Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Crash Tips: शेअर बाजार कोसळल्यास काय करावे? 'या' ६ नियमांचे पालन केल्यास मोठे नुकसान टाळता येईल

Market Crash Tips

शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यावर गुंतवणूकदारांनी नेमकी कोणती पावले उचलली पाहिजेत? पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भविष्यातील नफा सुनिश्चित करण्यासाठी ६ महत्त्वाचे मार्ग येथे दिले आहेत.

शेअर बाजार जेव्हा कोसळतो, तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, बाजारातील ही पडझड ही केवळ तात्पुरती असते आणि ती अनेकदा गुंतवणुकीची मोठी संधी घेऊन येते. शेअर बाजारातील अशा वादळी काळात स्वतःला सावरण्यासाठी आणि तुमची संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी खालील ६ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:

१. वैयक्तिक आर्थिक नियोजन कोलमडू देऊ नका

बाजारातील गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले तरी तुमच्या दैनंदिन गरजांसाठी असलेला पैसा सुरक्षित ठेवा. यासाठी तुमच्या 'कॅश फ्लो'वर लक्ष ठेवा. घरभाडे, बिले आणि मुलांची फी यांसारख्या खर्चासाठी गुंतवणुकीवर अवलंबून राहू नका. तसेच, अनिश्चिततेच्या काळात नवीन कर्ज घेणे टाळा आणि शक्य असल्यास ४ ते ६ महिन्यांच्या खर्चासाठी एक 'इमर्जन्सी फंड' बाजूला ठेवा.

२. 'टॅक्स लॉस हार्वेस्टिंग'चा हुशारीने वापर करा

मार्केट क्रॅशचा फायदा तुम्ही कर वाचवण्यासाठी करू शकता. ज्या शेअर्समध्ये सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे, ते विकून झालेला तोटा तुम्ही इतर नफ्यासोबत ॲडजस्ट करू शकता. याला 'टॅक्स लॉस हार्वेस्टिंग' म्हणतात. यामुळे तुमचा करभार कमी होतो आणि पोर्टफोलिओमधील कमकुवत शेअर्स बाहेर काढण्यास मदत होते.

३. पोर्टफोलिओचे संतुलन (Rebalancing) करा

बाजार पडल्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सचे प्रमाण कमी झाले असेल, तर ते पुन्हा मूळ नियोजनानुसार करा. समजा, तुमचे उद्दिष्ट ७०% शेअर्स आणि ३०% सुरक्षित गुंतवणूक (Bonds) असे असेल, तर घसरणीनंतर हे प्रमाण ५०-५० होऊ शकते. अशा वेळी काही सुरक्षित गुंतवणूक मोडून कमी किमतीत चांगले शेअर्स खरेदी करा, जेणेकरून तुमचे ७०/३० चे प्रमाण पुन्हा साधले जाईल.

४. काहीही खरेदी करण्याचा मोह टाळा

बाजार पडला म्हणून कोणताही शेअर खरेदी करण्याची घाई करू नका. पडलेला प्रत्येक शेअर पुन्हा वर येईलच असे नाही. केवळ मजबूत पाया असलेल्या, कमी कर्ज असलेल्या आणि सातत्यपूर्ण नफा मिळवणाऱ्या कंपन्यांचेच शेअर्स निवडा. सट्टेबाजी किंवा रिस्की शेअर्सपासून अशा वेळी लांब राहणेच हिताचे ठरते.

५. पॅनिक सेलिंगपासून दूर राहा

गुंतवणूकदार सर्वात मोठी चूक ही बाजार पडल्यावर सर्व काही विकून बाहेर पडण्याची करतात. यामुळे तुमचे कागदावर दिसणारे नुकसान वास्तविक नुकसानीत बदलते. लक्षात ठेवा, बाजार नेहमीच सावरतो. जर तुम्ही घबराटीत विक्री केली, तर भविष्यात जेव्हा बाजार पुन्हा वर येईल, तेव्हा तुम्ही त्या नफ्याला मुकाल. तुमची 'एसआयपी' (SIP) सुरूच ठेवा.

६. दीर्घकालीन उद्दिष्टांकडे लक्ष द्या

शेअर बाजारातील गुंतवणूक ही लांब पल्ल्याची शर्यत आहे. एखादे वादळ आले म्हणून कोणी लावलेले झाड उपटून टाकत नाही. तसेच, तुमची गुंतवणूक ही तुमच्या भविष्यातील ध्येयांसाठी आहे (उदा. मुलांचे शिक्षण किंवा निवृत्ती). त्यामुळे अल्पकालीन चढ-उतारांमुळे विचलित न होता तुमच्या उद्दिष्टांवर ठाम राहा.