BMC MCGM Budget 2023: मुंबई महापालिकेचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी (दि. 4 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. पण यावेळी महापालिकेची मुदत संपली असल्यामुळे पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्प म्हणून न मांडता तो हंगामी अर्थसंकल्प म्हणून मांडावा, अशी मागणी केली जात आहे. पण हंगामी अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय? याबाबत आपण अधिक तपशिलाने जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी अर्थसंकल्प म्हणजे काय (What is Budget) आणि अर्थसंकल्पाबाबत घटनेतील तरतुदीबाबत जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
अर्थसंकल्प म्हणजे काय?
अर्थसंकल्प/बजेट म्हणजे वर्षभराचा जमा-खर्च. ही संज्ञा प्रत्येक घराला, कुटुंबाला, संस्थेला, सरकारी आस्थापनेला लागू होते. यामध्ये मागील वर्षातील खर्चाबरोबरच येणाऱ्या वर्षातील संभाव्य गरजा आणि त्यासाठी केलेली आर्थिक तरतदू अशी आर्थिक धोरणे जाहीर केलेली असतात, त्याला अर्थसंकल्प (Budget) म्हटले जाते. केंद्र सरकारपासून, राज्य सरकार, महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीलाही बजेट सादर करावे लागते.
राज्यघटनेत अर्थसंकल्पाची तरतूद काय?
अर्थसंकल्प तयार करणे किंवा सादर करणे हा केंद्र-राज्य सरकार आणि महापालिकेचा अधिकार नसून ते कर्तव्य आहे. घटनेतील अनुच्छेद 112 आणि 202 कलमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षाच्या जमा-खर्चाच्या अंदाजाचा ताळेबंद म्हणजेच अर्थसंकल्प सादर करणे हे बंधनकारक आहे.
हंगामी अर्थसंकल्प म्हणजे काय?
राज्यघटनेच्या कलम 112 अनुसार जसा संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची तरतूद आहे. तशीच घटनेतील कलम ११६ अनुसार हंगामी अर्थसंकल्प मांडण्याची तरतदू आहे. हंगामी अर्थसंकल्पाला अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) किंवा मिनि बजेट (Mini Budget) असेही म्हटले जाते. घटनेतील काही नियमांनुसार, अर्थसंकल्प मांडण्याचेही काही नियम आहेत. जसे की, सत्ताधारी पक्षाला पुढील आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची मुभा आहे. पण जर एखाद्या संस्थेचा कालावधी संपला असेल तर अशावेळी Votes on Accounts सादर केले जाते. म्हणजे तो पूर्ण अर्थसंकल्प नसतो. त्यात फक्त जमा-खर्चाचा उल्लेख असतो. संपूर्ण अर्थसंकल्प किंवा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Full Budget or General Budget) म्हणजेच पुढील वर्षातील नवीन प्रकल्प, योजना किंवा इतर गोष्टींसाठी आर्थिक तरतूद करण्याचा अधिकार सत्ताधारी सरकारला असतो.
बीएमसीच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो?
- महानगर पालिका आयुक्तांचे भाषण
- अर्थसंकल्पीय अंदाजातील ठळक मुद्दे
- अर्थसंकल्पाची पुस्तके
- परफॉर्मन्स बजेट
- जेंडर बजेट
- वॉर्डनिहाय बजेटची पुस्तके
गेल्या वर्षी म्हणजे 2022-23 या आर्थिक वर्षातील महापालिकेचा अर्थसंकल्प 45,949 कोटींचा होता. त्याआधीच्या वर्षात 2021-22 मध्ये तो 39,038.83 कोटी इतका होता. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेचे बजेट हे देशातील आठ राज्यांच्या बजेटपेक्षा मोठे आहे. ते यावर्षी 50,000 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.