देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांच्या NDTV मधील हिस्सा खरेदीला एनडीटीव्हीचे मुख्य प्रवर्तक प्रणव रॉय यांनी सेबीकडे आव्हान दिले होते. त्यावर नुकताच सेबीने निर्णय दिला. सेबीकडून अदानींना NDTVमध्ये अतिरिक्त हिस्सा खरेदी करण्यास परवानगी दिली.
आशियातील श्रीमंत उद्योजकांमध्ये आघाडीवर असणाऱ्या गौतम अदानी यांचा NDTV मध्ये हिस्सा खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. भांडवली बाजार नियंत्रक सेबीने अदानी यांच्या प्रस्तावाला परवानगी दिली आहे.अदानी समूहाची एनडीटीव्हीतील 26% हिस्सा खरेदी करण्याची ओपन ऑफर दिली आहे.
सेबीने सोमवारी 14 नोव्हेंबर 2022 रोजी अदानी समूहाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड,एएमजी मिडिया नेटवर्क्स आणि अदानी एंटरप्राईसेस लिमिटेड या कंपन्या मिळून ऑफर देणार आहेत. या तीनही कंपन्या NDTV मधील 26% अतिरिक्त हिस्सा खरेदी करतील.विश्वप्रधान कमर्शिअलचा एनडीटीव्हीमध्ये 29.18% हिस्सा आहे. एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी अदानी यांच्या ओपन ऑफर विरोधात सेबीकडे दाद मागितली होती.रॉय दाम्पत्याची एनडीटीव्हीमध्ये 32.26% हिस्सेदारी आहे.
ओपन ऑफर 22 नोव्हेंबरला खुली होणार
अदानी समूहाने एनडीटीव्हीतला आणखी 26% हिस्सा खरेदी करण्यासाठी प्रती शेअर 294 रुपयांची ओपन ऑफर दिली आहे.NDTV चा शेअर आज मंगळवारी 15 नोव्हेंबर रोजी 383.05 रुपयांवर बंद झाला. त्यात 4.99% वाढ झाली. ही ओपन ऑफर 5 डिसेंबर 2022 रोजी बंद होईल. ही ऑफर पूर्ण सबस्क्राईब झाली तर अदानी समूहासाठी शेअर खरेदीचे एकूण मूल्य 492.81 कोटी इतके असेल.