NMC Budget 2023 : वर्ष 2022- 23 या आर्थिक वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प आज (24 मार्च) नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सादर केला. याआधी त्यांनी वर्ष 2021-22 चा 2,684.69 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. महानगर पालिकेच्या महसुलाच्या उत्पन्न साधनांमधुन मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने, आर्थिक वर्ष 2022-23 करीता मनपाचे सुधारित उत्पन्न 2916.74 कोटी रुपये झाले आहे. मनपा आयुक्त-राधाकृष्णन बी यांनी प्रारूप अर्थसंकल्प सादर केला असला, तरी महासभेच्या स्थायी समितीने त्याची निवड केल्यानंतर येत्या काही महिन्यांत त्यात पुन्हा सुधारणा करण्यात येणार आहे,अशी माहिती प्राप्त झालेली आहे.
Table of contents [Show]
मालमत्ता करापासून 300 कोटींचे उद्दिष्ट निश्चित
जी. आय. एस. (GIS)सर्वेक्षणामुळे सर्व नविन मालमत्ता संरक्षण श्रेणीत आलेल्या आहे. आणि मालमत्तेवर लावण्यात आलेले कर निर्धारित केल्याने, कराच्या मागणी दरात वाढ झालेली आहे.आर्थिक वर्ष 2023-2024 करीता मालमत्ता करापासून 300 कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे, अशी माहिती नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली.
पुढील आर्थिक वर्षात उत्पन्न वाढण्याची शक्यता
महानगर पालिकेच्या नगर रचना विभागाला एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत तब्बल 141.92 कोटी रुपयांचं उत्पन्न झालं आहे. तसेच यापुढे देखील 73.29 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न होणे शक्य आहे आणि तशी अपेक्षा देखील आहे. तसेच पुढील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 154.94 कोटीचे उत्पन्न होण्याची शक्यता आयुक्त-राधाकृष्णन बी यांनी व्यक्त केली आहे.
पाणी दरापासून 210 कोटी उत्पन्न होण्याची शक्यता
महानगर पालिकेच्या जलप्रदाय विभागाकडून 200 कोटी रुपयांचे उत्पन्न होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यापैकी केवळ 137.98 कोटीच रुपये उत्पन्न मिळाले. तर वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात पाण्यावरिल करापासुन मिळणारे उत्पन्न 210 कोटी रुपये असणार असल्याचे मत, प्रस्तावात मांडले आहे.
अमृत योजनेअंतर्गत होणार बळकटीकरण
नागपूर महानगरपालिकेच्या अमृत योजनेत मनपाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकृत, अनधिकृत, स्सम आणि इतरही पाणी पुरवठा प्रणालीचे विस्तारीकरण, उन्नतीकरण व बळकटीकरण या कामांचा समावेश असेल.
अमृत योजने अंतर्गत होणार 16 जलकुंभाचे बांधकाम
अमृत योजने अंतर्गत सद्यःस्थितीत 16 जलकुंभाचे बांधकाम मे. वाप्कोस या कंपनी कडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे याच योजने अंतर्गत एकूण प्रस्तावित 377 कि.मी. पैकी मे. वाप्कोस तर्फे 337 कि. मी. पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात उर्वरित कामे पूर्ण करण्याचा मानस मनपाचा आहे. विशेषता डबल डेकर जलकुंभ हे भारतात पहिल्यांदाच बांधण्यात येणार आहे. तर अमृत योजनेअंतर्गत मनपा कंत्राटी पध्दतीने 16 जलकुंभाचे कार्य करणार आहे. त्यापैकी 14 जलकुंभाचे कार्य सुरु झालेले आहे. यासाठी 89.92 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
तसेच अमृत योजना 2 अंतर्गत मनपाच्या अधिकृत आणि अनाधिकृत लेआऊट मध्ये स्लम वितरण व्यवस्था फिडर मेन टाकणे, आणि बूस्टर पंप बसविणेचे काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पास 381.85 कोटी रुपयांचा प्रस्ताव खर्च आराखडा तयार करण्यात आला आहे.