Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning Tips: ‘या’ 4 टिप्स फॉलो केल्या, तर आर्थिक तणावाच्या काळातही घ्याल सुखाची झोप

Financial Planning Tips

Financial Planning Tips: हल्ली वाढत चाललेली महागाई आणि संपूर्ण जगात होत असलेली नोकरकपात पाहता अनेकांची झोप उडालीये. दररोज आपल्याला यासंदर्भातील बातम्या पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे खूप गरजेचे आहे.

शारीरिक आणि मानसिक विश्रांतीसाठी झोप ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दररोज घेतलेली पुरेशी झोप आपल्या आरोग्याच्या संपत्तीत भर घालत असते. पण हल्ली वाढत चाललेली महागाई (Inflation) आणि संपूर्ण जगात होत असलेली नोकरकपात पाहता अनेकांची झोप उडालीये. दररोज यासंदर्भातल्या बातम्या पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याला टिकून राहायचे असेल, तर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे आहे. जर आपण नीट आर्थिक नियोजन केले, तर आर्थिक तणावाच्या काळातही सुखाची झोप घेऊ शकतो. मात्र त्यासाठी आपल्याला काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. त्याबाबत आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

हातात पुरेसा पैसा ठेवा

आर्थिक नियोजन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन (Financial Planning & Management) करणे. आर्थिक अडचणीच्या काळात तुमच्या हातात पुरेसे पैसे असणे गरजेचे आहे. भविष्यातील अनेक तरतुदी लक्षात घेऊन आपण पैशांची गुंतवणूक करतो. पण ही गुंतवणूक करत असताना सर्व पैसे गुंतवण्याऐवजी ठराविक रक्कम बचत खात्यात ठेवली पाहिजे किंवा केलेल्या गुंतवणुकीपैकी काही गुंतवणूक अडचणीच्यावेळी काढता आली पाहिजे. जेणेकरून अडचणीच्या काळात हातात पुरेसा पैसा राहील.

यासोबतच प्रत्येकाने आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार करण्यावर भर द्यायला हवा. हा आपत्कालीन निधी साधारण सहा महिने (6 Months) वापरता येईल, इतका असावा. आर्थिक अडचणीच्या काळात किंवा नोकरी गेल्यानंतर या निधीचा वापर करत येऊ शकतो.

इन्शुरन्स पॉलिसी असावी

आजारपण हे कधीच सांगून येत नाही. हल्ली दगदगीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाच्या आरोग्याबाबत काही ना काही तक्रारी पाहायला मिळतात. छोट्यातील छोट्या रोगांवर उपचार करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य विमा (Medical Insurance) असेल, तर आपला वैद्यकीय खर्च विम्यातून कव्हर केला जातो. आर्थिक अडचणीच्या काळात पैशांची चणचण असते. अशातच अचानक वैद्यकीय खर्च समोर उभा राहिल्यावर लोकांची तारांबळ उडते. त्यामुळे योग्य वेळी आरोग्य विमा घेतला, तर आर्थिक तणावाच्या काळात वैद्यकीय खर्चाचे टेन्शन राहत नाही. मेडिक्लेम कार्डमुळे (Mediclaim Card) तुम्ही कॅशलेस व्यवहार करू शकता.

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन आजपासून करा

आपण प्रत्येकजण कधीतरी आपल्या नियमित नोकरीतून किंवा व्यवसायातून निवृत्त होणार आहोत, याचा विचार करून निवृत्तीसाठी गुंतवणूक (Investment for Retirement) करणे आवश्यक आहे. आपण आपल्या करिअरमधून कधी निवृत्त होणार आहोत, त्याचा कालावधी काय असेल याचा पूर्णता विचार करून निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी किती निधी गरजेचा आहे, हे विचारात घेणे आवश्यक आहे. त्यानुसार तुम्हाला सेव्हिंग करावी लागेल.

सरकारद्वारे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या निवृत्ती योजना राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात आणि आनंदात जगू शकता. पेन्शन योजना, अॅन्युइटी स्कीम, डेट फंड, इक्विटी आणि पारंपरिक बँक ठेव योजनांमध्ये ही तुम्ही गुंतवणूक करू शकता. भविष्याबाबतची आर्थिक तरतूद जर आपण केली असेल, तर आपण  निश्चिंत होऊन आयुष्य जगू शकतो.

संपत्ती निर्माण करा

स्वतःची संपत्ती (Financial Wealth) निर्माण करणे हा आर्थिक नियोजनातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी नोकरी सोबत उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग प्रत्येकाने शोधायला हवेत. आपण केवळ नोकरीवर अवलंबून राहिलो तर, आर्थिक अडचणीच्या काळात आपला पुरता गोंधळ उडतो आणि आपल्यापुढे इतर उत्पन्नाचे मार्ग नसल्याने आपल्याला आर्थिक अस्थिरता प्राप्त होते. त्यामुळे जितके जास्त उत्पन्नाचे मार्ग तितकी जास्त सुरक्षा हा कानमंत्र प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा.

यासोबतच आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. ही गुंतवणूक रिअल इस्टेट, म्युचुअल फंड, बँकेतील बचत खाते, मुदत ठेव योजना, पोस्ट खात्यातील योजना या योजनांमध्ये असावी. याशिवाय गुंतवणुकीचा कालावधी हा एकसलग असण्याऐवजी थोडा मागेपुढे असावा. जेणेकरून परतावा मिळताना एकाच वेळी मिळण्याऐवजी टप्प्याटप्प्याने मिळेल. अशा प्रकारचे गुंतवणूक धोरण आखल्यामुळे तुमच्याकडे उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग तयार होतील आणि तुम्ही चिंतामुक्त आयुष्य जगू शकता.