म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सर्वसामान्यांना शेअर मार्केटचे दरवाजे उघडले आहेत. आता अगदी कमी कमी रक्कमेत सुरक्षितरित्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे 20 ते 40 वयोगटातील तरूणांचा कल इतर गोष्टींच्या तुलनेत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीकडे अधिक आहे. मात्र, म्युच्युअल फंड व एसआयपीमध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. एसआयपी म्हणजे नक्की काय? हे अनेकांच्या लक्षात येत नाही. या लेखामधून एसआयपी म्हणजे नक्की काय? एसआयपी कशाप्रकारे सुरू करू शकता व यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
एसआयपी म्हणजे नक्की काय?
एसआयपी म्हणजे काय हे समजून घेण्याआधी म्युच्युअल फंड म्हणजे काय? हे जाणून घ्यायला हवे. म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे असे एक माध्यम आहे, ज्यात विविध लोकांची रक्कम इतर मालमत्तेत गुंतवली जाते. या पैशांचे व्यवस्थापन हे फंड मॅनेजरद्वारे केले जाते. फंड मॅनेजर बाजाराचे विश्लेषण करून गुंतवणूकदारांची रक्कम शेअर्स, बाँड्स, गर्व्हमेंट सिक्युरिटी आणि सोने यासह इतर मालमत्तेत गुंतवतात.
तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एकरक्कमी अथवा एसआयपीच्या ( सिस्टीमॅटिक इंव्हेस्टमेंट प्लॅन ) माध्यमातून गुंतवणूक केली जाते. एसआयपीमध्ये (SIP) दरमहिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते. थोडक्यात, एसआयपी हा नियमितपणे गुंतवणुकीचा एक मार्ग असून, दरमहिन्याला गुंतवणूकदारांच्या बँक खात्यातून कापून घेतले जातात.
एसआयपी खाते सुरू करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
- पॅन कार्ड
- आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/वीज बिल
- बँक खात्याची माहिती
- रद्द केलेला चेक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
एसआयपी ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
- सुरक्षित भविष्याच्या उद्देशाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून एसआयपी खाते उघडू शकता. अनेक ब्रोकिंग अॅप्स, बँकेच्या वेबसाइट्ससह अनेक इतर माध्यमांची खाते उघडण्यासाठी निवड करू शकता.
- त्यानंतर त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन खाते उघडल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. ई-केवायसी प्रक्रियेत तुम्हाला नाव, पत्ता, फोन नंबर, पॅन नंबर, आधार नंबर व इतर माहिती द्यावी लागेल.
- खाते उघडल्यानंतर आता वेगवेगळ्या एसआयपी पर्यायांपैकी एकाची निवड करा. तुम्ही तुमची गुंतवणूक, जोखीम क्षमता यानुसार फंडची निवड करू शकता.
- याशिवाय एसआयपी कशापद्धतीने भराल यासाठी मासिक, त्रैमासिक इत्यादी पर्यायांची निवड करा.
- तसेच, तुम्हाला बँक खात्याची माहिती देखील द्यावी लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर दरमहिन्याला तुमच्या बँक खात्यातून एसआयची रक्कम कापून घेतली जाईल.