गृहकर्ज (Home Loan) घेताना व्याजदराइतकीच (Interest Rate) गृहकर्जाची मुदत ही तितकीच महत्त्वाची आहे. कर्जदार ठरवेल तितकी वर्षे गृहकर्ज (होमलोन) घेता येतं. अर्थात याचा निर्णय कर्जदार ग्राहक एकटा घेऊ शकत नाहीत, यात बॅंकेचेही काही नियम आहेत. होमलोनची रक्कम आणि मुदत म्हणजेच कालावधी किती असावा, हे ठरवण्याचा अधिकार बँकांनाही असतोच. शिवाय ते ग्राहकाच्या आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून असतं. साधारणपणे होमलोनची मुदत 20 ते 25 वर्षे इतकी असते. पण या कालावधीतही ग्राहकाच्या आर्थिक कुवतीनुसार बदल केला जाऊ शकतो.
Table of contents [Show]
दीर्घ मुदतीच्या कर्जावर ईएमआय कमी येतो!
साधारणपणे होमलोन अधिकाधिक कालावधीसाठीच घेतलं जातं. दीर्घ मुदतीचं होमलोन घेण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. कारण कर्जाची रक्कम अधिक असेल आणि दीर्घ मुदतीचा पर्याय निवडला असेल तर मासिक हप्त्याचा (ईएमआय) भार कमी होतो. कमी मुदतीसाठी कर्ज घेतलं असेल आणि कर्ज लवकर फेडण्याची कुवत असेल तर ईएमआय (EMI) अधिक भरावा लागतो. घर राहण्यासाठी घेतलं जात जात आहे की, गुंतवणूक म्हणून यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कमी कालावधीत म्हणजेच लवकर होमलोन फेडण्यासाठी लागणार्या मुदतपूर्व कर्जफेडीवर शुल्क भरावं लागत नाही. शिवाय चांगली किंमत मिळाल्यानंतर ही प्रॉपर्टी विकली जाऊ शकते. अशा वेळी ग्राहकाला घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं भाग पडतं. याच कारणामुळेच कर्जाची मुदतकाळ कमी ठेवला जातो.
होमलोन किती वर्षांसाठी घ्यावं?
होमलोन किती कालावधीसाठी घ्यावं, याचा निर्णय वेगवेगळ्या बाबींवर अवलंबून असतो. तुम्ही किती होमलोन घेता यावर कर्जाची मुदत अवलंबून असते. कर्जाची रक्कम अधिक असेल तर अधिक आर्थिक ओझं ओढावून घेण्यापेक्षा होमलोनची मुदत वाढवून घेणं फायद्याचं ठरू शकतं. छोट्या रकमेचं कर्ज असेल तर निश्चितपणे कमी मुदतीचं कर्ज फेडून मोकळे होणं हे कधीही योग्य ठरू शकतं. त्यामुळे भविष्यात दुसरं कर्ज घेणं सोपं होऊ शकतं.
बॅंका निवृत्तीच्या वयात कर्ज देत नाही
वय-वर्ष, कर्जाचा मुदत कालावधी ठरवताना ग्राहकाचं वय हा मुद्दाही गृहीत धरला जातो. कोणतीही बँक निवृत्तीच्या वयात कर्ज देत नाही. कारण या वयात कर्ज फेडलं जाईलच याविषयी बँकेला खात्री नसते. त्यामुळे कर्जाची मुदत निवृत्तीच्या वयाच्या अलीकडेच निश्चित केली जाते. तरुण वयात कर्ज घेतल्यास कमी मुदतीचा पर्याय निवडणं योग्य ठरू शकतं. कारण त्या वयात पगार वाढत जाणारा असतो. त्यामुळे काही वर्ष ओझं सहन करून कर्जदार लवकरात लवकर कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होऊ शकतो.
कर्जदाराचं मासिक उत्पन्न महत्त्वाचं!
बॅंक होमलोन देताना कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न आवर्जून पाहिलं जातं. अर्थात हा यातील महत्त्वाचा घटक आहे. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला महिन्याला किती उत्पन्न मिळते? त्यातील शिल्लक किती राहते आणि तेवढ्या रकमेत तो मासिक हप्ता भरू शकतो का? यावर कर्जाचा कालावधी ठरतो. कमी शिल्लक उरत असल्यास अधिक मुदतीच्या पर्यायाची निवड केलेली योग्य ठरू शकते. कारण ना एखाद्या वेळी मोठी आर्थिक अडचण आल्यास ईएमआय भरणं कठीण जातं. अशावेळी मासिक हप्त्याची रक्कम कमी असल्यास ग्राहकाकडे पुरेशी रक्कम शिल्लक राहू शकते. पण यासाठी ग्राहकाला व्याजाचं ओझं अधिक काळ सहन करावं लागतं.
भविष्याचा अंदाज, ग्राहकाचं भविष्यातील उत्पन्न किती असेल, यावरही कर्जाचा कालावधी ठरवला जातो. भविष्यातील उत्पन्न वाढण्याचा साधारण अंदाज केला जाऊ शकतो. समजा येत्या 10 वर्षात तुम्ही निवृत्त होणार असाल तर केवळ 10 वर्षांचा कालावधीसाठीच कर्ज घ्यावं. त्यानंतर तुमचं उत्पन्न घटू शकतं. त्याचप्रमाणे 20 ते 35 वर्षे वयोगटातील तरुण अधिक कालावधीसाठी कर्ज घेऊ शकतात. हा कालावधी 25 वर्षांचाही असू शकतो. या कालावधीत त्यांचे उत्पन्न वाढू शकतं.