जगभरात तरुणांचा ओढा क्रिप्टोकरन्सीकडे (Cryptocurrency) वाढत असताना रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी मात्र आगामी आर्थिक संकट क्रिप्टोमुळे येऊ शकेल , असं म्हटलं आहे. बिझिनेस स्टँडर्ड या वृतपत्राने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
दास यांचा रोख खाजगी पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सीवर होता. क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) हे चलन जसं आभासी आहे, तसंच त्याचं कामही आहे. म्हणजे क्रिप्टोमधले व्यवहार हे 100% स्पेक्युलेटिव्ह आहेत, त्याला कुठलाही आधार नाही, असं शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी बोलून दाखवलं.
क्रिप्टोमधील व्यवहारांवर सरकारी नियंत्रण नाही ही गोष्टही त्यांना खटकते. हा विषय आणखी स्पष्ट करून सांगताना त्यांनी इशाराच दिला की, ‘माझं बोलणं नीट लिहून ठेवा. पुढचं आर्थिक संकट हे क्रिप्टोमुळेच येईल.’ हे सांगताना त्यांनी उदाहरण जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं क्रिप्टो एक्सचेंज FTX च्या बंद होण्याचं दिलं.
कारण, फक्त एक्सचेंज बंद होत नाही तर लोकांचे कोट्यवधी पैसे बुडतात. त्यामुळे क्रिप्टोचा देशाच्या अर्थव्यवस्थेला असलेला धोका समजून चालण्याची गरज आहे, असं दास म्हणाले. त्यामुळे सरकारचं नियंत्रण नसलेलं कुठलंही चलन हे धोकादायकच असं त्यांचं मत आहे.
केंद्रसरकारने सुरू केलेल्या डिजिटल करन्सीबद्दल मात्र शक्तिकांत दास आशादायी आहेत. डिजिटल रुपयातून (Digital Rupee) रिझर्व्ह बँकेचे पैसे वाचणार आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहार सोपे होणार आहेत. आणि या डिजिटल रुपयाच्या हालचालींवर सरकारचं लक्षही असतं, असं दास म्हणाले.
इतर मुद्यांवर बोलताना दास यांनी जीडीपी विकास दर किंवा इतर आर्थिक निकषांचा अंदाज व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेची अचूकता वाढली असल्याचं नमूद केलं. तसंच रिझर्व्ह बँकेचे निर्णय अमेरिक फेडरल बँकेच्या निर्णयावर अवलंबून नसतात, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.