अटल पेन्शन योजना (APY-Atal pension Yojna) ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा दिली जाते. जे नागरिक वयोमानामुळे रोजगार करू शकत नाहीत अशा नागरिकांना निश्चित मासिक उत्पन्न उपलब्ध करून देते. तसेच भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना स्वावलंबी बनवणारी ही विशेष पेन्शन योजना आहे. या योजने अंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर किमान 1 ते 5 हजार रूपये दरमहा पेन्शन मिळण्याची हमी मिळते. ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे राबविली जाते.
APY योजनेचा लाभ कोणाला?
देशातील असंघटित क्षेत्रातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बचत बॅंक खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत खाते असणे आवश्यक आहे. गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन दिली जाते. एखादा गुंतवणूकदार वयाची 60 वर्षे पूर्ण करण्याअगोदरच मरण पावला तर त्याच्या जोडीदाराला पेन्शन मिळते.
APY योजनेचा प्रीमियम किती?
या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी 18 व्या वर्षी या योजनेत सामील होत असेल, तर त्याला प्रत्येक महिन्याला 210 रुपये प्रीमियम भरावा लागेल. हा प्रीमियम 42 वर्षे भरल्यानंतर त्याला त्याच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 5 हजार रूपये पेन्शन मिळेल. तर एखादी व्यक्ती प्रत्येक महिन्याला 5 हजार रूपये पेन्शन मिळावी म्हणून 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी होत असेल तर त्याला प्रत्येक महिन्याला 1454 रूपये प्रीमियम 20 वर्षे भरावा लागेल. याबाबत खालील तत्क्त्यामधून अधिक सविस्तरपणे समजून घेऊ.
ठेवी दाराचे वय | 1 हजार रूपये पेन्शनसाठी हप्ता | 2 हजार रूपये पेन्शनसाठी हप्ता | 3 हजार रूपये पेन्शनसाठी हप्ता | 4 हजार रूपये पेन्शनसाठी हप्ता | 5 हजार रूपये पेन्शनसाठी हप्ता |
18 | 42 रूपये | 84 रूपये | 126 रूपये | 168 रूपये | 210 रूपये |
20 | 50 रूपये | 100 रूपये | 150 रूपये | 198 रूपये | 248 रूपये |
25 | 76 रूपये | 151 रूपये | 226 रूपये | 301 रूपये | 376 रूपये |
30 | 116 रूपये | 231 रूपये | 347 रूपये | 462 रूपये | 577 रूपये |
35 | 181 रूपये | 362 रूपये | 543 रूपये | 722 रूपये | 902 रूपये |
40 | 291 रूपये | 582 रूपये | 873 रूपये | 1164 रूपये | 1454 रूपये |
अर्ज कसा करावा?
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीय बॅंकेतून करता येऊ शकते. अटल पेन्शन योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि बँकेत उपलब्ध असतात. अर्जासोबत आधार कार्डची प्रत, सुरू असलेला मोबाईल क्रमांक द्या. अर्ज मंजूर झाला की, तुमच्या मोबाईल क्रमांकावर त्याचा संदेश येतो.