गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समुहातील अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises) शेअर्समध्ये बीएसईवर इंट्राडेमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली असून सोमवारी (दि. 7 नोव्हेंबर) अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 3,998 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. अदानी एंटरप्रायझेसचा हा नवीन रेकॉर्ड असल्याचे बोलले जात आहे. अशाप्रकारे, सलग आठव्या दिवशी अदानीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आणि या काळात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले आहेत.
सोमवारी दुपारच्या सत्रात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 3.32 टक्क्यांनी मजबूत होऊन 3.960.55 रुपयांवर पोहोचले होते. त्याचे बाजारमूल्य सुमारे 4.52 लाख कोटी रुपये आहे. BSEच्या डेटानुसार, अदानी एंटरप्रायझेस कंपनी ही या बाजार मूल्यानुसार भारतातील 9 व्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी बनली. अदानी एंटरप्रायझेसने मार्केट कॅपच्या बाबतीत FMCG कंपनी ITC आणि हाऊसिंग फायनॅन्स कंपनी HDFC यांना मागे टाकले.
सप्टेंबरच्या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसचा निव्वळ नफा दुपटीने वाढून 460.94 कोटी रुपयांवर पोहोचला. वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा 212.41 कोटी रुपये होता. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या कालावधीत तिचा एकत्रित महसूल जवळपास तिप्पट वाढून 38,175.23 कोटी रुपये झाला. जुलै-सप्टेंबर 2021 मध्ये हा आकडा 13,218 कोटी रुपये होता. त्याचवेळी, कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 69 टक्क्यांनी वाढून 2.136 कोटी रुपये झाला.
व्हेंचुरा सिक्युरिटीजने (Ventura Securities) अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सवर 4,310 रुपयांचे टार्गेट दिले. विशेषतः युरोपमध्ये राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे ग्रीन एनर्जी सोर्सची शक्यता वाढली आहे.