Top Government Schemes: वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मागील आर्थिक वर्षात सातत्याने रेपो दरात वाढ केली. ही वाढ साधारण 2.50 टक्क्यांनी वाढल्याने रेपो दर सध्या 6.50 टक्के आहे. वाढत्या रेपोदराबरोबच सरकारने सरकार बचत आणि गुंतवणूक योजनांवरील व्याजदरातही वाढ केली. यामुळे वाढत्या महागाईचा सामना करत असताना गुंतवणूकदारांना सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून अधिकाधिक लाभ मिळवता येईल.
सध्या केंद्र सरकारतर्फे विविध प्रकारच्या बचत योजना राबवल्या जात आहेत. त्यात सरकार त्यावर चांगला व्याजदर देत आहे. त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. आज आपण अशाच सरकारी योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यातून गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त फायदा मिळत आहे.
Table of contents [Show]
- राष्ट्रीय बचत योजना (National Saving Certificate)
- राष्ट्रीय मासिक बचत योजना (National Saving Monthly Scheme)
- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund-PPF)
- राष्ट्रीय सेव्हिंग टाईम डिपॉझिट स्कीम (National Saving Time Deposit Scheme)
- आवर्ती मुदत बचत योजना (Recurring Deposit Saving Scheme)
- ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)
- सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)
- पोस्ट ऑफिस बचत योजना (Post Office Saving Scheme)
- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Saving Certificate Scheme)
- किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra)
राष्ट्रीय बचत योजना (National Saving Certificate)
राष्ट्रीय बचत योजनेमध्ये गुंतवणूकदार 1 हजार रुपये भरून खाते सुरू करू शकतात. या खात्यातील रकमेवर सरकारने एप्रिल ते जून या 3 महिन्यांकरीता 7.7 टक्के व्याजदर निश्चित केले. खाते सुरू केल्यानंतर त्यात गुंतवणूकदार 100 च्या पटीने कितीही पैसे जमा करू शकतो.
राष्ट्रीय मासिक बचत योजना (National Saving Monthly Scheme)
राष्ट्रीय मासिक बचत योजना ही पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी बचत गुंतवणूक योजना आहे. या सरकारी योजनेमध्ये 1 हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून कमाल 9 लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे असून त्यावर एप्रिल ते जून या 3 महिन्यांसाठी 7.4 टक्के व्याज निश्चित करण्यात आले.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund-PPF)
सर्वाजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ खात्यामध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. याची गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.50 लाख रुपये आहे. यावर सरकार 7.1 टक्के व्याज देते. याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. तसेच इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 10 अंतर्गत या योजनेवर मिळणारे व्याज हे टॅक्स फ्री आहे.
राष्ट्रीय सेव्हिंग टाईम डिपॉझिट स्कीम (National Saving Time Deposit Scheme)
राष्ट्रीय सेव्हिंग टाईम डिपॉझिट स्कीम ही पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदार 1 हजार रुपयांपासून खाते सुरू करू शकतात. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीने कितीही गुंतवणूक करता येऊ शकते. या योजनेत 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकतात. त्यावर एप्रिल ते जून या 3 महिन्यांकरीता अनुक्रमे 6.80, 6.90, 7.00 आणि 7.5 टक्के व्याजदर निश्चित केला. या योजनेंतर्गत इन्कम टॅक्स कायद्यातील 80C कलमानुसार टॅक्समध्ये सवलत मिळते.
आवर्ती मुदत बचत योजना (Recurring Deposit Saving Scheme)
आवर्ती मुदत बचत योजनेचे खाते हे किमान 100 रुपयांनी सुरू करता येते. यामध्ये गुंतवणूकदाराच्या इच्छेनुसार 6 किंवा 12 महिन्यांची रक्कम एकदम भरू शकतो. याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. यावर प्रत्येक 3 महिन्यांनी चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूकदाराला व्याज दिले जाते. सध्याचा व्याजदर 6.2 टक्के आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)
ही योजना खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. यात 55 वर्षावरील निवृत्त नागरिक किंवा 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेवर 1 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 पर्यंतच्या कालावधीसाठी 8.20 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स कायद्यातील 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळते.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)
सुकन्या समृद्धी योजना ही विशेषकरून मुलींसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये किमान 250 रुपयांपासून कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. 10 वर्षांखालील मुलींचे खाते या योजनेंतर्गत सुरू करता येते. या योजनेवर सरकारने एप्रिल ते जून या कालावधीसाठी वार्षिक 8 टक्के व्याज निश्चित केले. यामध्ये जमा झालेल्या रकमेवर इन्कम टॅक्स कायद्यातील 80C अंतर्गत कर सवलत मिळते.
पोस्ट ऑफिस बचत योजना (Post Office Saving Scheme)
पोस्ट ऑफिसद्वारे राबवल्या जाणाऱ्या या योजनेत किमान 500 रुपयांपासून खाते सुरू करता येते. यामध्ये कमाल रक्कम जमा करण्यासाठी कोणती मर्यादा नाही. यावर 4 टक्के व्याज मिळते. यातील 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कायद्यातील तरतुदीनुसार कर सवलत मिळते.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Saving Certificate Scheme)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती. यावर सरकारने दर 2 वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. या योजनेमध्ये महिला मुलींच्या नावावर 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात.
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra)
पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी ही योजना खासकरून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. पण या योजनेंतर्गत कोणताही नागरिक खाते सुरू करू शकतो. यात जमा होणारी रक्कम ही एका विशिष्ट कालावधीनंतर दुप्पट होऊ शकते. यावर एप्रिल ते जून या तिमाहीसाठी 7.5 टक्के व्याज जाहीर केले.
या सरकारी योजनांद्वारे गुंतवणूकदारांना निश्चित असा परतावा मिळू शकतो. तसेच मार्केटमधील इतर बचत योजनांच्या तुलनेत यावर मिळणारा व्याजदर हा चांगला असल्याने गुंतवणूकदारांचा निश्चित फायदा होऊ शकतो.
(डिसक्लेमर: कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही.)