गेल्या दोन तीन महिन्यांत कर्जाचा व्याजदर वाढत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर बऱ्याचशा कर्ज देणाऱ्या संस्था बँका आणि गृहकर्ज कंपन्यांनी कर्जदरात वाढ केली. त्यामुळे कर्जदारांना जबर फटका बसला आहे. कर्जाचा मासिक हप्ता भरताना त्यांना जादा पैशांची तजवीज करावी लागत आहे. जे नव्याने गृहकर्ज घेणार आहेत ते गृहकर्ज देणाऱ्या विविध संस्थांच्या व्याजदरांची तुलना करू शकतात आणि सर्वात कमी व्याजदराची निवड करू शकतात. पण ज्यांनी आधीच गृहकर्ज घेतलं आहे, त्यांच्यासाठी कोणते पर्याय आहेत? चालू गृहकर्जावरचं व्याज गृहवित्त कंपनीने कमी केलं नसेल तर तुम्ही चालू कर्ज दुसऱ्या गृहवित्त कंपनीकडे हस्तांतरित करू शकता. पण ते करण्यापूर्वी काही गोष्टींची खातरजमा करून घ्या.
Table of contents [Show]
सध्याच्या गृहवित्त कंपनीशी संपर्क साधा
नवीन गृहवित्त कंपनी किंवा बँकेकडे जाण्यापूर्वी सध्या जिथे लोन सुरु आहे त्या बँकेशी किंवा कंपनीशी संपर्क साधावा. वन-टाइम स्वीचिंग शुल्क आकारून कदाचित तुमची सध्याची गृहवित्त कंपनी अधिक चांगला दर देऊ शकेल. भारतातली गृहकर्ज बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्याची गृहवित्त संस्था गृहकर्जाचा स्पर्धात्मक दर देऊ शकत नसेल तर तुम्ही कमी व्याजदर असणाऱ्या दुसऱ्या गृहवित्त कंपनीकडे आपलं गृहकर्ज हस्तांतरित करू शकता.
व्याजदराचा फायदा विरुद्ध शिफ्टिंगची किंमत
गृहकर्ज हस्तांतरित करायचं झाल्यास त्यासाठी ठराविक शुल्क भरावं लागतं. यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि इतर संबंधित ट्रान्स्फर शुल्क भरावं लागतं. शिवाय नव्या कर्जासाठीचे स्टॅम्पिंग दर असतात ते वेगळेच. या अदलाबदलीची किंमत साधारणतः उर्वरित कर्जाच्या रकमेच्या 0.5% ते 1.5% असते. बदलीचा निर्णय हा तुमच्या गृहकर्जाच्या उर्वरित कालावधीवर आणि मिळणाऱ्या नव्या व्याजदराचा फायदा गृहकर्जाच्या उर्वरित कालावधीसाठी मिळून एकूण कमी होणारं शुल्क यावर अवलंबून असतो.
प्री-पेमेण्ट पेनल्टी (Pre Payment Penalty)
वैयक्तिक फ्लोटिंग दराने गृहकर्ज घेतलं असल्यास त्यावर कोणतीही प्री-पेमेण्ट पेनल्टी लागत नाही. पण तुम्ही फिक्स्ड दराने गृहकर्ज घेतलं असल्यास कर्जाच्या उर्वरित रकमेवर प्री-पेमेण्ट पेनल्टी भरावी लागू शकते. निर्णय घेण्यापूर्वी या मुद्द्याचा अवश्य विचार करावा.
परतफेडीचा रेकॉर्ड स्वच्छ ठेवणे
भूतकाळात हे कर्ज किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही कर्जाची परतफेड करताना एखाद-दुसरा हप्ता तुम्ही चुकवला असेल तर कर्ज ट्रान्स्फर होण्यात अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमच्या पुढे एकच पर्याय असतो, आपल्या सध्याच्याच गृहकर्ज संस्थेला चिकटून राहणं.
वरील मुद्दे समजून घेतल्यानंतर तुम्ही गृहकर्ज दुसऱ्या कंपनीकडे ट्रान्स्फर करण्याचा निर्णय घेतलाच असेल तर नव्या वित्तसंस्थेशी कर्जासंदर्भात संपर्क साधा. या स्वीचिंग प्रक्रियेदरम्यान, नवी गृहकर्ज संस्था कदाचित तुम्हाला टॉप-अप कर्जही देऊ करेल. नवी आर्थिक गरज उद्भवल्यास तुम्ही या कर्जाचा पर्यायही स्वीकारू शकता. तुम्हाला देण्यात आलेला नवा व्याजदर हा अल्पकालिन नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी सर्व कागदपत्रं व्यवस्थितपणे पाहा. नियम आणि अटी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांचा थेट परिणाम हा तुमच्या निव्वळ कर्जावर होत असतो. तुम्हाला कोणत्या शंका असल्यास आपल्या रिलेशनशिप मॅनेजरकडून त्यांचं निरसन करून घ्या. गृहकर्जाचं उत्तमरित्या व्यवस्थापन केल्यास व्याजदरापोटी भरल्या जाणाऱ्या रकमेत बऱ्यापैकी घट होऊ शकेल. यामध्ये गृहकर्ज ट्रान्स्फर करण्याच्या निर्णयामुळे बराच फरक पडू शकेल.