इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय गोष्टींपैकी एक म्हणजे तुम्ही तुमचे पैसे दुप्पट कसे कराल? ही आहे. याचे उत्तर द्यायचेच झाले तर आणि सरकारी योजनांच्या स्वरूपात सांगायचे झाले तर, किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Yojana 2023) योजनेमध्ये केलेली गुंतवणूक आपले पैसे, आपली गुंतवणूक एका निश्चित कालावधीमध्ये दुप्पट करण्याची हमी देते. हमखास लाभाची शाश्वती (Guaranteed Benefits) आणि कमीत कमी जोखीम (Minimal Risk) असे स्वरूप असलेली आणि बाजारातील चढ-उतारांचा कोणताही परिणाम होऊ न देता, मॅच्युरिटीच्या टप्प्यावर कस्टमर्सनी केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट रिटर्न्स देणारी ही पोस्टाच्या लोकप्रिय योजनांपैकी एक आहे.
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) असे जरी नामकरण असले तरीदेखील केवळ आपापल्या अन्नदात्यांपुरती, शेतकरी बांधवांपर्यंत ही योजना मर्यादित नसून कोणीही भारतीय नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करून लाभ प्राप्त करून घेऊ शकतो. या बचत योजनेमध्ये गुंतवणूक केल्याचे सर्टिफिकेट आपल्याला पोस्ट-ऑफिस द्वारे देण्यात येते. अलीकडेच केंद्र सरकारने जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीसाठी किसान विकास पत्र संबधित व्याज-दर वाढविले आहेत. यापूर्वी असलेल्या 7.0% प्रतिवर्ष व्याज-दरावरून 7.2% इतक्या प्रतिवर्ष चक्रवाढ व्याज-दरामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.
Table of contents [Show]
120 महिन्यांत होणार रक्कम दुप्पट
किसान विकास पत्रामध्ये केलेली गुंतवणूक पूर्वी लागणाऱ्या कालावधीपेक्षा 3 महिने लवकर दुप्पट होण्यास मदत होणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांची रक्कम 123 महिन्यांच्या ऐवजी 120 महिन्यांच्या कालावधीमध्येच दुप्पट होईल. प्रत्येक वर्षाच्या शेवटी व्याजाची रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यात जोडली जाते आणि चक्रवाढ व्याजानुसार रक्कम वाढतच जाते.
100च्या पटीत कितीही रक्कम गुंतवता येते
KVP म्हणजे किसान विकास पत्रामध्ये अगदी आपण 1000 रुपयांपासून देखील गुंतवणूक करू शकतो. यापूर्वी 1,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये अशाच स्वरूपात गुंतवणूक करता येत होती. पण आता आपल्याला 100 च्या पटींमध्ये कितीही रकमेची गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा (Maximum Limit) नाही. शिवाय या योजनेंतर्गत कितीही अकाऊंटस् ओपन करता येतात. तसेच पोस्ट ऑफिसासोबतच काही अधिकृत बँकांमध्ये देखील KVP साठी अकाउंट सुरु करता येते. यामध्ये गुंतवणूक केलेली आपली रक्कम आपल्याला सरकारद्वारे 120 महिने म्हणजेच 10 वर्षांत दुप्पट करून परत केली जाते.
किसान विकास पत्र कोण खरेदी करू शकतो ?
- भारताचा सज्ञान नागरिक म्हणजे वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती किसान विकास पत्र खरेदी करू शकतो.
- अल्पवयीन (minor) तसेच मानसिक व्यंग असलेल्या व्यक्तींच्यावतीने प्रौढ व्यक्ती, आई-वडील देखील KVP खाते ओपन करू शकतात
- 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावाने देखील किसान विकास पत्र खाते (Kisan Vikas Patra Account) उघडता येते.
- हिंदू अविभाज्य कुटुंब (HUF) आणि अनिवासी भारतीय (NRI) मात्र किसान विकास पत्र या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत.
किसान विकास पत्र खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे
- KYCसाठी आईडी प्रूफ (आधार कार्ड / PAN कार्ड / वोटर ID /ड्राइविंग लायसन्स / पासपोर्ट)
- किसान विकास पत्र काढण्यासाठी अर्ज
- रहिवासाचा पुरावा
- जन्माचा दाखल (बर्थ सर्टिफिकेट)
किसान विकास पत्राची वैशिष्ट्ये
किसान विकास पत्र, सुरुवातीला शेतकऱ्यांना बचत करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आले होते. नंतर कोणत्याही सामान्य नागरिकाला ते खरेदी करण्याची सूट देण्यात आली.
KVP हे एका व्यक्तीसाठी सिंगल अकाऊंट (Single Account), तसेच जास्तीत जास्त 3 प्रौढ व्यक्तींसाठी संयुक्त खाते [प्रकार A] आणि संयुक्त खाते [प्रकार B] असे जॉईंट अकाउंट (Joint Account) स्वरूपामध्ये देखील ओपन करता येते.
किसान विकास-पत्राच्या खरेदीसमयीच मॅच्युरिटी कालावधी, तसेच KVP अकाउंट ओपन करीत असताना असणारा व्याज-दर संपूर्ण गुंतवणुकीच्या कालावधीमध्ये कायम राहत असल्याने गॅरंटीड बेनिफिट्स (Guaranteed Benefits) आहेत.
यामध्ये जमा केलेले पैसे भारत सरकारकडे जातात, ज्यावर व्याज आणि मॅच्युरिटी अमाऊंट मिळते, म्हणजेच रिस्क-फ्री गुंतवणूक (Risk-Free Investment) आहे.
नॉमिनी ठेवण्याची सोय असल्याने खातेदाराच्या मृत्यूनंतरदेखील, जमा केलेली रक्कम प्राप्त करणारी व्यक्ती निश्चित करता येते.
बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी, किसान विकास पत्र ठेवीचा वापर कर्जासाठी तारण (Collateral for Loans) म्हणून करता येते आणि सवलतीच्या दराने कर्ज देखील प्राप्त होते.
विशिष्ट परिस्थितीत, मुदतपूर्व कालावधीमध्ये म्हणजे खाते ओपन केल्याच्या तारखेपासून अडीच वर्षानंतरही किसान विकास पत्र खात्यातून पैसे काढता येतात. अशा पैसे काढण्यावर कोणताही दंड आकारला जात नाही आणि व्याज देखील पूर्ण भरले जाते.
KVP खाते मुदतपूर्व म्हणजे खाते ओपन केल्याच्या तारखेपासून 2 वर्षे 6 महिन्यांनंतर खाते बंद देखील करता येऊ शकते. तसेच खाते अन्य व्यक्तीच्या नावे देखील ट्रान्सफर करता येऊ शकते.