शैक्षणिक कर्ज काढताना अनेकदा अपुऱ्या माहितीमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शिक्षणासाठी कर्ज काढताना संपूर्ण माहिती घेणे गरजेचे असते. बँकाकडून कर्ज देताना छुपे शुल्क आकारले जाते व याचा फटका कर्जदाराला बसतो. त्यामुळे तुम्ही देखील शैक्षणिक कर्ज काढण्याचा विचार करत असाल तर त्याआधी छुप्या शुल्कांविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
कोणत्या बँकेकडून घ्यावे कर्ज?
शैक्षणिक कर्ज काढताना फारशी समस्या येत नाही. आवश्यक कागदपत्रे व तारण ठेवण्याची क्षमता असल्यास कोणत्याही बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होते. परंतु, कर्ज घेताना योग्य बँकेची निवड करणे गरजेचे आहे.
खासगी बँक, सरकारी बँक व एनबीएफसी अशा विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. परंतु, कर्ज काढताना या सर्वांची तुलना करणे गरजेचे आहे. तुलना करताना प्रामुख्याने व्याजदर, कर्ज फेडण्याचा कालावधी, मोरेटोरियम कालावधी, प्रोसेसिंग फी व इतर अतिरिक्त शुल्काचा माहिती घ्यायला हवी. सर्व गोष्टींची तुलना करून योग्य सुविधा देणाऱ्या बँकेची कर्जासाठी निवड करावी.
छुप्या शुल्काचा बसेल फटका
व्याजदर | शिक्षणासाठी कर्ज काढताना सर्वातआधी व्याजदराकडे लक्ष द्यायला हवे. कमी व्याजदर आकारणाऱ्या बँकेलाच कर्जासाठी प्राधान्य द्यावे. अनेकदा आपण 0.5 किंवा 1 टक्के व्याजदराच्या फरकाकडे दुर्लक्ष करतो. परंतु, यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. अवघ्या 0.5 टक्के अतिरिक्त व्याजदरामुळे तुम्हाला हजारो रुपये जास्त भरावे लागू शकतात. |
मोरेटोरियम कालावधी | शैक्षणिक कर्ज काढल्यानंतर बँकांकडून मोरेटोरियम कालावधी दिला जातो. सर्वसाधारणपणे कालावधीत कर्जाचे हफ्ते भरावे लागत नाही. बँकेनुसार सरळव्याज किंवा चक्रवाढ दराने व्याज आकारले जाते. त्यामुळे याबाबत बँकेकडून सर्व माहिती घ्यावी. |
प्रोसेसिंग फी | बँकांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली हजारो रुपये आकारले जाते. अनेक बँका ठराविक रक्कमेच्या कर्जासाठी प्रोसेसिंग फी आकारात नाही. त्यामुळे कर्ज काढण्याआधी याबाबत माहिती जाणून घेतल्यास तुमचे हजारो रुपये वाचतील. |
कर्ज विमा | बँकांकडून विम्याच्या नावाखाली कर्जाच्या रक्कमेतूनच मोठी रक्कम वजा केली जाते. समजा, तुम्ही 5 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतले आहे. अशावेळी विम्याच्या नावाखाली या रक्कमेतनच 20 ते 25 हजार रुपये वजा केले जातात. यामुळे हातात येणारी मूळ रक्कम ही कर्जाच्या रक्कमेपेक्षा कमी असते. |
प्रीपेमेंट दंड | अनेकजण पैशांची बचत करून कर्ज लवकर फेडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशावेळी बँकेकडून प्रीपेमेंट दंड आकारला जातो. त्यांना व्याजाच्या स्वरुपात मिळणारी रक्कम गमवावी लागल्याने हा दंड आकारला जातो. त्यामुळे शैक्षणिक कर्ज काढताना या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेऊनच निर्णय घेतल्यास हजारो रुपये वाचवू शकाल. |
कर्जाशिवाय उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे मार्ग
शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्ज काढणे हा चांगला पर्याय असला तरीही याचा सर्वात शेवटचा मार्ग म्हणून वापर करायला हवा. कारण, उत्पन्न सुरू होण्याआधीच विद्यार्थी कर्जबाजारी होतात. याशिवाय, शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही कर्ज फेडावे लागते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळेलच याचीही हमी नसते. त्यामुळे कर्जाशिवाय, उच्च शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा.
कर्जाशिवाय उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे सर्वोत्तम मार्ग हा शिष्यवृत्ती आहे. तुम्ही शिष्यवृत्तीच्या मदतीने तुम्ही परदेशात जाऊनही शिक्षण पूर्ण करू शकता. याशिवाय, ऑनलाइन शिक्षणाचाही चांगला पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही शिक्षण पूर्ण करतानाच पार्ट टाईम नोकरीद्वारे आर्थिक गरजा पूर्ण करू शकता.