Long-Term Financial Goal: देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळावे तसेच त्यातून त्यांना चांगला परतावा मिळावा. यादृष्टीने सरकार, नॉन-बॅंकिंग कंपन्या आणि सरकारी तसेच खासगी बॅंका बचतीच्या योजना राबवत आहे. पण या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपला गुंतवणुकीचा उद्देश, गुंतवणुकीचा कालावधी आणि त्यातून मिळणारा परतावा लक्षात घेऊन त्यात गुंतवणूक करणे उचित ठरू शकेल. तर आज आपण बचत योजना म्हणजे काय? अल्प बचत योजना कोणत्या आहेत? तसेच या योजनांमधून दीर्घकालीन गुंतवणूक करू शकतो का? याची आढावा घेणार आहोत.
बचत योजना म्हणजे काय?
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळावे तसेच त्या गुंतवणुकीतून त्यांना चांगला परतावा मिळावा. यासाठी विशेषकरून सरकार बचत योजना राबवते. या योजनांमधून नागरिकांना बचतीची सवय लावणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. तसेच नियमित खर्चातून बचत केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. ज्याचा भविष्यासाठी वापर करता येऊ शकतो.
बचत योजना या सरकारबरोबरच नॉन-बॅंकिंग कंपन्या, पोस्ट ऑफिस, सरकारी व खासगी बॅंकांतर्फे राबवल्या जातात. या योजनांना अल्प बचत योजना असेही म्हटले जाते. यामध्ये राष्ट्रीय बचत योजना (National Saving Certificate), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme), आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit), पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund), किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra), सुकन्या समृ्द्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana), अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund) या योजनांचा समावेश होतो. या योजनांचे व्याजदर केंद्र सरकारतर्फे प्रत्येक 3 महिन्यांनी जाहीर केले जातात. साधारण या सर्व योजनांवर किमान 6.7 टक्क्यांपासून 8.6 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बचत योजना कितपत फायदेशीर
सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध बचत योजनांवर चांगले व्याजदर दिले जात आहे. तसेच या योजनांमधील गुंतवणूक दीर्घकाळासाठी ठेवल्यास गुंतवणूकदाराकडे एक चांगला कॉर्पस (संपत्ती निर्मीतीसाठी गुंतवलेला निधी) निर्माण होऊ शकतो. तसेच यातील बहुतांश योजनांमधून गुंतवणूकदाराला चांगल्या रिटर्नसह टॅक्समध्ये सवलतही मिळते. त्यामुळे दीर्घकाळातील गुंतवणूक म्हणून या योजना फायद्याच्या ठरू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही मुलींसाठी गुंतवणुकीची सरकारी योजना आहे. या योजनेमध्ये किमान 250 रुपयांपासून ते 1.50 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. तसेच यामध्ये केलेली गुंतवणूक मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत काढता येत नाही. 18 वर्षानंतर मुलीच्या शिक्षणासाठी जमा झालेल्या एकूण रकमेतून 50 टक्के काढता येऊ शकते आणि उर्वरित रक्कम ही मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी काढण्याची तरतूद आहे.
त्याचप्रमाणे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजनेत किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असून त्यावर सध्या 7.1 टक्के व्याजदर दिला जात आहे. तसेच राष्ट्रीय मासिक बचत योजनेत (National Saving Monthly Scheme) किमान 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
अशाप्रकारे बचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच या योजनांचा सरकारतर्फे प्रत्येक 3 महिन्यांनी आढावा घेतला जातो. तसेच त्याच्या व्याजदरातही बदल केला जातो. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या योजनेचा आढावा घेऊन त्यातून बाहेर पडण्याचा किंवा त्यातील गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेता येऊ शकतो.
(डिसक्लेमर: कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही.)