चांगले शिक्षण घेऊन करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्रत्येकाचा विचार असतो. मात्र, अनेकदा पैशांभावी आवडीच्या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करता येत नाही. अनेकांचे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. परंतु, आर्थिक परिस्थितीमध्ये हे शक्य होत नाही. अशावेळी शैक्षणिक कर्ज हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येतो. तुम्ही देखील शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी त्याबाबत सविस्तर जाणून घेणे गरजेचे आहे.
शैक्षणिक कर्जासाठी पात्रता
शैक्षणिक कर्ज घेण्याआधी त्याबाबत सविस्तर जाणून घ्यायला हवे. शैक्षणिक कर्जाचे वेगवेगळे प्रकार पडतात. देशांतर्गत अथवा देशाबाहेर, पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षणानुसार कर्ज मिळते. अनेक बँका विद्यार्थ्यांना सहज शैक्षणिक कर्ज देतात. मात्र, यासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
कर्जासाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा भारतीय असायला हवा. त्याचे वय 18 ते 35 वर्ष असायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याला देशांतर्गत अथवा देशाबाहेर शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळालेला असावा. शैक्षणिक प्रवेशाची कागदपत्रे कर्जासाठी अर्ज करताना सादर करावी लागतात. बारावी, पदवीमध्ये चांगले गुण असल्यास कर्ज घेताना नक्कीच फायदा होऊ शकतो. तसेच, कर्जासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांसोबत पालक देखील सहअर्जदार असतात. त्यामुळे पालकांचा नियमित उत्पन्न स्त्रोत असणे अत्यंत गरजेचे आहे.
योग्य कागदपत्रांसह तुम्ही कोणत्याही बँकेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केल्यास त्वरित कर्ज मिळेल. मात्र, त्याआधी तारण, पात्रता, व्याजदर, परतफेड कालावधी व कर्जासोबत मिळणाऱ्या इतर सुविधांबाबत सविस्तर जाणून घ्या.
शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र
- वयाचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- पालकांच्या उत्पन्नाचा पुरावा
- पेमेंट स्लीप, आयटीआर भरल्याचा पुरावा, बँक स्टेटमेंट
- मार्कशीट्स
- शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाल्यासंबंधीत पुरावे
- विद्यार्थी व्हिसा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
शैक्षणिक कर्जासाठी कसा कराल अर्ज?
- सर्वातआधी तुमचे शिक्षण व खर्चाच्या आकडेवारीनुसार कर्जाबाबत सविस्तर माहिती घ्या.
- कर्जासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
- विविध बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जाची माहिती घेऊन तुलना करा.
- त्यानंतर तुम्ही कागदपत्रांसह निवड केलेल्या बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकता.
- योग्य कागदपत्रे, तारणासंबंधी माहिती दिल्यास अर्ज केल्यानंतर काही दिवसातच बँकेकडून कर्ज मंजूर केले जाईल.
या बँकांद्वारे मिळेल शैक्षणिक कर्ज
भारतातील अनेक बँका विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देतात. यामध्ये प्रामुख्याने एसबीआय, एचडीएफसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदाचा समावेश आहे.
या बँका 8.50 ते 13 टक्के व्याजदरासह 1 लाख रुपयांपासून ते 80 लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज देतात. तसेच, या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा 12 ते 15 वर्ष असतो. कर्जाच्या परतफेडीसाठीही बँकांद्वारे विविध सुविधा दिल्या जातात. एवढेच नाही तर या कर्जामध्ये शिक्षणाशी संबंधित इतर खर्चासह जीवन विम्याचाही समावेश असतो. अनेक बँक तारणाशिवाय कमी कर्ज उपलब्ध करतात. तुम्ही कर्जासोबतच शिष्यवृत्ती, सरकारी योजनांचीही शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत घेऊ शकता.