Canara Bank Shares: गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला(Rakesh Jhunjhunwala) आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी रेखा झुनझुनवाला(Reksha Jhunjhunwala) यांनी कॅनरा बँकेचे(Canara Bank) आणखी शेअर्स खरेदी केले आहेत. त्यामुळे रेखा झुनझुनवाला यांची डिसेंबर 2022 च्या तिमाहीत(Quarter) कॅनरा बँकेत 0.59 टक्के हिस्सेदारी वाढवली आहे. कॅनरा बँकेचा शेअर सोमवारी 2 टक्के वाढून 326.55 रुपयांवर बंद झाला. या बँकेच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 341.60 रुपये होता तर निचांकी 171.70 रुपये इतका होता.
रेखा झुनझुनवाला यांचा कॅनरा बँकेत 2.07 टक्के वाटा
31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत(Quarter) कॅनरा बँकेमधील रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी वाढून 2.07 टक्क्यांवर पोहोचली आहे. सप्टेंबर 2022 तिमाहीत या बँकेत त्यांची हिस्सेदारी 1.48 टक्के होती, जी जून 2022 तिमाहीत 1.96 टक्के झाली. कॅनरा बँकेत पब्लिक शेअर होल्डिंग 37.07 ट्क्के आहे. जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत कॅनरा बँकेचा रेव्हेन्यू 20106.92 कोटी रुपये इतका होता. विशेष म्हणजे सप्टेंबरच्या तिमाहीत या बँकेला 2525.47 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
4 महिन्यात शेअर्समध्ये 55 टक्क्यांची तेजी
गेल्या काही महिन्यांपासून कॅनरा बँकेचे(canara Bank) शेअर्स तेजीत आहेत. या बँकेच्या शेअर्सनी 4 महिन्यांपेक्षा कमी काळात 55 टक्क्यापेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी 'BSE' वर या बँकेचा शेअर 210.15 रुपयांवर होता. 9 जानेवारी 2023 रोजी बँकेचा शेअर BSE वर रुपये 326.50 वर बंद झाला. तसेच गेल्या 6 महिन्यामध्ये कॅनरा बँकेच्या शेअर्सनी 50.5 टक्के परतावा दिला आहे. तर एका वर्षात या बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 49 टक्के वाढ झाली आहे. तसेच, कॅनरा बँकेच्या शेअरने या महिन्याच्या सुरुवातीला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) जवळपास 5 वर्षांतील उच्चांक 341.70 पर्यंत पोहचला आहे.