भारतीय बँकांची वर्ष 2022 च्या शेवटच्या तिमाहीतली कामगिरी जेफरीज् ने प्रसिद्ध केली आहे. आणि स्वत: जेफरीज् संस्थेला इंडसइंड बँकेची कामगिरी आश्वासक वाटत आहे. 31 डिसेंबरला जाहीर झालेला हा डेटा बँकांच्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यानच्या कामगिरीवर आधारित आहे.
या कालावधीत इंडसइंड बँकेचा नेट अॅडव्हान्स गेल्यावर्षीच्या तुलनेत 19% नी वाढलेला होता. नेट अॅडव्हान्सचा एक सोपा अर्थ बँकेची कर्ज वसुली ही बुडित कर्जाच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे हा आकडा आश्वासक मानला जातो. त्यासाठी नेट अॅडव्हान्स विरुद्ध बुडित निघालेलं कर्ज यांचं गुणोत्तर तपासलं जातं.
डिसेंबर 2022 पर्यंत इंडसइंड बँकेकडे 2,71,966 कोटी रुपये इतका नेट अॅडव्हान्स होता. तर बँकेकडे जमा झालेल्या मुदत ठेवींचं मूल्य 3,25,491 कोटी रुपये इतकं होतं. मुदत ठेवींमध्येही गेल्यावर्षीच्या तुलनेत 14% वाढ झाली आहे.
बुधवारी भारतीय शेअर बाजारात मात्र इंडसइंड बँकेची थोडी पिछेहाट झाली. आणि बाजार बंद होताना शेअर 1215 रुपयांवर बंद झाला. ही घसरण साधारण अर्ध्या टक्क्याची होती.
जेफरीज् ना बँकेचं कर्ज वाटपाचं प्रमाण आणि मुदत ठेवींमध्ये झालेली वाढ आश्वासक वाटतेय.
‘इंडसइंड बँकेनं दिलेल्या रिटेल कर्जाचं प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढलंय. तसंच बँकेकडच्या मुदत ठेवी 14% नी वाढल्या आहेत. CASA आकडाही 42% इतका आहे, जो मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी झालाय. कासा मुदत ठेवींमध्ये 21% वाढ होतेय. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात इंडरइंड बँकचा यावर्षीचा प्रवास आश्वासक असेल,’ असं जेफरीज् नी आपल्या अहवालात म्हटलं आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांनी बँकेत जमा केलेल्या ठेवी 1,37,968 कोटी रुपये मूल्याच्या आहेत. तर छोट्या उद्योजकांच्या ठेवी 1,29,990 कोटी रुपयांच्या आहेत. तर बँकेच्या नफ्यातही चांगली वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत बँकेचा नफा 1786 कोटी रुपये इतका होता. तर इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये 94,813.87 कोटी रुपयांची गुंतवणूक आतापर्यंत झालेली आहे.
(Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन आहे. आणि गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा. महामनी डॉट कॉम कधीही शेअर बाजारातल्या ट्रेडिंगचा सल्ला देत नाही.)