आजूबाजूला घडणारे बँकेतले कर्ज घोटाळे (Bank Scams) आणि सहकारी बँका (Co-Operative Banks) बंद पडण्याच्या घटना पाहिल्या की, बँकेच्या सुरक्षिततेविषयी (Safe Banking) नेहमीच प्रश्न मनात येतात. आणि आपले बँकेतले पैसे सुरक्षित आहेत का , असा प्रश्नही पडतो. त्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल दरवर्षी रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) जाहीर होणारी एक यादी. बँक किती विश्वासार्ह आहे याची यादी रिझर्व्ह बँकेकडून नियमितपणे आणली जाते.
बँकेवर गुंतवणूकदार आणि ठेवीदारांचा किती विश्वास होता, बँकेची सेवा कशी होती, बँकेचा तिमाही आणि वार्षिक ताळेबंद कसा होता, बँकेच वसूल झालेली कर्जं आणि बुडित कर्जं यांची यादी असे निकष वापरून रिझर्व्ह बँक अशी यादी तयार करत असते. या यादीला Domestically Systemically Important Banks (D-SIBs) असं म्हटलं जातं.
या यादीनुसार, देशातल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विश्वसनीय बँका आहेत - स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि ICICI बँक. स्टेट बँक ही या यादीतली एकमेव सरकारी बँक आहे.
D-SIBs म्हणजे नेमकं काय? What is D-Sib?
2015 पासून अशा बँकांची यादी रिझर्व्ह बँक जाहीर करत आली आहे. सुरुवातीला या यादीत फक्त दोन बँका होत्या ICICI आणि स्टेट बँक ऑफ इंडिया.
देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि लोकांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचं स्थान असलेल्या बँकांना D-SIB चा दर्जा दिला जातो. ज्या बँकांमध्ये झालेले घोटाळे किंवा मोठ्या घडामोडींचा परिणाम जनतेवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत असतो, अशा बँकांचा समावेश या यादीत होतो.
आणि अशा बँकांवर रिझर्व्ह बँकेची करडी नजर राहते. जेणेकरून लोकांचे बँकांमध्ये असलेले पैसे सुरक्षित राहावेत. यासाठी या बँकांना त्यांच्याकडे जमा झालेल्या ठेवींपैकी 0.6% रक्कम ही टिअर 1 या सगळ्यात सुरक्षित असेटमध्ये गुंतवणं बंधनकारक आहे. त्यामुळे या बँकांचे पैसे सुरक्षित राहावेत आणि पर्यायाने लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत असा रिझर्व्ह बँकेचा विचार आहे. ICICI बँकेसाठी हे प्रमाण 0.20% इतकं निर्धारित करण्यात आलं आहे.
बँका देशात किती दूर पसरल्यात आणि बँकांमध्ये होणारे व्यवहार किती आहेत यावरून रिझर्व्ह बँक D-SIB यादी अपडेट करत असते. या यादीतल्या बँका दवाळखोरीत निघण्याची शक्यता कमी असते. आणि गरज पडली तर रिझर्व्ह बँक या बँकांना मदत करायला तत्पर असते.