भारतीय नागरिकांना प्राचीन काळापासून सोन्याचे विलक्षण आकर्षण आहे. केवळ स्त्रियांनाच सोन्याच्या दागिन्यांची आवड असते असे नाही तर अनेक पुरुषही सध्याच्या काळात सुवर्ण संचय करताना आढळू लागले आहेत. जानेवारी 1971 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 71 रुपये होता. सप्टेंबर 2022 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,000 हजारांच्यावर गेला. 2008 मध्ये अमेरिकेत आलेल्या (subprime mortgage crisis) महामंदीमुळे त्यावेळी डॉलरच्या तुलनेत जगभरातून सोन्याला पर्यायी गुंतवणुकीचे साधन म्हणून बघितले जाऊ लागले.
सोनं आणि विशेषतः सोन्याच्या दागिन्यांकडे गुंतवणूक म्हणून पाहावे का? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तरं देण्याआधी ‘गुंतवणूक’ (Investment) या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत (Income minus expenses is savings). या बचतीमधील काही रक्कम ज्यावेळेला परतावा (Returns) मिळण्यासाठी एखाद्या गुंतवणूक योजनेत गुंतवली जाते, त्या प्रक्रियेला गुंतवणूक म्हणतात. म्हणजे या प्रक्रियेत त्या व्यक्तीकडे गुंतवणूक योग्य काही पैसे असतात. त्या पैशातून तो काही मालमत्ता (Assets) उदा. शेअर्स (Shares), रोखे (Bonds), मुदत ठेवी (Fixed Deposit) विकत घेतो. त्यामधून त्याला काही परतावा उदा. व्याज (Interest), डिव्हिडंड (Dividend), वृद्धी (Growth) असे लाभ मिळतात आणि मुदती अखेर किंवा शेअर्सच्या बाबतीत ते विकल्यावर त्यावर पुन्हा काही रक्कम मिळते. या गुंतवणूक प्रक्रियेचा विचार करता सोन्याच्या दागिन्यांची खरेदी गुंतवणूक म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. कारण सोन्याचे दागिने घेऊन सोन्याचा भाव वाढल्यावर ते दागिने विकणारी व्यक्ती विरळच. एखादे आर्थिक संकट आले, पैशांची चणचण निर्माण झाली आणि इतर मार्ग उपलब्ध नसतील तरच सोन्याचे दागिने विकण्याची उदाहरणे पाहायला मिळतात. म्हणून सोन्याच्या दागिन्यांना गुंतवणूक (Investment in Gold) म्हणणे योग्य ठरणार नाही. ती केवळ भावनिक गुंतवणूक म्हणता येईल.
पण सोन्याच्या दागिन्याच्या व्यतिरिक्त सोन्याची इतर मार्गांनी खरेदी करणे ही गुंतवणूक म्हणून पाहता येईल. चलनवाढीमुळे पैशाच्या मूल्याची ज्यावेळेला घसरण होते. त्यावेळेला सोन्याचे महत्त्व अधोरेखित होते. पण सोन्याच्या गुंतवणुकीवर जास्तीची भिस्त ठेवू नये. काही गुंतवणूकदार त्यांच्या एकूण पोर्टफोलिओमधील 50 ते 70 टक्के रक्कम सोन्यात गुंतवतात. पण हे म्हणजे मृत्यू अटळ आहे, म्हणून फक्त आयुर्विमा (Insurance) घेण्यासारखं आहे. त्यामुळे एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओमधील फक्त 5 ते 10 टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये असावी, असं गुंतवणूक सल्लागारांकडून सांगितलं जातं. आता आपण ही गुंतवणूक कुठे करणे शक्य आहे; हे समजून घेऊ.
Table of contents [Show]
सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds)
सरकारने 2015 मध्ये पहिल्यांदा सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड्स (Sovereign Gold Bonds) विक्रीस आणले होते. या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना किमान ‘ग्रॅम’मध्ये गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदाराला याचे बॉण्ड सर्टिफिकेट मिळते किंवा ‘डिमॅट फॉर्म’मध्येही गुंतवणूक करता येते. भारत सरकारच्यावतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) हे बॉण्ड विक्रीस काढते. बॉण्ड्सचा दर ठरविताना सरकार, ‘इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion and Jewellers association)’ या संस्थेने जाहीर केलेला दर ग्राह्य धरते. एका सर्वसामान्य गुंतवणूकदाराला किमान एक ग्रॅमपासून कमाल 4 किलोपर्यंत गुंतवणूक करता येते. यावर गुंतवणुकदाराला व्याज ही दिले जाते. यासाठी गुंतवणुकीचा कालावधी 8 वर्षे आहे. मात्र 5 वर्षांनंतर गुंतवणूकदार या योजनेतून बाहेर पडू शकतो.
गोल्ड ईटीएफ (Gold ETF)
सोव्हरीन गोल्ड बॉण्डचा पर्याय कार्यरत होण्यापूर्वी, गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (Exchange Traded Fund-ETF) हीच योजना अस्तित्वात होती. सर्टिफिकेट स्वरूपातील ही गुंतवणूक 2007 मध्ये सुरू करण्यात आली. गुंतवणूकदारांना सोन्याच्या दरातील बदलानुसार यात परतावा मिळतो. या गुंतवणुकीतील प्रत्येक युनिट हे 22 कॅरेटचे 99.5 टक्के शुद्धतेचे असते. यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला ‘डिमॅट’ खाते उघडावे लागते. ईटीएफचे प्रत्येक युनिट म्हणजे एक ग्रॅम सोनं असते. यात गुंतवणुकीवर मर्यादा नाही.
गोल्ड म्युच्युअल फंड्स (Gold Mutual Funds)
गोल्ड म्युच्युअल फंड ही ‘पेपर गोल्ड (Paper Gold)’ स्वरूपातील गुंतवणूक मानली जाते. यासाठी डिमॅट खाते हवेच असे नाही. यात एसआयपीने (Systematic Investment Plan-SIP) किंवा एकत्रित रक्कम गुंतवता (lump sum) येते. पण या योजनेच्या खर्चाचे प्रमाण जास्त असते. परिणामी कमी परतावा मिळतो. तर काही म्युच्युअल फंड कंपन्या सोन्याच्या खाणींच्या कंपन्यांत गुंतवणूक करतात आणि या गुंतवणुकीवर आधारित योजना गोल्य म्युच्युअल फंड योजना लॉन्च करतात.
ज्वेलर्स, बँकांमध्ये सोन्याची नाणी आणि सोन्याचे बार विकत मिळतात. बँकांमधून जर सोनं विकत घेतलं तर बँका ते परत विकत घेत नाहीत, ही गोष्ट गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यायला हवी. सोन्याच्या त्या वस्तू इतर विकाव्या लागतात. स्टेट बँकेकडे विक्रीसाठी 2, 4, 5, 8, 9, 10 ग्रॅमची नाणी आणि 20 व 50 ग्रॅमचे बार विक्रीस उपलब्ध असतात. याच्या किमतीही रोजच्या सोन्याच्या भावाप्रमाणे असतात. अशाप्रकारे सोनं खरेदी करताना त्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच सोनं विकताना त्याची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा नेहमी कमी असते.
त्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीचा विचार करता पहिले प्राधान्य ‘सोव्हरीन गोल्ड बॉण्ड’ला द्यावे, असं सांगतिलं जातं. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ‘सोव्हरीन बॉण्ड’ चांगला पर्याय आहे. त्यानंतर गोल्ड ईटीएफचा पर्याय योग्य ठरू शकतो.