महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय (FDA) राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क (औषध निर्मिती पार्क) Bulk Drug Park उभारण्याचे नियोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील एकूण फार्मा उद्योगातील उत्पादनापैकी 20% उत्पादन होते. त्यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने औषधनिर्मिती पार्क उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याच्या वृत्ताला IDMA चे सचिव दारा पटेल यांनी दुजोरा दिला आहे.
Table of contents [Show]
- रायगड जिल्ह्यामध्ये उभा राहणार पार्क (Bulk Drug Park in Raigad)
- अडीच हजार कोटींची गुंतवणूक (Bulk drug park investment)
- भारतीय औषधनिर्मिती क्षेत्र जगात तिसऱ्या क्रमांकावर
- बल्क ड्रग्ज पार्कमध्ये काय सुविधा असतील (Facilites in bulk drug park)
- कोरोनाकाळात कच्च्या मालाचा तुटवडा (Shortage of raw material in covid)
रायगड जिल्ह्यामध्ये उभा राहणार पार्क (Bulk Drug Park in Raigad)
रायगड जिल्ह्यामध्ये ड्रग्ज पार्क उभारण्यासाठी भारतीय ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशनला Indian Drugs Manufacturers’ Association (IDMA) याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्याचे वृत्त आघाडीच्या माध्यमांनी दिले आहे. "बल्क ड्रग्ज पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या FDA कडून आम्हाला प्रस्ताव प्राप्त झाला आहे. नव्याने कंपनी उभारायची असल्याचे सरकारकडून अनुदान दिले जाईल. कारण कंपन्यांकडे नवीन प्रकल्प सुरू करण्यास बऱ्याच वेळा जागा नसते. कंपन्यांना सुविधा दिल्यास त्यांनाही प्रोत्साहन मिळेल" असे पटेल म्हणाले.
अडीच हजार कोटींची गुंतवणूक (Bulk drug park investment)
औषध निर्मिती करण्यासाठी कच्च्या मालासाठी आयातीवर अवलंबून न राहता राज्यातच कच्चा माल तयार व्हावा. तसेच औषध निर्मितीमध्ये राज्याची क्षमता आणखी वाढवण्यासाठी सुमारे अडीच हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकार 1 हजार कोटींची मदत करणार असून इतर गुंतवणूक राज्य सरकार करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्कमुळे भारत औषध निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास करण्यात आला आहे.
भारतीय औषधनिर्मिती क्षेत्र जगात तिसऱ्या क्रमांकावर
भारतीय औषधनिर्मिती क्षेत्र उत्पादनाच्या क्षमतेनुसार जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, कच्च्या मालासाठी भारत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. काही औषधांची निर्मिती करण्यासाठी तर १०० टक्के कच्चा माल आयात करावा लागतो. या साखळीमध्ये जर अडथळा आला तर त्याचा परिणाम थेट उत्पादनावर होऊ शकतो. अनेक वेळा कच्चा मालाच्या बदलत्या किंमतीही बाजारपेठेत अस्थिरता निर्माण करतात.
बल्क ड्रग्ज पार्कमध्ये काय सुविधा असतील (Facilites in bulk drug park)
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, सॉल्वन्ट साठवणूक व्यवस्था, सुरक्षा आणि धोकादायक कामांसाठी ऑडीट सेंटर उभारण्यात येईल. प्रकल्प उभारणीसाठी अनुदान. उद्यागांसाठी जागेची उपलब्धता.
कोरोनाकाळात कच्च्या मालाचा तुटवडा (Shortage of raw material in covid)
भारतातील औषध निर्मिती कंपन्यांना चीनकडून मोठ्या प्रमाणात कच्चा माल पुरवला जातो. मात्र, कोरोना संकट आणि गलवान खोऱ्यातील भारत-चीन सैन्यातील धुमश्चक्रीनंतर कच्चा माल पुरवण्याची साखळी थांबली होती. मात्र, त्याच वेळी जगावर कोरोनाचे संकट असताना औषधांची मोठ्या प्रमाणात गरज भासत होती. अनेक महिने कच्चा माल बंदरामध्ये तसाच पडून होता. परिणामी संपूर्ण जगभरातील औषध निर्मिती साखळी धोक्यात आली होती. त्यानंतर भारताने कच्चा मालही भारतात निर्मिती करण्यास प्राधान्य दिले. अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रिडियंट (API) हे प्रामुख्याने औषध निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून लागते. या कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून न राहता भारतातच याचे प्रकल्प उभारणीसाठी सरकारने भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन तसेच अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.