गेल्याकाही वर्षात शिक्षण घेणे महाग झाले आहे. अगदी केजीपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी दरवर्षी हजारो रुपये खर्च करावे लागतात. उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असल्यास त्याचा खर्च लाखो रुपये येतो. अशावेळी, मुलांच्या भविष्यासाठी पालकांपुढे बँकेकडून शैक्षणिक कर्ज काढण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो.
अनेक बँका शिक्षणासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करतात. कमी व्याजदरात इतर सुविधांसह कर्ज देणाऱ्या अशाच काही बँकांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक कर्ज दिले जाते. बँकेकडून बडोदा स्कॉलर, स्किल लोन, बडोदा विद्या अशा विविध शैक्षणि कर्ज योजना राबवल्या जातात. या योजनांतर्गत बँकेकडून दीड लाख रुपयांपासून ते 80 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी 10 ते 15 वर्षाचा कालावधी दिला जातो. या कर्जावर 8 ते 10 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारले जाते. विशेष म्हणजे बँकेकडून कर्ज घेताना प्रोसेसिंग शुल्क लागत नाही. अर्जदार पालकांसह शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतात.
यूनियन बँक ऑफ इंडिया
यूनियन बँक ऑफ इंडियाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 8.15 ते 12.55 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. बँकेद्वारे 4 लाखांपासून ते 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते. या कर्जामध्ये ट्यूशन शुल्क, हॉस्टेल शुल्क, शालेय वस्तूसह विविध शैक्षणिक खर्चांचा समावेश केला जातो. तसेच, कर्ज घेताना स्कॉलरशिपचा देखील यात समावेश केला जातो. यात जीवन विम्याचा देखील समावेश असतो.
एचडीएफसी बँक
भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेद्वारे कमी व्याजदरासह शैक्षणिक कर्ज दिले जाते. बँकेकडून 9.55 टक्के सुरुवाती व्याजदरासह दीड लाख रुपयांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्ज परतफेडीचा कालावधी 15 वर्ष आहे. कर्ज घेताना निवासी मालमत्ता, मुदत ठेव, डेट म्युच्युअल फंड, विम्याचा तारण म्हणून वापर करता येईल. तसेच, शैक्षणिक कर्ज काढल्यास व्याजदरातही सवलत मिळते.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून विद्यार्थ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज दिले जाते. या कर्जावरील व्याजदर हे जवळपास 8.15 ते 11.15 टक्के आहे. 20 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही प्रोसेसिंग शुल्कही आकारले जात नाही. तसेच, 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवण्याची गरज नाही. या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 15 वर्ष आहे.
इतर बँकाही देतात शैक्षणिक कर्ज
पंजाब नॅशनल बँक, यूको बँक, आयसीआयसीआय बँक, सारस्वत बँक, बँक ऑफ महाराष्ट्रासह अनेक बँका देशांतर्गत व परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी कमी व्याजदरासह कर्ज देतात. या बँकांकडून कर्जाची रक्कम व कालावधीनुसार 7 ते 12 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारले जाते.