Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Governor शक्तिकांत दास यांनी जेव्हा स्वत:ची लिओनेल मेस्सीशी तुलना केली…  

Shaktikant Das

Image Source : www.bqprime.com

RBI Governor & Lionel Messi : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना त्यांची पदवी इतिहास विषयातली असल्यामुळे नेहमी डिवचलं जातं. पण, याला विनोदी उत्तर देताना दास यांनी आपली तुलना फिफा वर्ल्ड कपमुळे प्रकाशझोतात असलेल्या मेस्सीशी केली.

रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास ( Shaktikant Das) यांनी आपली पदवी इतिहास (History Graduate) विषयात मिळवलीय. आणि मध्यवर्ती बँकेच्या (Central Bank) इतिहासात 28 वर्षांतले  ते पहिले गव्हर्नर आहेत ज्यांनी अर्थशास्त्राचा (Economics) अभ्यास केलेला नाही. यावरुन दास यांना नेहमी चिडवलं जातं. पण, बुधवारी (21 डिसेंबरला) त्यांनी टीकाकारांना मजेशीर उत्तर दिलं. आणि ते देताना आपली तुलना फिफा वर्ल्ड कपचा (FIFA World Cup 2022) हीरो लिओनेल मेस्सीशी (Lionel Messi) केली.      

झालं असं की, Business Today या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका परिषदेत मुलाखतकाराने दास यांना प्रश्न विचारला की, ‘अर्थव्यवस्थेवर असे कठीण प्रश्न विचारण्यात आले की, तुमची अवस्था फुटबॉल मैदानात मेस्सीसमोर आल्यावर प्रतिस्पर्ध्यांची होते, तशी होते का?’     

याला प्रश्नाच्या उत्तरादाखल दास मिश्किलपणे हसत म्हणाले, ‘मला आवडेल असा मुकाबला. पण, त्यासाठी मेस्सीची डिगरीही इतिहासातली आहे का? कारण, माझी अवघड अवस्था तेव्हाच होते जेव्हा मला मी इतिहासात स्नातकोत्तर डिगरी घेतल्याची वारंवार आठवण करून दिली जाते. असं नेहमी होत नाही. पण, कधी कधी होतं.’ असं दास म्हणाले.     

शक्तिकांत दास यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून इतिहास विषयात एमए केलं आहे. आणि आधीचे रिझर्व्ह बँक गव्हर्नर उर्जित पटेल यांनी केंद्रसरकारबरोबरच्या खटक्यांनंतर पदाचा राजीनामा दिल्यावर या जागी शक्तिकांत दास यांची वर्णी लागली. डिसेंबर 2018मध्ये दास यांनी सूत्र हातात घेतली. आणि त्यानंतर चार वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. आणि त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी कोव्हिड उद्रेका सारखी परिस्थिती हाताळली आहे. आणि त्यानंतर रशिया - युक्रेन युद्धामुळे जगभर पसरलेल्या महागाईलाही त्यांनी तोंड दिलं आहे.     

दास यांच्या अभ्यासाचा विषय इतिहास असला तरी मागची अनेक वर्षं ते अर्थमंत्रालयात कामाला होते. अर्थखात्याचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. आणि खासकरून G20 परिषदेतल्या भारताच्या सहभागाची प्रशासकीय जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. या जबाबदारी नंतरच त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी वर्णी लागली.     

पण, त्यांच्यावर विरोधकांकडून इतिहासासाच्या पार्श्वभूमीची नेहमी खिल्ली उडवली जायची. अशा प्रश्नांची मिश्किल उत्तरं दास यांनी परिषदेत दिली. ‘रिझर्व्ह बँकेत कठीण आकड्यांशी खेळणं मला जमतं. कारण, मी दिल्लीच्या बसने प्रवास केलाय,’ असं ते म्हणाले. ‘मी गव्हर्नर झाल्यापासून रेपो दरात 117 अंशांची वाढ झालीय. आणि हा आकडा मला बरोबर माहीत आहे कारण, कॉलेजमध्ये जाण्यासाठी 117 क्रमांकाची बसच मी पकडायचो.’ असं उत्तर दिल्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.