Emergency Fund: जीवन जगत असताना कोणती आपत्ती कधी येईल सांगता येत नाही. मात्र, त्यासाठी आधीपासूनच आपण तयार असायला हवे. मराठीमध्ये एक म्हण आहे, "तहान लागल्यावर विहीर खोदू नये" त्याप्रमाणे एखादी आणीबाणी आल्यावर तिच्या तयारीला लागू नये. त्यासाठी आधीपासूनच सज्ज असायला हवे. आणीबाणीच्या काळासाठीचा निधी कसा वापरा, याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. सर्वप्रथम एमर्जन्सी फंड म्हणजे काय हे समजून घेऊ.
स्वत: वर किंवा तुमच्या कुटुंबावर आलेली अशी कोणतीही अचानक आलेली परिस्थिती ज्यामध्ये तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो. अपघात, हृदयविकाराचा झटका किंवा मुसळधार पावसामुळे झालेलं घराचं नुकसान ही काही आणीबाणीची (What is emergency fund) उदाहरणं आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, मात्र, त्यापैकी नक्की कोणत्या गोष्टींसाठी एमर्जन्सी फंड वापरावा हे आपण या लेखात पाहू. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या सहापट रक्कम आणीबाणीसाठी वेगळी काढून ठेवावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच तुमच्या गरजा आणि जबाबदाऱ्या पाहूनही या रकमेत बदल होऊ शकतो.
Table of contents [Show]
- नोकरी गेल्यावर किंवा उत्पन्न कमी झाल्यानंतर- (Job loss or reduced income)
- वैद्यकीय आणीबाणी (Medical emergency)
- कार दुरूस्ती (Car repairs)
- घराची दुरूस्ती (Home Maintenance)
- अनियोजित प्रवास (Unplanned travel)
- न्यायालयीन आणि कायदेशीर बाबींसाठीचे शुल्क (Legal fees)
- आरोग्य आणि गृहविम्यातील वजावट रक्कम (Home/Health insurance deductible)
नोकरी गेल्यावर किंवा उत्पन्न कमी झाल्यानंतर- (Job loss or reduced income)
कोरोना काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली होती. तसेच आताही आयटी कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू आहे. तुम्ही इतरांच्या नोकऱ्या गेल्याची बातमी वाचत असाल, मात्र, ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. हे लक्षात घ्या. त्यानुसार एमर्जन्सी फंड साठवून ठेवा. नोकरी गेल्यावर नवी नोकरी शोधण्यास जास्त वेळही लागू शकतो. अशा वेळीस हा फंड तुम्ही वापरा. उत्पन्न कमी झाल्यावरही यातील पैसे काढून तुम्ही चरितार्थ चालवू शकता.
वैद्यकीय आणीबाणी (Medical emergency)
तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य अचानक आजारी पडला तर हा खर्च भागवण्यासाठीही एमर्जन्सी फंड कामाला येईल. हा खर्च भागवण्यासाठी आरोग्य विमा आवश्यक आहे. मात्र, अनेकवेळा रुग्णालयाचे बील इन्शुरन्स कव्हरपेक्षा जास्त येते. अशा परिस्थितीत तुम्ही हे पैसे वापरू शकता. ज्यांच्याकडे विमा नसेल त्यांच्यासाठी तर असा फंड अत्यंत गरजेचे आहे. मात्र, तुम्ही तसे करु नका, आरोग्य विमा तत्काळ काढून घ्या.
कार दुरूस्ती (Car repairs)
कार दुरूस्ती साठी तुम्ही आणीबाणीसाठी साठवलेला निधी वापरू शकता. कार विमाही येथे कामाला येतो. मात्र, जेव्हा कारचा अपघात होतो किंवा दुरूस्तीची रक्कम विमा कव्हरपेक्षा जास्त असते. अशा वेळी हा फंड वापरता येईल. अपघातामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यास नवी कार घेण्याची वेळही तुमच्यावर येऊ शकते. वाहनासाठी जो काही खर्च होईल तो पुन्हा एमर्जन्सी फंडमध्ये टाकायला विसरू नका.
घराची दुरूस्ती (Home Maintenance)
घराच्या दुरुस्तीसाठीही तुम्ही एमर्जन्सी फंड वापरु शकता. नैसर्गिक आपत्ती, जसे की पूर, वादळ, मुसळधार पाऊस यामुळे घराचे नुकसान झाल्यास घर दुरूस्तीसाठी या निधीतील पैसे कामाला येतील. अनेक जण कर्ज काढून घराची दुरूस्ती करतात. तुमच्याकडे एमर्जन्सी फंड असल्यास तुम्हाला कर्ज घेण्याची गरज नाही.
अनियोजित प्रवास (Unplanned travel)
जेव्हा तुम्हाला वैयक्तिक किंवा कुटुंबातील एखाद्या आणीबाणीसाठी अचानक प्रवास करण्याची वेळ येईल, त्यासाठीही तुम्ही हा निधी वापरू शकता. अचानकपणे ट्रिप करण्यासाठी तुम्हाला कदाचित जास्त पैसेही खर्च करावे लागू शकतात. विमानाचे तिकीट अचानक बुक करताना तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
न्यायालयीन आणि कायदेशीर बाबींसाठीचे शुल्क (Legal fees)
तुम्हाला तर कायदेशीर बाबींसाठी खर्च करण्याची वेळ आली तर तुम्ही आणीबाणीसाठी साठवलेल्या फंडातून हे पैसे खर्च करू शकता. न्यायालयीन कामांसाठीही पैशांची गरज भागू शकते. ही रक्कम अनेक वेळा मोठीही असू शकते.
आरोग्य आणि गृहविम्यातील वजावट रक्कम (Home/Health insurance deductible)
रुग्णालयात झालेले सर्व बील विमा कंपनीकडून कधीकधी कव्हर केले जात नाही. वापराच्या वस्तू, आरोग्य चाचण्या, तपासणी, कम्झ्युमेबल आयटम याचे बिल किंवा झोनल पॉलिसी असल्यास तुम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागू शकतात. जेव्हा रुग्णालयाचे बील लाखांमध्ये असेल तेव्हा ही रक्कमही मोठी असेल. तसेच गृहविम्याच्या बाबतीतही आहे. ज्या गोष्टी विमा कंपनीकडून कव्हर केल्या जाणार नाहीत, ते शुल्क तुम्ही आणीबाणीच्या फंडातून भागवू शकता.