नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी विकास महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी दरम्यानचा आहे . आणि 520 किलोमीटरच्या या रस्त्यासाठी 55,000 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. पण, हा महामार्ग वापरात आला की, दोन वर्षांत 50,000 कोटी रुपये वसूल होती असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन समारोहानंतर ते मीडियाशी बोलत होते.
समृद्धी महामार्ग हा देशातला एक मोठा महामार्ग आहे. आणि महाराष्ट्रातल्या तब्बल दहा जिल्ह्यांमधून तो जातो. अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या महत्त्वाच्या औद्योगिक भागांना तो जोडतो. त्यामुळेच फडणवीस यांनी टोल वसुलीतूनच 50,000 कोटी इतका महसूल मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. त्याचबरोबर पुढच्या वर्षीपासून नागपूर ते गोवा महामार्गाचं काम सुरू करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
पंतप्रधान मोदींचे 12 स्टार्स - 12 Stars by PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं तेव्हा या भागातल्या विकासाचे 12 स्टार्स मोदी यांनी बोलून दाखवले. यातला महिला स्टार अर्थातच समृद्धी महामार्ग, दुसरा नागपूरमध्ये उभारण्यात येणारं एम्स केंद्र, तिसरा स्टार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ, चौथं चंद्रपूरचं ICMR केंद्र, पाचवा चंद्रपूरचाच CPET प्रकल्प, सहावा नाग नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी आखलेला सरकारी उपक्रम, सातवा नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा आणि भूमीपूजन झालेला दुसरा टप्पा, आठवा स्टार नागपू-विलासपूर दरम्यानची वंदे भारत एक्सप्रेस, नववा स्टार नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांच्या नुतनीकरणाचे प्रकल्प, दहावा स्टार अजनीच्या रेल्वे देखभाल डेपोसाठी, अकरावा स्टार नागपूर-अटारसी मार्गासाठी आणि बारावा कोरी-नारखेड कॉरीडॉरसाठी…
पायाभूत उभारणी प्रकल्प रोजगार आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि सध्या शुभारंभ होत असलेले प्रकल्प देशाची दिशा स्पष्ट करणारे आहेत, असंही नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवलं.