• 02 Oct, 2022 08:32

सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड Vs प्रत्यक्ष सोनं खरेदी; गुंतवणुकीचा कोणता पर्याय चांगला?

सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड Vs प्रत्यक्ष सोनं खरेदी; गुंतवणुकीचा कोणता पर्याय चांगला?

Sovereign Gold Bond Scheme August 2022: आजच्या घडीला सोनं खरेदी करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष सोनं आणि पेपरच्या स्वरूपातलं सोनं असं दोन्ही प्रकारे सोनं खरेदी करता येतं. पण यातील फायदेशीर मार्ग कोणता? याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Sovereign Gold Bond Scheme August 2022: सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने पुन्हा एकदा एक चांगली संधी आणली आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड स्कीम 2022-23 मधील दुसरा टप्पा सोमवार (दि.22 ऑगस्ट)पासून सुरू झाला असून तो 26 ऑगस्टपर्यंत असणार आहे. यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने प्रति ग्रॅम सोन्याची किंमत 5,197 रूपये निश्चित केली. यामुळे अनेक गुंतवणूकदार डिजिटल गोल्डचा पर्याय स्वीकारत आहेत; पण काही गुंतवणूकदार अजून ही संभ्रमात आहेत. कारण त्यांना प्रत्यक्ष सोनं खरेदी महत्त्वाचं वाटतं. यासाठी आम्ही तुमच्यासाठी डिजिटल गोल्ड आणि प्रत्यक्ष सोनं खरेदी यांच्यातील फरक घेऊन आलो आहोत.

सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड विरूद्ध प्रत्यक्ष सोनं!

प्राचीन काळापासून, राजेशाही काळ ते आजपर्यंत सर्वसामान्यांसाठी सोनं खूपच मोल्यवान राहिलं आहे. शतकानुशतकं कुटुंबासाठी आर्थिक आणीबाणीवर मात करण्यासाठी सोन्याचा साधन म्हणून वापर होत आला आहे. त्यामुळे सोन्याचे मूल्य हे भारतातील आर्थिक साहाय्य प्रणालीचं मजबूत प्रतिक बनलं आहे. आजच्या घडीला सोनं खरेदी करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष सोनं आणि पेपरच्या स्वरूपातलं सोनं असं दोन्ही प्रकारे सोनं खरेदी करता येतं. प्रत्यक्ष सोन्यामध्ये तुम्ही दागिने, नाणी, बार, बिस्किटं किंवा एखाद्या वस्तूच्या रूपात सोनं खरेदी करू शकता. तर पेपर गोल्डमध्ये सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड्स (SGB), एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF), गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund) द्वारे खरेदी करता येऊ शकते. चला तर मग दोन्ही पद्धतीने सोनं खरेदी करण्याचे चांगले आणि वाईट परिणाम आपण जाणून घेऊयात.

सॉव्हरीन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक

सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा डिजिटल प्रकार आहे. म्हणजे आपण कागदोपत्री सोनं खरेदी करू शकतो. सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड किंवा पेपर गोल्ड खरेदी करण्यासाठी डिमॅट खात्याची आवश्यकता नसते. आरबीआय सरकारशी चर्चा करून दरवर्षी गोल्ड बॉण्ड वितरित करत असते. वर्षातून दर 2 ते 3 महिन्यांनी गोल्ड बॉण्ड विक्रीसाठी खुले केले जातात. इथे गुंतवणूकदारांना किमान 1 ग्रॅम ते 4 किलो सोनं खरेदी करता येतं.

गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे

वार्षिक 2.5 टक्के व्याज

सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड्स 8 वर्षांच्या मुदतीसाठी जारी केले जातात. तसेच त्यावर प्रतिवर्षी 2.5 टक्के व्याजदरानुसार दर दोन वर्षांनी वितरित केले जाते. 5 वर्षाच्या कालावधीनंतर यातून तुम्ही बाहेर पडू शकता.

सुरक्षित गुंतवणूक

प्रत्यक्ष सोनं किंवा दागिने बाळगणं यामध्ये काही प्रमाणात जोखीम असते. ते चोरीला जाण्याची शक्यता असते किंवा त्याच्या सुरक्षिततेसाठी अधिक पैसे खर्च करून लॉकरची सुविधा घ्यावी लागते. तसेच दागिने तयार करण्यासाठी जो खर्च येतो. त्याचेही पैसे द्यावे लागतात. त्या तुलनेत पेपर गोल्डसाठी यापैकी एकही गोष्ट करावी लागत नाही. ते पूर्णत: सुरक्षित आहे.

नो कॅपिटल गेन टॅक्स

सॉव्हरीन गोल्ड बॉण्डमधील गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स आकारला जात नाही. 

नो जीएसटी 

सॉव्हरीन गोल्ड बॉण्डच्या खरेदीवर प्रत्यक्ष सोन्याप्रमाणे जीएसटी द्यावा लागत नाही किंवा त्यावर मेकिंग चार्जेसही लागत नाही. 

तारण कर्ज

कर्ज घेण्यासाठी सॉव्हरीन गोल्ड बॉण्डचा तारण म्हणून वापर करता येऊ शकतो.

Benefits of Sovereign Gold Bonds

प्रत्यक्ष सोन्याऐवजी सॉव्हरीन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे

कमी लिक्विडिटी

प्रत्यक्ष सोन्याच्या तुलनेत सॉव्हरीन गोल्ड बॉण्डमध्ये कमी लिक्विडीटी असते. तसेच गोल्ड बॉण्डसाठी 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे.

किमतीतील अस्थिरता

सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यास सॉव्हरीन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवलेल्या रकमेत तोटा होण्याचा धोका अधिक असतो.

कॅपिटल गेन टॅक्स

सॉव्हरीन गोल्ड बॉण्डचा मॅच्युअर्ड कालावधी पूर्ण केल्यावर त्यावर गेन टॅक्स लागत नाही. पण मॅच्युरिटीच्या अगोदर त्यातून बाहेर पडल्यास त्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो.

प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करायची की सॉव्हरीन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करायची, हे प्रत्येक व्यक्तीच्या गुंतवणुकीच्या उद्देशावर अवलंबून ठरू शकते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणुकीचा उद्देश, परताव्याची अपेक्षा आणि मार्केेटमधील स्थिती पाहून निर्णय घेणं योग्य ठरू शकतं. यासाठी तुमच्या ओळखीच्या अधिकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.