स्वप्न पूर्ण करायची असल्यास उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मात्र, उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. ज्या विद्यार्थ्यांची परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी शैक्षणिक कर्ज आर्थिक आधार ठरत असते. परंतु, शैक्षणिक कर्ज काढण्यापेक्षा ते फेडणे ही सर्वात मोठी समस्या असते.
शैक्षणिक कर्ज लवकरात लवकर फेडणे हे देखील तेवढेच गरजेचे आहे. तुम्ही देखील शिक्षणासाठी कर्ज काढले असेल तर ते लवकरात लवकर फेडण्यासाठी काय करू शकता, याविषयी जाणून घेऊयात.
शिक्षणासाठी कर्ज काढताना या गोष्टी ठेवा लक्षात
विद्यार्थ्यांच्या कोर्सनुसार बँकांकडून शैक्षणिक कर्ज दिले जाते. यावरूनच, कर्जाची रक्कम व परतफेडीचा कालावधीही ठरवला जातो. काही बँका कमी रक्कमेच्या शैक्षणिक कर्जासाठी तारणाशिवाय कर्ज देतात. मात्र, जास्त रक्कमेचे कर्ज असल्यास तारण ठेवणे गरजेचे असते. याशिवाय, विद्यार्थ्यांसह पालक देखील सह-अर्जदार असतात.
कधीही गरजेपेक्षा अतिरिक्त रक्कमेचे कर्ज काढू नका. तसेच, शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधीही कमी ठेवा. यामुळे कर्ज लवकरात लवकर फेडण्यास मदत होईल. कर्ज फेडण्यासाठी योग्य प्लॅनची निवड करणे देखील तितकेच गरजेचे आहे. तुम्ही सरकारी योजना, शैक्षणिक कर्ज सवलत, शिष्यवृत्तीचाही लाभ घेऊ शकता.
शैक्षणिक कर्ज लवकर फेडण्यासाठीच्या टिप्स
खर्चाचे बजेट | खर्च व बचतीचे योग्य नियोजन करून तुम्ही लवकरात लवकर शैक्षणिक कर्ज फेडू शकता. शैक्षणिक कर्ज काढत असताना पालक देखील सह-अर्जदार असतात, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातूनही कर्जाचे ईएमआय भरले जातील. याशिवाय, तुमचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरी करत असाल तर तुम्हीही जास्तीत जास्त कर्जाची रक्कम भरू शकता. खर्च व बचतीबाबत 50/30/20 चा नियम प्रामुख्याने पाळला जातो. उत्पन्नाच्या 50 टक्के रक्कम दैनंदिन खर्चासाठी, 30 टक्के रक्कम आवश्यक गोष्टी खरेदीसाठी व 20 टक्के रक्कम कर्ज व बचतीसाठी वापरली जाते. तुम्ही यामध्ये बदल करून जास्तीत जास्त रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरू शकता. |
पार्ट टाइम नोकरी | शिक्षण पूर्ण करत असताना पार्ट टाइम नोकरी करू शकता. यामुळे कर्जाचे हफ्ते भरण्यास मदत होईल. याशिवाय, नियमित नोकरी व्यतिरिक्त अतिरिक्त कमाईचे इतर मार्ग शोधल्यास लवकरात लवकर कर्ज फेडता येईल. शिक्षण पूर्ण करतानाही पार्ट टाइम नोकरी उत्पन्न सुरू असल्यास मोरोटोरियम कालावधीतही कर्जाची रक्कम फेडू शकता. |
मोरेटोरियम कालावधीत भरा व्याज | शैक्षणिक कर्ज काढल्यानंतर त्वरित हफ्ते भरण्याची प्रक्रिया सुरू होत नाही. कर्जाच्या प्रकारानुसार सुरुवातीचे काही महिने हफ्ते भरावे लागत नाहीत. या कालावधीला मोरेटोरियम म्हणतात. या कालावधीत कर्जाचे हफ्ते भरावे लागत नसले तरीही व्याज मात्र आकारले जाते. त्यामुळे या कालावधीतही हफ्ते भरल्यास कर्जाची रक्कम कमी होईल. त्यामुळे शिक्षण पूर्ण करत असतानाच नोकरी करण्याचा सल्ला दिला जातो. |
रिफायनान्स करा | तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करत असल्यास रिफायनान्सिंगचा विचार करू शकता. रिफायनान्सिंगमुळे तुम्हाला कमी व्याजदर अधिक चांगल्या अटींसह कर्जाची परतफेड करण्यास मदत होईल. शैक्षणिक कर्ज लवकरात लवकर फेडण्याचा हा चांगला मार्ग आहे. |