Sukanya Samriddhi Yojana : “अभिनंदन, मुलगी झाली….” तिनच शब्द… पण आज देखील “धन आत्मजा दुजाचे” असा समज रुजलेल्या रूढीवादी भारतीय पित्याचे काळीज चर्रर्र होते. मुळातच “परक्याचे धन” समजले जाणाऱ्या कन्या-अपत्याचा जन्म आणि तिचे संगोपन आज देखील एखाद्या आव्हानापेक्षा कमी मानले जात नाही. समाजाची मानसिकता कालपरत्वे बदलेलच. मात्र जन्माला येणाऱ्या प्रत्येक सुकन्येच्या सुरक्षित भविष्यासाठी किमान एक समृद्ध संचय-पेटी असावी, अशा उद्दिष्टाने 2015 मध्ये सुरु केला गेलेला भारत सरकारचा सुकाणू-प्रकल्प म्हणजे “सुकन्या समृद्धी योजना”.
“सुकन्या समृद्धी योजना” ही एक सूक्ष्मलक्ष्यी (Micro Level) योजना असून तिची सुरुवात पंतप्रधानांच्या “बेटी बचाओ-बेटी पढाओ” (Beti Bachao Beti Padhao) या महत्वाकांक्षी अभियानाअंतर्गत केली आहे. कन्या-अपत्याचे शिक्षण आणि तिच्या विवाहाचे प्रसंगी आर्थिक आधार सुनिश्चित करण्याच्या हेतूने मुलीचे आई-वडील किंवा तिचे कायदेशीर पालक तिच्या नावाने या योजनेअंतर्गत कोणत्याही अधिकृत बँकेमध्ये किंवा जवळच्या पोस्ट-ऑफिसात खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने सुरु केलेली गुंतवणूक ही गुंतवणूकदाराला देखील वार्षिक 5 लाखांपर्यंत इन्कम टॅक्स अधिनियम, 1961 च्या (Income Tax Act 1961) कलम 80 (सी) अंतर्गत कर सवलत (Tax Benefit) देखील प्रदान करते.
या योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर व्याजदर तरल ठेवला असला तरीदेखील सद्यस्थितीमध्ये तो 7.60 टक्के (2022-2023 करीता) इतका असून गुंतवणुकीचा कालावधी हा 15 वर्षे निश्चित केला आहे. तसेच अगदी 250 रुपयापासून सुरु करता येणारी ही गुंतवणूक वार्षिक 1.5 लाखापर्यंत वाढवता येते. मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती मुलगी तिच्या नावाने उघडलेल्या खात्याचे संचालन स्वतः करू शकते. या योजनेचा कालावधी मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा तिच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर केलेल्या विवाहापर्यंत असतो. या व्यतिरिक्त मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिच्या शिक्षणाकरिता देखील जमा असलेल्या रक्कमेमधून 50 टक्के इतकी रक्कम काढता येते. उर्वरित रक्कम मात्र तिच्या वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच प्राप्त होते.
10 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलीच्या नावाने सुरु करता येणाऱ्या या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ दोन कन्या-अपत्यांकरीता घेता येतो. अपवादात्मक स्थितीमध्ये (पहिल्या मुलीच्या जन्मानंतर दोन जुळ्या मुलींचा जन्म झाल्यास) तीन मुलींकरिता देखील योजनेचा लाभ घेता येतो. मुलीच्या जन्माचा दाखला, तिच्या आई-वडिलांचे किंवा कायदेशीर पालकाचे ओळखपत्र आणि वास्तव्याचा दाखला इतक्या अत्यन्त निवडक कागदपत्रांच्या आधारे खाते उघडता येते. तसेच मुलीचे उच्च शिक्षण किंवा अन्य कारणामुळे स्थानबदल होत असल्यास या योजनेला देखील सहजरित्या एका बँकेमधून किंवा पोस्ट-ऑफिसमधून अन्य बँक किंवा पोस्ट-ऑफिसमध्ये स्थानांतरित देखील करता येते.
गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, सावित्री-आनंदीच्या देशात आज देखील जिथे कन्येचा जन्म हा रूढीवादी भारतीय पित्याची चिंता वाढविणारा असतो. तिथे “सुकन्या समृद्धी योजना” (Sukanya Samriddhi Yojana) मुलीला तिचे भविष्य निश्चित करण्यास मदत करणारे शिक्षण घेण्याचे आणि तिच्या विवाहाप्रसंगीचा आर्थिक भार उचलण्यास हातभार लावण्याचे आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करते. तेव्हा आता प्रत्येक बेटीकरिता तिची स्वतःची धनाची पेटी असू शकेल, हे निश्चित.