बँकांमध्ये जितक्या जास्त मुदत ठेवी (Fixed Deposit) जमा होतात किंवा बँक खात्यांमध्ये (Bank Account) जितका निधी जास्त, तितकी त्यांची कर्ज (Bank Loans) देण्याची क्षमता वाढते हे उघड गणित आहे. म्हणूनच दर तिमाहीला मुदत ठेवींची आकडेवारी जाहीर होते त्यावर जाणकारांचं लक्ष असतं. आणि या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 (Oct - Dec 2022) मध्ये मुदत ठेवींच्या बाबतीत अव्वल क्रमांक पटकावलाय तो HDFC बँकेनं (HDFC Bank Limited).
गेल्यावर्षी याच कालावधीत जमा झालेल्या मुदत ठेवींच्या मानाने यंदा त्यामध्ये 20% वाढ झाली आहे. आणि ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये बँकेत जमा झालेल्या मुदत ठेवींचं मूल्य 17.33 लाख कोटी रुपये इतकं आहे. यात रिटेल मुदत ठेवींमध्ये झालेली वाढ 22% तर घाऊक मुदत ठेवींमध्ये झालेली वाढ 12% इतकी आहे.
मुदत ठेवींचं वाढलेलं प्रमाण आपल्याला असंही सांगतं की, लोकांचा कल शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर जोखमीच्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा मुदत ठेवींकडे आहे. यामागेही दोन कारणं देता येतील.
- कोव्हिड नंतरच्या काळात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात मंदीसदृश वातावरण तयार झालंय. आणि त्यामुळे शेअर बाजार, क्रिप्टोकरन्सी या आधीच जोखमीच्या असलेल्या गुंतवणूक साधनांमध्ये लोकांचं नुकसान होतंय.
- आणि युद्ध तसंच मंदीमुळे देशांच्या मध्यवर्ती बँकांनी ठेवींवरचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे पूर्वी मुदत ठेवींवर असलेला 6% हा व्याजदर वाढून आता 7.00 किंवा 7.50% वर पोहोचला आहे.
कर्जाचं प्रमाण किती वाढलं? Did Loan Disbursement Also Increase?
बँकेकडे मुदत ठेवीच्या माध्यमातून पैसे जमा झाले असतील तर पुढचा प्रश्न तुमच्या मनात आला असेल - मग बँकेनं दिलेल्या कर्जात वाढ झाली का?
HDFC बँकेच्या बाबतीत याचं उत्तर नाही, असं द्यावं लागेल. बँकेनं ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 15.07 लाख कोटी रुपयांची कर्जं ग्राहकांना दिली. आणि हे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त असलं तरी जमा झालेल्या मुदत ठेवींच्या प्रमाणात कमी आहे.
संपूर्ण बँकिंग व्यवस्थेनं मात्र तिसऱ्या तिमाहीत 25% ची कर्ज वाढ पाहिली आहे. म्हणजे मागच्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर कालावधीत दिलेल्या कर्जांच्या तुलनेत यावर्षीची कर्ज 25% जास्त आहेत. बजाज फायनान्स, येस बँक, असेट्स अंडर मॅनेजमेंट यासारख्या बँकांनी कर्जाचं प्रमाण वाढल्याचंच म्हटलंय.
मंदीच्या काळात लोकांचं कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. पण, HDFC बँकेच्या बाबतीत अपेक्षित वाढ दिसलेली नाही. मुदत ठेवींवर बँकेला व्याज द्यावं लागतं. तर कर्जातून बँकेला मिळणार असतं. त्यामुळे कर्जाचं प्रमाण कमी होणं हे बँकेसाठी धोकादायक मानलं जातं.