उत्तम क्रेडिट स्कोर (Credit Score) असणे हे कर्ज मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था कर्जाला मंजुरी देण्यापूर्वी तुमच्या आर्थिक नोंदीची कसून तपासणी करतात. 'क्रेडिट कार्ड नसेल तर आपला क्रेडिट हिस्ट्री कशी तयार होणार?' असा प्रश्न अनेकांना पडतो.
मात्र, आर्थिक तज्ज्ञांच्या मते, क्रेडिट कार्ड नसतानाही तुम्ही योग्य पाऊले उचलल्यास तुमचा क्रेडिट स्कोर (Credit Score) उत्तम ठेवू शकता. त्यासाठीच्या सोप्या आणि प्रभावी पद्धती खालीलप्रमाणे आहेत.
आर्थिक शिस्त पाळा: लहान सुरुवात, मोठी मदत
तुमची क्रेडिट हिस्ट्री तयार करण्याची सुरुवात करायची असल्यास, एक लहान वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घ्या किंवा मुदत ठेवीसारख्या मालमत्तेवर आधारित सुरक्षित कर्ज घ्या. कर्ज घेतल्यानंतर, त्याची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे प्रत्येक हप्ता (EMI) वेळेवर भरणे. अगदी छोटी कर्जरक्कम देखील तुम्ही जबाबदारीने परतफेड केल्यास, कर्ज देणाऱ्या संस्थांना तुम्ही विश्वासार्ह असल्याचे दिसते.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या हप्त्यांच्या योजना (EMI Plans) किंवा 'आता खरेदी करा, नंतर पैसे द्या' (BNPL) हे पर्याय देखील उपयोगी आहेत. या सेवांमुळे तुमच्या परतफेडीच्या वर्तनाची नोंद क्रेडिट ब्युरोमध्ये होते. त्यामुळे, देयके वेळेवर भरल्यास तुमचा पत इतिहास उत्तम राखण्यास मदत होते.
घरभाडे, वीज बिल, फोन बिल आणि विविध सबस्क्रिप्शन यांसारखी सर्व मासिक देयके अंतिम तारखेपूर्वी भरल्याने तुमची आर्थिक शिस्त दिसून येते. या सवयी कालांतराने तुमच्या पत प्रोफाइलला बळकटी देतात.
सातत्य ठेवा आणि काळजी घ्या
ज्यांचे उत्पन्न स्थिर आहे आणि रोकड प्रवाह (Cash Flow) नियमित आहे, अशा कर्जदारांना कर्ज देणाऱ्या संस्था तत्काळ प्राधान्य देतात. त्यामुळे, एक स्थिर नोकरी चांगला पत इतिहास तयार करण्यासाठी स्वाभाविकपणे मोठी भूमिका बजावते.
एकाच वेळी अनेक कर्जे किंवा क्रेडिट कार्डांसाठी अर्ज करणे टाळा. कारण प्रत्येक अर्जामुळे तुमच्या पत नोंदीची जी तपासणी होते, ती तुमचा क्रेडिट स्कोर तात्पुरता कमी करू शकते.
पत मंडळांकडून दरवर्षी 1 विनामूल्य क्रेडिट रिपोर्ट मिळवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. हा रिपोर्ट नियमितपणे तपासल्यास त्यातील चुका किंवा चुकीच्या नोंदी तुम्हाला वेळीच लक्षात येतील. अशा त्रुटींमुळे तुमचा स्कोर खराब होऊ शकतो; त्यामुळे त्या लगेच दुरुस्त करून घ्या.
तुमचा स्कोर का सुधारतो?
तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत नसाल तरीही, क्रेडिट ब्यूरो तुमच्या सर्व कर्जाच्या हप्त्यांवर आणि BNPL देयकांच्या परतफेडीच्या वर्तनाचा मागोवा घेतात. तुम्ही सातत्याने वेळेवर परतफेड केल्यास, तुमचा स्कोर आपोआप हळूहळू सुधारायला लागतो.
स्कोअरमध्ये बदल लगेच दिसत नाहीत. बहुतेक कर्जदारांना 6 ते 12 महिन्यांच्या सातत्यपूर्ण परतफेडीनंतरच लक्षणीय सुधारणा जाणवते. या शिस्तबद्ध दृष्टिकोनामुळे तुमचा स्कोर तर वाढतोच, पण भविष्यात आवश्यक असलेली कर्जे आणि क्रेडिट कार्ड मिळवण्याचा मार्गही सुलभ होतो.