Currency Notes: बऱ्याच वेळा आपल्याकडे जुन्या आणि फाटलेल्या नोटा असतात. या नोटांची हालत पाहून अनेक व्यापारी आपल्याकडून या घेण्यासाठी नकार देतात. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा मिळणार आहेत. यासंदर्भात बँकेने ट्विट करून याची माहिती दिली आहे. नेमकं काय आहे ऑफर? RBI चा नियम काय सांगतो हे देखील जाणून घ्या.
नोटा बदलण्यासाठी जवळच्या शाखेत संपर्क साधा
पीएनबीने (PNB) आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर तुम्हालाही जुन्या किंवा फाटलेल्या नोटा बदलायच्या असतील तर आता तुम्ही हे काम सहज करू शकणार आहेत. बँकेने सांगितले आहे की, तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधू शकता. येथे तुम्ही जुन्या नोटा आणि नाणी बदलू शकणार आहात.
रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार तुमच्याकडेही जुन्या किंवा फाटलेल्या नोटा असतील तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन अशा नोटा बदलू शकता. जर बँकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने तुमची नोट बदलून घेण्यास नकार दिला तर तुम्ही याबाबत तक्रारही करू शकता. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की नोटेची स्थिती जितकी खराब होईल तितकी तिची किंमत कमी होणार आहे.
RBI चा नियम काय सांगतो?
- आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कोणतीही फाटलेली नोट फक्त तेव्हाच स्वीकारली जाईल, जेव्हा तिचा काही भाग गहाळ असेल किंवा दोन तुकड्यांपेक्षा जास्त तुकडे असतील आणि ते एकत्र पेस्ट केले असेल, पण त्याचा कोणताही आवश्यक भाग गहाळ झालेला नसावा
- चलनी नोटेचे काही विशेष भाग जसे की, जारी करणार्या अधिकार्याचे नाव, हमी आणि वचन कलम, स्वाक्षरी, अशोक स्तंभ, महात्मा गांधींचे चित्र, पाण्याचे चिन्ह इत्यादी नोटांवरील खुणा गहाळ असतील, तर तुमची नोट बदलली जाणार नाही
- अशा नोटा आरबीआय(RBI) ऑफिसमधून बदलल्या जाऊ शकतात, खूप जळलेल्या नोटा किंवा एकत्र चिकटलेल्या नोटा देखील बदलल्या जाऊ शकतात. अशा नोटा बऱ्याच वेळा बँक घेत नाही, त्यासाठी तुम्हाला त्या आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये घेऊन जाव्या लागतील. एक गोष्ट लक्षात ठेवा की, RBI कडून तुमच्या नोटेचे नुकसान खरे आहे आणि ते जाणूनबुजून झालेले नाही याची तपासणी करण्यात येते