भारतामध्ये क्रेडिट कार्डचा वापर ज्या वेगाने वाढत आहे, त्याच वेगाने फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. सध्या सायबर गुन्हेगारांनी 'क्रेडिट कार्ड लिमिट वाढवून देण्याच्या' नावाखाली सर्वसामान्यांना लुटण्याचा नवा फंडा शोधला आहे. ग्राहकांना अधिक खर्च करण्याची मर्यादा हवी असते, याच मानसिकतेचा फायदा हे गुन्हेगार घेत आहेत. या फसवणुकीत केवळ पैसाच नाही, तर तुमची वैयक्तिक माहितीही चोरीला जाण्याचा मोठा धोका आहे.
नेमका कसा होतो हा स्कॅम?
या प्रकारच्या फसवणुकीत सायबर गुन्हेगार बँकेचे अधिकारी किंवा क्रेडिट कार्ड कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात. ते तुम्हाला फोन कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे संपर्क साधतात.
ते तुम्हाला सांगतात की, तुमच्या कार्डची मर्यादा त्वरित वाढवण्यासाठी तुम्ही पात्र आहात.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते तुमच्याकडून कार्ड नंबर, सीव्हीव्ही (CVV), ओटीपी (OTP) किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती मागतात.
काही वेळा 'प्रोसेसिंग फी'च्या नावाखाली काही पैसे भरण्यासही सांगितले जाते. लक्षात ठेवा, कोणतीही अधिकृत बँक फोनवर तुमची गोपनीय माहिती मागत नाही किंवा लिमिट वाढवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही.
धोक्याचे इशारे कसे ओळखाल?
१. अनोळखी मेसेज: जर तुम्हाला अज्ञात नंबरवरून 'लिमिट वाढवण्याची गॅरंटी' देणारे मेसेज येत असतील, तर ते पूर्णपणे दुर्लक्षित करा.
२. घाई करण्याची सक्ती: "आजच ऑफर संपणार आहे," किंवा "त्वरीत प्रक्रिया करा अन्यथा संधी हुकेल," असे सांगून तुम्हाला घाईत निर्णय घ्यायला भाग पाडले जाते. बँका कधीही अशा प्रकारे ग्राहकांवर दबाव टाकत नाहीत.
३. गोपनीय माहितीची मागणी: पिन (PIN), ओटीपी किंवा पासवर्ड विचारणारी कोणतीही व्यक्ती ही फसवणूक करणारीच असते.
स्वतःचा बचाव कसा कराल?
जर तुम्हाला खरोखरच तुमच्या कार्डची लिमिट वाढवायची असेल, तर केवळ बँकेच्या अधिकृत ॲप्लिकेशन किंवा वेबसाइटचाच वापर करा. अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसेच, आपल्या बँक खात्याशी संबंधित व्यवहार आणि अलर्ट मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नेहमी अपडेट ठेवा.
क्रेडिट कार्ड हे सोयीचे असले तरी त्याचा जबाबदार वापर महत्त्वाचा आहे. जास्त लिमिट मिळाल्यास विनाकारण खर्च वाढण्याची आणि कर्जाच्या खाईत अडकण्याची भीती असते. जर तुम्हाला कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती मिळाली, तर त्वरित आपल्या बँकेला कळवा आणि सायबर सेलकडे तक्रार नोंदवा. सतर्क राहणे हाच आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.