Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SCSS Updates : पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतले नियम बदलले, जाणून घ्या तपशील

SCSS Updates : पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतले नियम बदलले, जाणून घ्या तपशील

SCSS Updates : ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतले नियम अद्ययावत करण्यात आले आहेत. योजना अंतर्गत वाढीव ठेव मर्यादेच्या अधिसूचनेनंतर पोस्ट विभागानं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर योजनेचा तपशील अपडेट केला आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office)ऑफर केलेल्या अद्ययावत ज्येष्ठ नागरिक बचत खात्याबद्दलचे महत्त्वाचे नियम किंवा मुद्दे माहीत असायलाच हवेत.

सरकारपुरस्कृत योजनेमध्ये याचा समावेश आहे. इतर बचत योजनांपेक्षा या योजनेत जास्त व्याजदर मिळतो. 30 जून 2023ला संपणाऱ्या तिमाहीसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना यात व्याजदर 8.2% इतका असणार आहे. आधीच्या तिमाहीत (1-1-2023 ते 31-3-23) तो 8 टक्के होता. 1-10-2022 ते 31-12-2022 या तिमाहीत तो 7.60 इतका होता. मागच्या वर्षात काही वर्षांचा विचार केल्यास तो कमीतकमी 7 आणि जास्तीत जास्त 9 टक्क्यांपर्यंत गेल्याचं दिसून येतं.

सुरक्षित गुंतवणूक पर्याय 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) गुंतवणूक मर्यादाही या अर्थसंकल्पात वाढवण्यात आलीय. SCSS हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. हे नियमित उत्पन्न प्रवाह प्रदान करते आणि त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वर्षांमध्ये त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात मदत करते.

व्याज देय 

पहिल्या वेळी 31 मार्च/30 सप्टेंबर/31 डिसेंबरच्या ठेवीच्या तारखेपासून व्याज देय असेल. त्यानंतर 31 मार्च,  30 जून,  30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी व्याज देय असेल. 

किमान आणि कमाल रक्कम

एका व्यक्तीनं उघडलेल्या सर्व SCSS खात्यांमध्ये 1000 रुपयांच्या पटीत आणि कमाल 30 लाख रुपयांपेक्षा जास्त नसलेल्या खात्यात फक्त एकच ठेव तुम्ही करू शकता.

कर लाभ

SCSS ठेवी 1.5 लाख रुपयांच्या मर्यादेच्या अधीन कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरतील.

कोण उघडू शकतं?

खालील श्रेणीतील व्यक्ती SCSS खाती उघडू शकतात

  • 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती
  • 55 वर्षांच्या वरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त नागरी कर्मचारी. अशा व्यक्तींनी सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत त्यांची ज्येष्ठ नागरिक बचत योजना गुंतवणूक करणं गरजेचं आहे.
  • 50 वर्षांच्या वरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त सैनिकी, संरक्षण दलातले कर्मचारी. अशा व्यक्ती निवृत्तीचे लाभ मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्यांची ज्येष्ठ नागरिक बचत योजना गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करतात.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना संयुक्त खाते 

वैयक्तिक क्षमतेनं किंवा फक्त जोडीदारासोबत संयुक्तपणे ज्येष्ठ नागरिक बचत योजना खातं उघडू शकता. त्याचबरोबर संयुक्त खात्यातल्या ठेवीची संपूर्ण रक्कम केवळ पहिल्या खातेदारालाच दिली जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना मॅच्युरिटी

तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजना खातं उघडल्याच्या तारखेपासून 5 वर्षांनंतर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह विहित अर्ज सबमिट करून बंद करू शकता.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते विस्तार

संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह विहित फॉर्म भरून ज्येष्ठ नागरिक बचत योजना खातं मुदतपूर्तीच्या तारखेपासून आणखी 5 वर्षे वाढवू शकता. मुदतवाढीसाठी, तुम्हाला मॅच्युरिटीच्या 1 वर्षाच्या आत अर्ज करावा लागणार आहे. मुदतपूर्तीच्या तारखेला लागू होणारं व्याज विस्तारित खात्यावर मिळेल.