महागाई आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये सोन्याला नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिले आहे. 2025 मध्ये सोन्याच्या दरांनी विक्रमी उंची गाठल्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा या धातूकडे वळले आहे.
तुमचा पोर्टफोलिओ संतुलित ठेवण्यासाठी सोन्यात किती गुंतवणूक करावी, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एकूण गुंतवणुकीत 5 ते 15 टक्क्यांपर्यंत सोने ठेवणे हा सर्वात सुरक्षित आणि संतुलित मार्ग आहे.
काय आहे 5 ते 15% चा फॉर्म्युला?
या 5-15% फॉर्म्युल्यानुसार, तुमच्या एकूण गुंतवणुकीचा केवळ तेवढाच भाग सोन्यात असावा, जो तुमची जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य असेल.
- जोखीम घेणारे गुंतवणूकदार: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये सक्रिय असाल आणि जास्त जोखीम घेऊ शकत असाल, तर 5% सोने पुरेसे आहे.
- सुरक्षितता शोधणारे गुंतवणूकदार: जर तुम्हाला गुंतवणुकीत स्थिरता हवी असेल किंवा निवृत्तीसारख्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांच्या जवळ असाल, तर 10 ते 15 टक्के सोने तुमच्या पोर्टफोलिओला संतुलन देईल.
सोने तुम्हाला त्वरित जास्त परतावा देणार नसले तरी, बाजारातील मोठ्या घसरणीच्या काळात ते तुमच्या गुंतवणुकीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
उदाहरण: तुमचा पोर्टफोलिओ 20 लाख रुपयांचा असल्यास, सोन्यातील गुंतवणूक 1 लाख (5%) ते 3 लाख (15%) रुपयांदरम्यान असावी.
रुपया घसरला की सोने वाढते:
भारतात सोन्याच्या किमतीवर रुपयाच्या मूल्याचा मोठा परिणाम होतो. ऑक्टोबर 2025 मध्ये रुपया 88.8 प्रति डॉलरच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता. जेव्हा रुपया कमकुवत होतो, तेव्हा सोने महाग होते. बाजारात अस्थिरता असताना सोने तुमच्या पोर्टफोलिओची सुरक्षा करते, हेच याचे मुख्य कारण आहे.
कोणत्या स्वरूपात सोने ठेवावे?
- गोल्ड ETF / म्युच्युअल फंड: तुमच्याकडे डीमॅट खाते असल्यास, गोल्ड ETF किंवा म्युच्युअल फंड हा सोपा आणि डिजिटल मार्ग आहे. तुम्ही शेअरप्रमाणे कधीही त्याची खरेदी-विक्री करू शकता किंवा SIP द्वारे हळूहळू गुंतवणूक वाढवू शकता.
- सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB): तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सॉवरेन गोल्ड बॉन्ड सर्वात चांगला पर्याय आहे. यात दरवर्षी 2.5% व्याज मिळते आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते.
- फिजिकल गोल्ड: फिजिकल सोन्यात मेकिंग चार्जेस, जीएसटी आणि स्टोरेजची झंझट असते. त्यामुळे आजच्या काळात डिजिटल सोने अधिक फायदेशीर ठरते.
टॅक्स आणि टाइमिंगचे महत्त्व:
गोल्ड ETF किंवा म्युच्युअल फंडात 1 वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक ठेवल्यास त्यावर 12.5% दीर्घकालीन भांडवली नफा कर लागतो. तर SGB मध्ये मॅच्युरिटीनंतर संपूर्ण रक्कम करमुक्त असते, फक्त दरवर्षी मिळणारे व्याज उत्पन्नात समाविष्ट होऊन करपात्र होते.