इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख इन्कम टॅक्स विभागाने निश्चित केलेली आहे. ती दरवर्षी 31 जुलै अशीच असते. यामध्ये सरकार हस्तक्षेप करून काहीवेळेस वाढवून देखील देते. पण शक्यतो आयटीआर मुदतीपूर्वी भरणे योग्य ठरू शकते. तुम्ही जर GenZ या जनरेशमधील असाल आणि यावर्षी पहिल्यांदाच आयटीआर भरत असाल तर, काळजी करू नका. आम्ही तुम्हाला आयटीआर भरण्यासाठी जी माहिती आवश्यक आहे. ती इथे देणार आहोत.
आयटीआर भरताना तुम्हाला काही गोष्टींची चेकलिस्ट तयार करावी लागेल. जेणेकरून तुम्हाला ही प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत वाटू शकेल. तसेच याचे तुमच्यावर दडपणदेखील येणार नाही. तर आयटीआर भरताना कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ते आपण समजून घेणार आहोत.
Table of contents [Show]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आपल्या 2023 च्या अर्थसंकल्पीय भाषणात नवीन टॅक्स रचनेची घोषणा केली होती आणि ही नवीन टॅक्स रचना सर्वांना सरसकट लागू असणार आहे. पण यामध्ये टॅक्स पेअर्स जुन्या टॅक्स स्लॅबची निवड करू शकतात. टॅक्समधील तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक करदात्याने आपले उत्पन्न, वजावट, कायद्याने मिळणाऱ्या कर सवलती याची गणना करून त्यानुसार नवीन किंवा जुनी टॅक्स रचना निवडावी. ज्या रचनेचा अधिक फायदा होणार आहे; त्याची निवड करावी. यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घ्यावी.
कलम 80C अंतर्गत मिळणारी वजावट
इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C हे सर्वाधिक प्रचलित असलेले कलम आहे. कारण या कलमामुळे करदात्यांना त्यांचे टॅक्सेबल उत्पन्न कमी करण्यास मदत होते. 80C च्या नियमानुसार एका आर्थिक वर्षातील पगारातून 1.5 लाख रुपयांपर्यंतची वजावट घेता येते. पण यासाठी पुरेसे पुरावे म्हणजेचे कागदपत्रे जोडावी लागतात. त्यासाठी याची सुरूवात नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून करणे योग्य ठरते.
सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स पेअर्स नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS), ईएलएसएस (ELSS Mutual Fund), पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SSSC) यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो. सेक्शन 80C प्रमाणेच सेक्शन 80D, सेक्शन 80E किंवा सेक्शन 80G द्वारे तुम्ही कर सवलत मिळवू शकता.
Form 15G/15H
तुमच्या बँकेतील सेव्हिंग खात्यात किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये जे पैसे असतात. त्या पैशांवर बँक व्याज देते. त्यावर सरकार टॅक्स आकारते. त्यातून जर तुम्हाला सवलत मिळवायची असेल तर तुम्हाला बँकेला Form 15G/15H भरून द्यावा लागतो. हा फॉर्म भरून दिल्यानंतर बँक टीडीएस कापत नाही.
खर्चांची नोंद ठेवा
ज्याप्रमाणे आपण येणाऱ्या उत्पन्नाची नोंद ठेवतो. त्याचप्रमाणे उत्पन्नातून होणाऱ्या खर्चाची नोंद ठेवणे तितकेच गरजेचे आहे. खर्चाची नोंद म्हणजे त्याची बिले जपून ठेवणे आवश्यक आहे. जी तुम्हाला आयटीआर भरताना पुरावा म्हणून जोडावी लागतात. तसेच टॅक्स सवलत मिळावी म्हणून जी तुम्ही गुंतवणूक करता. त्या गुंतवणुकीतून भविष्यात फायदा व्हावा. हे देखील अपेक्षित आहे. त्यासाठी जमा-खर्चाची नोंद खूप गरजेची आहे.
वेळेत आयटीआर भरा
सरकारने दिलेल्या मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा रेकॉर्डदेखील स्वच्छ राहतो आणि त्यामुळे तुम्हाला कोणताही दंड भरावा लागत नाही किंवा उशिरा भरल्यामुळे अतिरिक्त व्याज भरावे लागत नाही. तर 31 जुलै 2023 ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख आहे.
अशाप्रकारे तुम्ही जर यावर्षी प्रथमच आयटीआर भरत असाल तर तुम्ही काही गोष्टींची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमची ऐनवेळेला धावपळ होणार नाही. तसेच आयटीआर भरणे हे शेवटच्या घटकेला करण्याचे काम नाही. यासाठी पूर्वतयारी ही गरजेची आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किंवा पहिली नोकरी सुरू झाल्यापासून याचा विचार होणे आवश्यक आहे.