून घेऊ शकता.
  5. येथे तुम्हाला रिफंड जमा झाल्याची माहिती, रक्कम व इतर माहिती मिळेल. रिफंड मिळाले नसल्यास त्याचे कारणही दिसेल. पॅन व आधार कार्ड लिंक नसल्यास रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो. तुम्ही https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html या लिंकवरून देखील रिफंड स्टेट्स तपासू शकता.

हे देखील वाचा - ITR Filing: कर बचतीचे हे 5 पर्याय GenZ जनरेशनला माहित असणे आवश्यक!   

आयटीआर भरताना या चूका टाळा

वेळेत भरा आयटीआरअनेकजण दिलेल्या मुदतीत आयटीआर भरायचे टाळाटाळ करतात. मात्र, आयटीआर वेळेवर न भरल्यास 5 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे दंड टाळण्यासाठी वेळेत आयटीआर भरायला हवा. तुम्ही 31 जुलैच्याआधी सर्व प्रक्रिया पूर्ण करायला हवी.
उत्पन्नाची द्या संपूर्ण माहितीआयटीआर भरताना उत्पन्नाची अपूर्ण माहिती देणे टाळावे. तुम्हाला वेगवेगळ्या स्त्रोतातून मिळणारे उत्पन्न, गुंतवणुकीवरील व्याज, बचत ठेवी इत्यादी संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण माहिती दिल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
चुकीची माहिती भरू नका तुमची वैयक्तिक व उत्पन्नाबाबतची योग्य माहिती देणे गरजेचे आहे. अनेकदा 31 जुलैची तारीख जवळ आल्यावर घाईगडबडीत आयटीआर भरताना चुका होऊ शकतात. याशिवाय, पॅन-आधार कार्ड लिंक करायला विसरू नका. पॅन-आधार लिंक नसल्यास रिफंड मिळण्यास अडचणी येऊ शकतात. 
योग्य फॉर्मची करा निवडआयकर विभागाकडून उत्पन्नानुसार व वैयक्तिक/कंपनीनुसार वेगवेगळे आयटीआर फॉर्म जारी केले जातात. यापैकी योग्य फॉर्मची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या फॉर्मची निवड केल्यास आयटीआर रद्द केला जाऊ शकतो अथवा पुन्हा फॉर्म भरावा लागेल.
आयटीआर व्हेरिफाय करा अनेकांना आयटीआर भरल्यानंतर व्हेरिफाय करणे गरजेचे असते, हे माहित नसते. त्यामुळे तुमचे रिटर्न्स अवैध ठरू शकते. त्यामुळे आयटीआर भरल्यानंतर ते व्हेरिफाय करायला विसरू नये.

चुकीची माहिती भरल्यास दुरुस्ती कशी कराल?

अनेकदा उत्पन्नाची माहिती देताना त्यात चूका होण्याची शक्यता असते. तुमच्याकडूनही आयटीआर भरताना चूक झाली असल्यास घाबरण्याची गरज नाही. विभागाकडून माहितीमध्ये बदल करण्याची देखील सुविधा दिली जाते.

उत्पन्नाची माहिती भरताना चूक झाल्यास तुम्ही पुन्हा एकदा आयटीआर भरू शकता. याला सुधारित परतावा म्हटले जाते. चालू आर्थिक वर्ष संपण्याच्या तीन महिनेआधी यामध्ये दुरुस्ती करता येते. यावर्षी आयटीआरमध्ये बदल करण्याची देय तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. याशिवाय, तुम्ही मागील 2 वर्षांचा आयटीआर एकदाच भरू शकता. यासाठी आयटीआर-यू फाइल करावे लागेल. तर चालू आर्थिक वर्षासाठी नियमित आयटीआरची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

हे देखील वाचा - ITR Filing: मृत व्यक्तीचाही असतो इन्कम टॅक्स रिटर्न! कोणी भरावा? नियम काय?   

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे

अनेकांना इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंगची प्रक्रिया किचकट वाटते. तर काहीजण उत्पन्न करप्रणालीमध्ये येत नसल्याचे कारण देऊन परतावा भरण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र, तुमचे वार्षिक उत्पन्न हे करपात्र नसले तरीही आयटीआर भरणे फायद्याचे आहे. 

उत्पन्नाचा पुरावा इनकम टॅक्स रिटर्न हे तुमच्या उत्पन्न, खर्चाचा विश्वासार्ह्य पुरावा असतो. कोणत्याही सरकारी, बँकेशी संबंधित कामासाठी याचा वापर करू शकता.
टॅक्स रिफंडआयटीआर भरण्याचा आणखी एक फायदा म्हणजे टॅक्स रिफंडसाठी मदत मिळते. अनेकदा उत्पन्न कर पात्र नसले तरीही पगारातून टीडीएस कापला जातो. याशिवाय, पगारातून आधीच अतिरिक्त कर कपात होते. अशावेळी तुम्ही आयकर परतावा भरून टॅक्स रिफंड मिळवू शकता.
कर्ज काढताना होईल मदतगृहकर्ज, वाहनकर्ज काढण्यासाठी बँकेत उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागतो. अशावेळी बँकेडून आयटीआरची मागणी केली जाते. तुम्ही उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयटीआर सादर करू शकता. यामुळे कर्ज त्वरित मिळण्यास मदत होईल.
क्रेडिट कार्ड व विमा क्रेडिट कार्ड व विमा काढताना कंपन्यांकडून आयटीआरबाबत माहिती मागितली जाते. व्यक्तीच्या उत्पन्नाबाबत यातून माहिती मिळते. उत्पन्नाचा स्त्रोत योग्य असल्यास कंपन्यांकडून क्रेडिट कार्ड व विमा पॉलिसी जारी केली जाते. 
सहज मिळेल व्हिसापरदेशात प्रवास करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असते. व्हिसासाठी अर्ज करताना आयटीआर मागितले जाते. आयटीआरच्या माध्यमातून देशात प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिकबाबींबाबत संपूर्ण माहिती मिळत असते. त्याआधारावरच व्हिसा जारी केला जातो.