चांगले आयुष्य जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते; हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आपण सर्वजण पैशांचे महत्त्व चांगलेच समजतो. नोकरी, व्यवसाय किंवा उद्योगातून पैसे कमावतो आणि खर्च करतो. पण याच पैशाचे योग्य नियोजन केले तर आयुष्यातील पुढील काळात आर्थिक स्वतंत्र्य अनुभवू शकतो. उतारवयात आयुष्य निवांतपणे जगायचे असेल तर बचत आणि नियोजनाची सवय लावून घेणं गरजेचं आहे. पैशाचे नियोजन कशाप्रकारे करू शकतो हे आपण पाहुया.
वित्त व्यवस्थापन (Organise Finances)
तुमच्याकडे बचत, गुंतवणूक किती आहे? विमा, कर्ज (वैयक्तिक आणि व्यवसाय) किती आहे? आणि आपल्या निश्चित ध्येयाकडे जाण्यासाठी किती आवश्यकता आहे? हे ठरलं की तुम्ही तुमचे वित्त व्यवस्थापन करायला सुरूवात करू शकता. तुमच्याकडे पैसा येतो कुठून आणि तो जातो कुठे, हे समजून घ्या आणि मग त्याचा वापर निश्चित करा. म्हणजे तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग किती आहेत? वित्त व्यवस्थापन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असू शकते. तसेच येणाऱ्या काळात या व्यवस्थापनात बदलही करावे लागतात.
रोख प्रवाह आणि कर्ज व्यवस्थापन (Cash-flow & debt management)
तुम्हाला तुमच्या जमा आणि खर्चाचा वेगवेगळा हिशोब ठेवणे गरजेचे आहे. येणाऱ्या पैशामध्ये (इनफ्लो स्त्रोतांमध्ये) पगार किंवा व्यवसायातील उत्पन्न, व्याज किंवा लाभांशामधून मिळणारे उत्पन्न, भाड्याचे उत्पन्न, बोनस इत्यादींचा समावेश असू शकतो. तसेच यात जोडीदाराचे उत्पन्नदेखील लक्षात घ्या. यावरून तुम्हाला एकूण जमा पैशाचा अंदाज घेणे सोईचे होईल. त्याप्रमाणे खर्चाचे नियोजन करता येईल. यात घरगुती खर्च, व्यवसाय आणि व्यावसायिक खर्च, कर्जाची परतफेड आणि इतर खर्चाचा समावेश असेल. या खर्चाच्या अंदाजाने मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक आधारावर खर्च वजा केल्याने पैशाचे व्यवस्थापन करताना गुंतवणुकीसाठी निर्णय घेताना मदत होईल. तसेच कर्ज किती आहे आणि कधीपर्यंत कर्जातून मोकळे होऊ, याचा अंदाज घ्या आणि तसे नियोजन करा.
आपत्कालीन आणि जोखीम व्यवस्थापन (Emergency & risk management)
नोकरी गमावणे, वैद्यकीय आणीबाणी, अर्थव्यवस्था आणि भू-राजकीय अनिश्चितता अशा घटनांमुळे ओढवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. अशा अचानक येणाऱ्या आर्थिक संकटांसाठी आपत्कालीन निधी म्हणून पैसे बाजूला काढून ठेवा. तसेच सर्वसमावेशक संरक्षणासाठी पुरेशी व्यावसायिक नुकसानभरपाई, मालमत्ता विमा, जीवन विमा आणि आरोग्य विमा खरेदी करा.
आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा (Manage financial goals)
तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, तुमच्याकडे प्रत्येक उद्दिष्टाचा तपशील देणारी योग्य योजना असणे आवश्यक आहे. आर्थिक उद्दिष्टे ओळखून सुरूवात करा आणि नंतर त्याची किंमत आणि तुम्हाला ते साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या कालावधीचा अंदाज लावा. वास्तविक खर्चापर्यंत पोहोचण्यासाठी सध्याच्या खर्चावरील उद्दिष्ट वाढवणे आवश्यक आहे. ज्यासाठी तुम्हाला नियमितपणे बचत करावी लागेल. प्रत्येक आर्थिक ध्येयासाठी हा मूलभूत आणि पहिला टप्पा आहे.
संपत्ती निर्मिती आणि दुसरे उत्पन्न (Wealth creation and second income)
दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे ही एक संथ प्रक्रिया आहे आणि त्यासाठी संयम आवश्यक आहे. संपत्ती निर्मितीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे योग्य मालमत्ता वाटप. तुमच्या जोखीम प्रोफाईल आणि उद्दिष्टांच्या आधारे, तुम्हाला मालमत्ता वाटप योजना तयार करणे आवश्यक आहे. उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत ठराविक वेळ, जोखीम क्षमता आणि बाजार स्थिती यावर आधारित वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे. इक्विटी, कर्ज आणि पर्यायी गुंतवणुकीची निवड आणि त्यांच्यासाठी वाटप दीर्घकालीन संपत्तीच्या निर्मितीमध्ये खूप मदत करेल. संपत्ती निर्माण करताना उत्पन्न देणार्या मालमत्तेचा विचार करा. हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अटींवर काम करण्याचे स्वातंत्र्य देईल.
संपत्ती व्यवस्थापन (Wealth management)
तुमची संपत्ती जसजशी वाढत जाईल, अशावेळी संपत्ती वाढेल आणि जमा होण्याच्या टप्प्यात व्यत्यय येणार नाही याची खात्री करण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले पाहिजेत. तुम्ही उचललेली जोखीम, उद्दिष्टे, बचत आणि गुंतवणुकीचे व्यवस्थापन कसे करता, यावरून तुम्ही दीर्घकालीन संपत्तीचे व्यवस्थापन किती चांगले करू शकता, हे ठरेल.
इस्टेट नियोजन (Estate planning)
तुमच्या मालमत्तेचे हस्तांतरण किंवा निर्माण केलेली संपत्ती ही शेवटची पायरी आहे. तुमच्या कायदेशीर वारसांना संपत्तीचे सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी, तुमच्याकडे योग्य उत्तराधिकार योजना असणे आवश्यक आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या कायदेशीर अडचणींचा अंदाज घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्टांची काळजी घेता येईल, असे इच्छापत्रं तयार करा.
या अशाप्रकारच्या सवयीद्वारे व नियोजनाद्वारे तुम्ही तुमच्या पैशांचे योग्य नियोजन करून आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू शकता.