• 04 Oct, 2022 16:10

ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक नियोजनासाठी म्युच्युअल फंड!

Mutual Fund for Senior Citizen

आयुष्यभर मेहनत करून मिळवलेली जमापुंजी सुरक्षित राहवी आणि त्याचबरोबर त्या जमा रकमेवर चांगला लाभ मिळावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) बाळगून असतात. अशाप्रकारच्या लाभासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक नियोजन (Financial Planning) हे एक आव्हान मानले जाते. निवृत्त झाल्यानंतर जेव्हा पैसे येण्याचा ओघ कमी झाला की, आयुष्यभर मेहनत करून मिळवलेली जमापुंजी सुरक्षित राहवी आणि त्याचबरोबर त्या जमा रकमेवर चांगला लाभ मिळावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) बाळगून असतात. बाजारात उपलब्ध असलेले गुंतवणुकीचे सर्वच पर्याय हे गरजेनुसार असतात असे नाही. वार्षिक योजनांतून पेन्शनची (Annual Pension Scheme) निश्चित रक्कम मिळते. पण बहुतांश मंडळींना त्याचा किमान व्याजदर पचनी पडत नाही. मुदत ठेवीने (Fixed Deposit) रक्कम सुरक्षित राहते; परंतु करसवलतीचा (Tax Benefit) लाभ मिळत नाही. बऱ्याच योजना या लॉक-इन कालावधीसाठी असतात, त्या योजना आपल्याच पैशाला हात लावू देत नाहीत. एखाद्या गुंतवणूकदाराला आपला पैसा सुरक्षित राहवा, चांगला परतावा द्यावा अणि करसवलतीचा फायदाही मिळावा आणि कोणत्याही अडचणींशिवाय तो काढता यावा, अशी माफक अपेक्षा असते. अशाप्रकारच्या लाभासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. 

म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे दीर्घकालीन, शॉर्टटर्म मुदत किंवा टॅक्समध्ये सवलत मिळवण्यासाठी विविधप्रकारे गुंतवणूक करून चांगला लाभ मिळू शकतो. याबाबतची सविस्तर माहिती आपण समजून घेऊ.

कमी कालावधीसाठी शॉर्ट टर्म फंडस (Short Term Funds for Short Duration) 

जर तुम्हला बचत खाते (Saving Account) आणि फिक्स डिपॉझिटवरील (Fixed Deposit) व्याजापेक्षा अधिक लाभ मिळवायचा असेल तर लिक्विड किंवा अल्ट्रा शॉर्ट टर्मसारख्या म्युच्युअल फंडसची (Liquid or Ultra Short Term Mutual Funds) निवड करता येऊ शकेल. हे फंडस कमी कालावधीत चांगला परतावा देतात. साधारणत: 36 महिन्यांसाठी हे फंडस समाधानकारक परतावा देऊ शकतात. गुंतवणूकदारांनी लिक्विड म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवलेला पैसा शेअर मार्केट, बॉण्ड्स, एफडी, कॉर्पोरेट कर्ज यामध्ये गुंतवला जातो. लिक्विड फंड्सची सुरक्षा लक्षात घेता हा कालावधी 91 दिवसांचा ठेवण्यात आला आहे. कमीतकमी कालावधीसाठी सहा महिने ते चार वर्षांपर्यंत पैसा ठेवता येतो. लिक्विड फंडस ही पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात चांगली योजना मानली जाते.

तीन वर्षासाठी इक्विटी फंड (Equity Fund)

जर तुम्ही तुमचा पैसा तीन वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी ठेऊ इच्छित असाल, तर इक्विटी म्युच्युअल फंड्सचा (Equity Mutual Fund) पर्याय निवडणे फायद्याचे ठरू शकते. या फंडमधून जमा झालेला निधी फंड मॅनेजर इक्विटी मार्केटमध्ये गुंतवतात. बाजाराशी संबंधित शेअरचा फायदा गुंतवणूकदारांना करून देतात. दीर्घकाळासाठी इक्विटी म्युच्युअल फंडस हे कमी काळाच्या बचत योजना, एफडी, सोन्यापेक्षा चांगली कामगिरी करतात. इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये जोखीम अधिक असते. पण तीन वर्षे हा बाजाराला चढउतारातून सुस्थितीत येण्यासाठी पुरेसा कालावधी आहे. त्याबरोबर गुंतवणुकदारालाही चांगला परतावा मिळण्याची सुसंधी असते. चांगला लाभ पदरात पाडण्यासाठी कमी रक्कम दीर्घकाळासाठी ठेवावी, असा सल्ला आर्थिक सल्लागार देतात.

आपला पैसा कधीही काढा (Withdraw your money anytime)

लिक्विड म्युच्युअल फंडसमध्ये आपला पैसा एका दिवसात उपयोगात आणता येतो. यात कोणताही लॉकइन किंवा एक्झिट लोड (Exit Load) नसतो. या योजनेतून कधीही बाहेर पडण्याचा पर्याय खुला असतो. इक्विटी म्युच्युअल फंड्समधून सुद्धा कधीही पैसे काढता येतात. तसे पाहिले तर एका वर्षाच्या आता पैसे काढले तर एक टक्का एक्झिट लोड पकडला जातो. जेव्हा आपण म्युच्युअल फंडमधून पैसे काढण्याचा विचार करू तेव्हा एक्झिट लोडचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. तसेच आपला खर्चही कमी राखल्यास फंड्स मोडण्याची वेळ येणार नाही.

Mutual Funds
 

कर आकारणीची स्थिती (Taxation)

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही अनेक गुंतवणूक पर्यायापेक्षा सरस मानली जाते. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स(Short Term Capital Gain)  आणि लाँग टर्म कॅपिटल गेन्स (Long Term Capital Gain)वर कर भरावा लागेल. हा टॅक्स स्लॅबनुसार आकारला जातो.

म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा खर्च (Cost of mutual fund investment)

जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा त्याचा एक्झिट लोड आणि खर्चाचा आढावा घ्यायला हवा. म्युच्युअल फंड कंपन्या काही शुल्क एजंटना देत असतात. पण तरीही यातील खर्च हा तुलनेने कमी मानला जातो. त्यामुळे तुम्ही ही एका चांगल्या कमी खर्चाच्या गुंतवणुकीचा आनंद घेऊ शकता. अशाप्रकारे ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून चांगला लाभ मिळू शकतात.