वैद्यकीय क्षेत्रातील महागाईने (Medical Inflation) भारतात कहर केला आहे. आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतात वैद्यकीय उपचार प्रचंड महाग असल्याचे एका अहवालातून दिसून आले आहे. वर्ष 2021 मध्ये भारतातील मेडिकल इन्फ्लेशन रेट हा 14% इतका वाढला. आशिया खंडाचा विचार केला तर हा वैद्यकीय सेवांचा सर्वाधिक महागाई दर आहे.
करोना संकटात वैद्यकीय क्षेत्राचे महत्व अनेकपटीने वाढले होते. त्यानंतर आरोग्य विम्याची मागणी (Demand for Health Insurance) प्रचंड वाढली.आरोग्य सेवा क्षेत्रात महागाई वाढत असली तरी वर्ष 2022 मध्ये आरोग्य विमा विक्रीत 25% वाढ होण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडने केलेल्या भारतातील आरोग्य विमा उद्योगाचा आढावा अहवालात ही बाब समोर आली. छोट्या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांसाठी हेल्थ इन्शुरन्सचे कव्हर पुरवले जात आहे. हे देखील हेल्थ इन्शुरन्सचा खप वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे. वैद्यकीय उपचार महाग होत असल्याने कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच देण्याकडे छोट्या कंपन्यांचा कल असल्याचे दिसून आले आहे.
आशियातील इतर देशांच्या तुलनेत वर्ष 2021 मध्ये भारतातील आरोग्य सेवेतील महागाईचा दर 14% इतका वाढला. त्याखालोखाल चीनमधील मेडिकल इन्फ्लेशन रेट हा 12% इतका आहे. इंडोनेशिया 10%, व्हिएतनाम 10%, आणि फिलिपाईन्स 9% इतका आहे. मेडिकल क्षेत्रातील वाढती महागाई नव्या ग्राहकांसाठी खर्च वाढवणारी आहे. जुन्या ग्राहकांसाठी मात्र दुहेरी फटका देणारी आहे. वाढते वयाबरोबरच उपचारांचा खर्च वाढत असल्याने या ग्राहकांची कोंडी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. दावापूर्तीवेळी होणारे काटेकोर अंडररायटिंग, महागाई यामुळे हेल्थ इन्शुरन्सच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात आरोग्य विमा उद्योगासाठी आणखी संघर्ष करावा लागेल, असे या अहवालात म्हटलं आहे.
वर्ष 2022 मध्ये हेल्थ इन्शुरन्सच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली. हेल्थ इन्शुरन्सच्या प्रिमियममध्ये 13% वाढ नोंदवण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने ग्राहकांमध्ये हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेमचे प्रमाण वाढले. त्याशिवाय नॉन कोव्हीड क्लेममध्ये देखील तितकीच वाढ झाली. हेल्थ इन्शुरन्समधील एकूण दावेपूर्तीमध्ये कोव्हीडशी संबधित दाव्यांचे प्रमाण 6% इतके होते. ICRA च्या अंदाजानुसार वर्ष 2022 मध्ये हेल्थ इन्शुरन्स क्लेम (दावेपूर्ती) 11-12% इतके राहील.
हेल्थ इन्शुरन्सचा प्रिमियम वाढला
मेडिकल इन्फ्लेशन वाढल्याने वर्ष 2022 मध्ये हेल्थ इन्शुरन्सच्या सर्वच श्रेणीत प्रिमियम वाढल्याचे दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हेल्थ इन्शुरन्सचा सरासरी प्रिमियम 25,649 रुपये इतका झाला आहे. त्यात आणखी 2% वाढ झाली. ग्रुप इन्शुरन्सचा प्रिमियम 5% ते 40% इतका वाढला आहे. याशिवाय एलिव्हेटेड लॉस रेशो देखील किमान 10% वाढला आहे. एलिव्हेटेट लॉस रेशो आणि मेडिकल इन्फ्लेशन यामुळे आरोग्य विमा कंपन्यांना किरकोळ आणि ग्रुप विमा योजनांच्या प्रिमियममध्ये वाढ करावी लागली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत विमा दाव्यांमध्ये मोठी वृद्धी
कोरोना संकटच्या पहिल्या लाटेत आरोग्य विम्यांच्या दाव्यांमध्ये मोठी वृद्धी झाल्याचे दिसून आले. दाव्यांची पूर्ती देखील या काळात प्रचंड संख्येने झाली होती. दुसऱ्या लाटेत मात्र दावेपूर्तीचे प्रमाण 24% कमी झाले होते. तिसऱ्या कोव्हीड लाटेचा मात्र परिणाम मर्यादित होता. कारण रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने कमी झाले होते. मात्र दुसऱ्या बाजुला नॉन कोव्हीड दावे मात्र विमा उद्योगासाठी डोकेदुखी वाढवत आहेत.