Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Pharma Product Ban : नेपाळने सोळा भारतीय कंपन्यांच्या औषधांच्या आयातीवर घातली बंदी 

Pharma Companies

नेपाळने भारतातल्या सोळा फार्मा कंपन्यांच्या औषधावर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यातली एक कंपनी रामदेव बाबांनी प्रमोट केलेली दिव्या फार्मसीही आहे. जागतिक आरोग्य परिषदेनं घालून दिलेल्या उत्पादन प्रणालीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका या कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे.

नेपाळ सरकारने (Nepal Government) सोळा भारतीय फार्मा (Pharma Companies) कंपन्यांकडून होणारी औषधांची आयात (Pharma Import) ताबडतोब थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्या चांगल्या उत्पादन प्रणालीसाठी (GMP) जागतिक आरोग्य परिषदेनं (WHO) घालून दिलेल्या नियमांचं पालन करत नसल्याचं नेपाळ सरकारच्या औषध प्रशासन विभागाने (Drug Regulation Authority) म्हटलं आहे. विशेष म्हणजे यातली एक कंपनी बाबा रामदेव प्रमोट करत असलेली दिव्या फार्मा ही आहे.   

इतर कंपन्यांची नावं अशी आहेत,   

रॅडियंट पॅरेंटेरल्स, मर्क्युरी लॅबोरेटरीज्, अलायन्स बायोटेक, कॅपटॅब बायोटेक, अॅग्लोमेड लिमिटेड, झी लॅबोरेटरीज्, डॅफोडिल्स फार्मास्युटिकल्स, GLS फार्मा, युनिज्यूल्स लाईफ सायन्स, कन्सेप्ट फार्मास्युटिकल्स, श्री आनंद  लाईफ सायन्सेस, IPCA लॅब, कॅडिला हेल्थकेअर, डायल फार्मास्युटिकल्स, अॅग्लोमेड आणि मॅकर लॅब.   

‘या कंपन्यांमध्ये औषधांचं उत्पादन कशा प्रकारे होतं याची पाहणी नेपाळ प्रशासनाकडून करण्यात आली होती. आणि उत्पादनाच्या वेळी जागतिक आरोग्य परिषदेनं घालून दिलेले निकष पाळत नसल्याचं आढळल्यामुळे या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे,’ असं नेपाळच्या औषध प्रशासन विभागाचे प्रवक्ते k C संतोष यांनी काठमांडी पोस्ट या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.   

नेपाळच्या औषध प्रशासनाने यावर्षी एप्रिल आणि जुलै महिन्यात देशात औषध आयात होणाऱ्या कंपन्यांमध्ये पाहणीसाठी आपले प्रतिनिधी पाठवले होते. आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे नेपाळने बंदी घातलेल्या बहुतेक कंपन्या याच कारणासाठी भारतीय औषध प्रशासनाच्याही रडारवर आहेत. आणि यातल्या काही कंपन्यांची भारतात नोंदणी प्रक्रियाही झालेली नाही.